घर आया मेरा...

By Admin | Updated: November 7, 2015 03:29 IST2015-11-07T03:29:54+5:302015-11-07T03:29:54+5:30

अखेर ‘देशभक्त’ गँगस्टराचे पाय जन्मभूमीला लागले म्हणायचे! नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न. भारतीय गुप्तचरांनी मोठ्या ‘हिकमतीने’ छोटा राजन ऊर्फ राजेन्द्र सदाशिव

Came home my | घर आया मेरा...

घर आया मेरा...

अखेर ‘देशभक्त’ गँगस्टराचे पाय जन्मभूमीला लागले म्हणायचे! नकटीच्या लग्नाला सत्राशे साठ विघ्न. भारतीय गुप्तचरांनी मोठ्या ‘हिकमतीने’ छोटा राजन ऊर्फ राजेन्द्र सदाशिव निकाळजे याला इंडोनेशियातील बाली या पर्यटन स्थळावर अडकवून ठेवले आणि त्याच्या मायभूमीकडे परतण्याची सारी सिद्धता केली, पण अचानक ज्वालामुखीच्या राखेने घोटाळा केला. बालीचा विमानतळच ठप्प झाला. तपासी यंत्रणांचे नशीबच खडतर. अखेर यातूनही मार्ग निघाला व देशाच्या राजधानीत तो अवतरला. अनेक कट्टर बदमाषांच्या बाबतीत नेहमीच जो वाद रंगतो, तसा तो त्याच्या बाबतीतही रंगला. त्याला अटक झाली की त्याने आत्मसमर्पण केले. अनेकाना वाटते की जीवाच्या भीतीने त्यानेच भारतीय गुप्तचरांना ‘टिप’ दिली आणि आॅस्ट्रेलिया सोडून तो बालीत आला कारण इंडोनेशिया आणि भारत यांच्यातील गुन्हेगारांच्या प्रत्यार्पण संधीची त्याला पूर्ण कल्पना होती. खासदार रामदास आठवले मात्र याच्याशी असहमत आहेत. त्यांच्या मते छोटा राजन दलित असल्यानेच त्याला अटक केली गेली! उद्या दाऊद इब्राहीमची उपयुक्तता संपल्याचे पाकी सरकारच्या लक्षात आले आणि त्या सरकारने दाऊदला गलितगात्र बनविले व खुद्द दाऊदने छोटा शकीलमार्फत टिप दिली व अटक करवून घेतली तर त्याच्या बाबतीत असदुद्दीन ओवेसीदेखील असेच म्हणतील की, तो मुसलमान असल्यानेच त्याला अटक केली गेली! छोटा राजनवर म्हणे पाऊणशे गुन्हे दाखल आहेत व गेली २७ वर्षे तो मुंबई पोलिसांना गुंगारा देतो आहे. त्याच्या मते मुंबई पोलिसांमध्ये दाऊदचे काही हस्तक आहेत व ते आपला घास घेण्यास टपले आहेत. राजनच्या या आरोपास माजी केन्द्रीय गृह सचिव राजकुमार सिंह यांचाही दुजोरा आहे. पण ज्या पद्धतीने राजनने पोलिसांच्या हातावर इतकी वर्षे तुरी ठेवल्या, ते पाहाता मुंबई पोलिसात त्याचेही काही हस्तक वा समर्थक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज राजन शारीरिक दृष्ट्या पूर्ण खचला आहे. त्याला सातत्याने डायलेसिवर ठेवावे लागते. आता तो सारा खर्च तमाम भारतीय करणार आहेत. कारण तो जिवंत राहाणे म्हणे अत्यावश्यक आहे. त्याचे एकमात्र कारण म्हणजे मुंबई शहरातील तेवीस वर्षांपूर्वीच्या साखळी बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहीम याला फासावर लटकविण्याइतके सज्जड पुरावे केवळ त्याच्या एकट्यापाशी आहेत. याचा अर्थ ते देशातील तपासी यंत्रणांकडे नाहीत. अर्थात यातही काही नवे नाही. अबू सालेमलाही असेच प्रत्यार्पण संधीचा लाभ उठवून भारतात आणले गेले होते, पण त्याच्या विरुद्धच्या गंभीर आरोपांपैकी एकदेखील अद्याप सिद्ध झालेला नाही!

Web Title: Came home my

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.