याचकांची झोळी
By Admin | Updated: June 14, 2016 04:12 IST2016-06-14T04:12:52+5:302016-06-14T04:12:52+5:30
विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही गाव-खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी साहित्य महामंडळाने कधी झोळी हातात घेतली आहे काय?

याचकांची झोळी
- गजानन जानभोर
विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही गाव-खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी साहित्य महामंडळाने कधी झोळी हातात घेतली आहे काय?
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत दान घेण्यासाठी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी सध्या झोळी घेऊन सर्वत्र फिरत आहेत. ‘फुलाची केवळ पाकळी नव्हे तर फूलच द्यावे’ असा त्यांचा हट्ट आणि ‘याचकाला विन्मुख करू नका व रिकाम्या हाताने परत पाठवू नका’, अशी कळकळीची त्यांची याचना आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यात लोकसहभाग वाढावा हा उदात्त हेतू त्यामागे असावा, त्यामुळे या स्तुत्य पावलाचे आपण स्वागतच करायला हवे. पण झोळी घेऊन दात्याच्या दारात पाय ठेवण्यापूर्वी याचक, भिक्षुक किंवा फकीर स्वत:च्या मनाला एक प्रश्न विचारत असतो. ज्याच्या घरी आपण जात आहोत, त्याच्याशी आपले नाते काय? पोटातील भूक त्याला तसे विचारायला भाग पाडते. त्याच्या मनाने कौल दिला तरच ‘आत्मसन्मान’ त्याला त्या दारात घेऊन जातो, नाही तर रस्त्याने झोळी उघडी ठेवून वाटसरुंना साद घालत तो फिरत राहतो.
याचकाच्या नव्या भूमिकेत असलेल्या श्रीपाद जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी झोळी घेऊन निघण्यापूर्वी स्वत:च्या मनाला हाच प्रश्न विचारायला हवा होता. मागील दहा वर्षांत विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले, आजही रोज कुठल्यातरी गाव खेड्यातील आकांत हृदय पिळवटून टाकत असतो. त्या शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कधी झोळी हातात घेतली का? काही वर्षांपूर्वी खैरलांजीच्या भय्यालाल भोतमांगे या दलित बांधवाच्या कुटुंबियांची नराधमांनी निर्घृण हत्त्या केली. भोतमांगेला न्याय मिळावा म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभे राहिलो का? भय्यालालच्या दुसऱ्या लग्नाची ‘ब्रेकिंग न्यूज’ चघळणाऱ्या काही दलितद्वेष्ट्या माध्यमांचा आपण साहित्यिक म्हणून साधा निषेध तरी केला का? मागच्या वर्षी तिरोड्याची उज्ज्वला रंगारी ही महिला अन्नाच्या एकेका कणासाठी तडफडत मरून गेली. तिच्या निष्प्राण देहाजवळ रात्रभर बसून असलेला तिचा गतिमंद मुलगाही त्यावेळी असाच झोळी घेऊन रस्त्याने भीक मागत होता. जोशी महाशय, त्यावेळी तुमचे साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ कुठे होते? उज्ज्वलाच्या उद्ध्वस्त संसाराची फाटकी झोळी तुम्हाला का नाही दिसली? वैदर्भीय जनतेने मराठी साहित्य महामंडळाच्या झोळीत दान का टाकावे? वर्षभरापूर्वी चंद्रपूरला झालेल्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव विदर्भद्रोही साहित्यिकांनी येऊ दिला नाही. वैदर्भीय जनतेच्या अस्मितेशी दगाफटका करायचा आणि त्यांच्याच दारात झोळी घेऊन उभे राहायचे, याला याचना नाही, निलाजरेपणा म्हणतात.
हे अ. भा. म. सा. महामंडळ म्हणजे काय? ते नेमके काय करीत असते याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. या महामंडळात कुठलीही लोकशाही व्यवस्था नाही. गावखेड्यातील एखादी सहकारी पतसंस्था किंवा सुतगिरणी जशी असते तसे ‘आपण सारे भाऊ-भाऊ’ हा मतलबाचा व्यवहार या महामंडळात चालत असतो. महामंडळाला राज्य सरकार दरवर्षी पाच लाख रुपयांचे अनुदानही देते. या सरकारी अनुदानाचा महाराष्ट्राला कधी हिशेब दिला आहे का? जर तो दिला नसेल तर लोकाना पैसे मागण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. साहित्य संमेलनासाठी एक रुपयाही महामंडळाला खर्च करावा लागत नाही. ज्यांना पुढारीपण मिरवायचे आणि खैरात वाटायची असते ते पी. डी. पाटलांसारखे नवे सरंजाम अशी संमेलने भरवतात. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनात तर पी. डी. पाटलांनी सरस्वतीला मंडपाबाहेर बसवून लक्ष्मीचीच आरास मांडली होती आणि खेदाची बाब अशी की साहित्यातून कष्टकरी, शेतकऱ्यांचे दु:ख मांडणारे साहित्यिक या अरबी थाटाच्या पाहुणचारात गुंग झाले होते. अखिल भारतीय तसेच प्रादेशिक साहित्य संमेलनात सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या मूलभूत प्रश्नांची कधी चर्चा होत नाही, त्यांच्या वेदना मांडल्या जात नाहीत. संमेलनांवरील पंचतारांकित उधळपट्टी बंद करा, समाजाच्या दु:खाशी एकरुप व्हा. मग बघा लोकच स्वत:हून तुमच्या झोळीत भरभरुन दान टाकतील. तोपर्यंत दानासाठी या नव्या याचकांना तिष्ठतच राहावे लागणार आहे.