मोदी स्वत:ला ‘गुरुजीं’पासून वेगळे करु शकतील?
By Admin | Updated: November 6, 2015 10:01 IST2015-11-06T02:50:29+5:302015-11-06T10:01:42+5:30
काही वर्षांपूर्वी मी भारतीय राजकीय विचारांचे संपादन केले होते व त्यात १९ नामवंत राजकीय विचारवंतांच्या विचारांची रूपरेषा मांडली होती. त्यात गोखले, टिळक, फुले, गांधी, नेहरू, आंबेडकर,

मोदी स्वत:ला ‘गुरुजीं’पासून वेगळे करु शकतील?
- रामचन्द्र गुहा
(इतिहासकार आणि स्तंभलेखक)
काही वर्षांपूर्वी मी भारतीय राजकीय विचारांचे संपादन केले होते व त्यात १९ नामवंत राजकीय विचारवंतांच्या विचारांची रूपरेषा मांडली होती. त्यात गोखले, टिळक, फुले, गांधी, नेहरू, आंबेडकर, लोहिया, जयप्रकाश नारायण आणि पेरियार यांचा, तसेच काही फारशा प्रसिद्ध नसलेल्या विचारवंतांचाही समावेश होता. १९४० ते १९७३ या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक राहिलेले माधव सदाशिव गोळवलकर हे त्यातलेच एक होत. या पुस्तकात मी गोळवलकरांच्या विचारांचा समावेश केल्याने डावे विचारवंत माझ्यावर नाराज झाले होते. भारतातील एकही कम्युनिस्ट विचार या पुस्तकात घेण्याचे मी टाळले होते. त्यांच्या मते या पुस्तकात गोळवलकरांच्या द्वेषपूर्ण विचारांना वैचारिक वैधता देणे आणि फुले-आंबेडकरांच्या पंक्तीत बसवणे चुकीचे होते. पण माझी तुलना वैचारिक आधारांवर नव्हे तर विद्वत्तेच्या आधारावर होती.
गोळवलकरांच्या विचारांना माझ्या पुस्तकात समाविष्ट करून मला त्यांच्या विचारांचा पुरस्कार करायचा नव्हता, तर भारतीय राजकारणात त्यांचा किती मोठा प्रभाव होता हे दाखवून द्यायचे होते. दशकांमागून दशके जात आहेत पण गांधी, नेहरू आणि आंबेडकरांप्रमाणेच त्यांच्याही विचारांचा प्रभाव अजून जाणवतो आहे. देशभर अविरतपणे प्रवास करत त्यांनी संघाचे संघटन उभे केले. तसेच संघाची वैचारिक बैठकसुद्धा त्यांनीच बांधली. त्याच वेळी राजकीय पटलावर संघाशी वैचारिक जवळीक साधणाऱ्या जनसंघाशी त्यांनी संबंध निर्माण केले.
अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे गोळवलकरांचे अनुयायी आहेत. या दोघांसाठी गोळवलकर नेहमीच पूजनीय राहिले आहेत. त्याच प्रमाणे जनसंघ आणि भाजपाचे अनेक मुख्यमंत्री त्यांच्याच हाताखाली तयार झाले आहेत. नरेंद्र मोदींनी जेव्हा संघाचे काम सुरु केले, तेव्हा गोळवलकरांच्या भोवतीचे वलय कायम होते. २००७ साली मोदींनी गोळवलकर यांच्याविषयी दीर्घ आणि स्तुतीपर लिखाण केले होते. अभ्यासकांना गोळवलकरांची ‘वुई आॅर अवर नेशनहूड डिफाईन्ड’ आणि ‘बंच आॅफ थॉट्स’ ही दोन पुस्तके माहितीच असतील. या पुस्तकात भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यात आले असून ख्रिश्चन आणि मुस्लीम दुय्यम दर्जाचे नागरिक असल्याचे म्हटले आहे. त्याही पुढे जात दोन्ही समुदायांना विश्वासघातकीही म्हणण्यात आले आहे.
इथे मला गोळवलकरांचा एक लेख आठवतो. त्याची पार्श्वभूमी फार महत्वाची आहे. १९५१ सालच्या सप्टेंबर महिन्यात संघाने, जनसंघ या पहिल्या हिंदू पक्षाची स्थापना करण्यास मदत केली होती. नव्या पक्षाने नेहरू सरकारवर हिंदूंशी प्रतारणा केल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानातील स्थलांतरित लोक या पक्षाकडे आकर्षित झाले होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या सारखे परिपूर्ण नेतृत्व असतानाही १९५२च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाला मात्र तीनच जागा जिंकता आल्या. गोळवलकरांनी त्यानंतर त्यांचा मार्ग बदलला.
फाळणीच्या जखमा ताज्या असतानाही पंजाब आणि बंगालमध्ये स्थलांतरितांचा सरकार विरोधातला राग जनसंघाच्या फारसा कामी आला नव्हता. म्हणून देशभरातल्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी गोळवलकरांचे लक्ष हिंदू प्रतीकांकडे वळले. १९५२च्या लेखात गोळवलकरांनी हिंदूंना आपल्या देदीप्यमान इतिहासाचे आणि वर्तमानाचे एकत्रीकरण करण्याचे आवाहन केले. त्यांनीे लेखात त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, ‘हिंदूंनी सेवा आणि त्याग या दोन गोष्टींसाठी तसेच मातृभूमीचा गौरव आणि सन्मान यासाठी बलिदान करण्यासही तयार राहावे. हिंदूंकरिता त्यागास प्रवृत्त करणारी कुठली गोष्ट असेल तर ती गोमाता! त्यामुळे या राष्ट्रीय प्रतीकाचे संरक्षण व्हायला हवे व गायीचे पूजनीय स्थान कायम राहावे या साठी गोहत्त्या बंदींचा विषय राष्ट्रीय कार्यक्रमाच्या प्राधान्यस्थानी असला पाहिजे’.
अर्थात गोरक्षेचा हा मुद्दा राष्ट्रीय करण्याची ती पहिलीच वेळ नव्हती. ‘रॅलीईंग अराऊंड द काऊ’ या निबंधात ज्ञानेंद्र पांडे यांनी १९व्या शतकाच्या अखेरीस आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आक्रमक हिंदूंनी स्थापन केलेल्या गौरक्षिणी सभेच्या कार्याचे विश्लेषण केले आहे. गौरक्षिणी सभेचे गायींविषयीचे प्रेम त्यांना असणाऱ्या मुस्लीमद्वेषाएवढेच किंवा त्याहून जास्त होते. तेव्हा सुद्धा गोमांस आजच्या सारखेच मेंढा किंवा बोकडाच्या मटणापेक्षा स्वस्त होते. सुधारणावादी हिंदूंना त्यावेळी सुद्धा मुस्लिमांचे गोमांस खाणे आवडत नव्हते. उत्तर भारतात गाईच्या मु्द्यावरून बऱ्याच दंगली उद्भवल्या. त्यामुळे तिथले मुसलमान नेहमीच असुरिक्षत राहिले आहेत व त्यामुळेच त्यातले बरेच लोक त्यांच्याच धर्मातील दहशतवाद्यांच्या नादी लागले.
गांधींचा काळ सुरु होताच त्यांनी दोन्ही समुदायात सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले. या सामंजस्यात मुसलमान ईदच्या दिवशी गोहत्त्या करणार नव्हते तर हिंदू मशिदीसमोरून वाद्ये वाजवीत जाणार नव्हते. हे सामंजस्य काही काळ टिकले पण शेवटी तुटलेच. गांधींनी मग हुशारीने या मुद्यावरून लक्ष वळवत अस्पृश्यता निवारण आणि स्वराज्य या मुद्यांवर भर दिला.
२० व्या शतकात गोरक्षेचा मुद्दा बाजूला पडला. गांधी, नेहरू, पटेल आणि आंबेडकर या नेत्यांनी राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक समानता, आर्थिक विकास, भाषिक वैविध्य आणि धार्मिक सलोखा या मुद्यांवर प्रकर्षाने भर दिला. या सर्व राजकीय वातावरणात गोळवलकर यांच्या गाईच्या मुद्याच्या बाजूने फारसे लोक उभे राहिले नाहीत. नेहरू आणि शास्त्री यांच्या निधनानंतर हा मुद्दा पुन्हा पुढे आला. त्यावेळी नाराज साधूंनी राष्ट्रव्यापी गोहत्त्या बंदीची मागणी करत संसदेवर अयशस्वी मोर्चा काढला, पण पुढे काहीच दिवसातच हा मुद्दा विस्मरणात गेला.
मागील काही आठवड्यांपासून मात्र भाजपाचे काही नेते याबाबत वारंवार बोलत आहेत. हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी तर गोमांस खाणाऱ्या मुसलमांना देशात राहू नये असा सल्लाही दिला होता. गोहत्त्येचा मुद्दा बिहारच्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा झाला आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीतही तो प्रभावी ठरेल.
साक्षी महाराज आणि मनोहरलाल खट्टर यांच्या मनात एकाचवेळी गायीचे प्रेम आणि मुसलमानांविषयी संशय आहे, जसा तो एकेकाळी गोळवलकरांच्या मनात होता. या संकुचित आणि विभाजनाच्या कार्यक्रमाचे गुणसूत्र रा.स्व.संघाचे आहे. पंतप्रधान मोदींसाठी संकेत आहेत की त्यांनी स्वपक्षातल्या कट्टर मत ठेवणाऱ्या लोकापासून अंतर ठेवावे. पण ते ज्यांना पूजनीय श्रीगुरुजी म्हणतात त्यांच्यापासूनही दूर राहण्याची तयारी ते दाखवतील?