प्रगल्भ कर्णधार...
By Admin | Updated: February 15, 2017 00:28 IST2017-02-15T00:28:22+5:302017-02-15T00:28:22+5:30
कर्णधार म्हणून विराट कोहली प्रत्येक सामन्यागणिक प्रगल्भ होत आहे, असे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कानावर पडत आहे.

प्रगल्भ कर्णधार...
कर्णधार म्हणून विराट कोहली प्रत्येक सामन्यागणिक प्रगल्भ होत आहे, असे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कानावर पडत आहे. परंतु, नेमकं प्रगल्भता कशाप्रकारे आपल्यात आली, याचे उत्तम उदाहरण कोहली नुकताच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातून सिद्ध केले. निर्णायक क्षणी अचूक डीआरएस पर्यायाचा वापर करून कोहलीने कल्पक नेतृत्वाची छाप पाडली. विशेष म्हणजे याच अचूक निर्णयाच्या जोरावर त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केले. त्याचवेळी, आपल्या खेळाडूंवर असलेला विश्वास त्याला उत्कृष्ट कर्णधार बनवत आहे. प्रत्येक डीआरएस घेण्यापूर्वी कोहली आपल्या खेळाडूंचा विश्वास जाणून घेत त्यांच्यानुसार निर्णय घेतो आणि यामुळेच संघ खऱ्या अर्थाने ‘टीम इंडिया’ बनते.
बांगलादेशविरुद्ध बाजी मारत कोहलीने कर्णधार म्हणून १५ कसोटी सामने जिंकताना यशस्वी भारतीय कर्णधारांमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली. त्याच्यापुढे आता सौरभ गांगुली (२१) आणि महेंद्रसिंग धोनी (२७) यांचा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे माजी कर्णधार सुनील गावसकर यांचा सलग १८ कसोटींत अपराजित राहण्याचा विक्रमही मोडताना कोहलीने १९ कसोटींमध्ये अपराजित राहण्याची कामगिरी केली. कर्णधार म्हणून प्रत्येक मालिकेमध्ये तो नवा विक्रमा रचत असला तरी, कोहलीच्या नेतृत्वाची खरी परीक्षा अद्याप बाकी आहे.
कोहलीमध्ये कर्णधारासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत; मात्र अद्याप त्याची ‘विराट’ परीक्षा झालेली नाही. त्याच्यामध्ये विजयाची भूक प्रचंड असून, त्याचा जोश जबरदस्त आहे. घरच्या मैदानाबरोबरच परदेशामध्येही जिंकण्याची त्याची क्षमता आहे. श्रीलंकेला त्यांच्या देशात लोळवल्यानंतर वेस्ट इंडिजलाही त्यांच्याच भूमीत धक्का दिला. मात्र, असे असले तरी आॅस्टे्रलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा तीन ‘पॉवर हाउस’वर कब्जा करण्याचे आव्हान कोहलीपुढे असेल. त्यातच, आॅस्टे्रलियन संघ भारत दौऱ्यावर येत असून, या मालिकेवरही बरेच गणित अवलंबून असेल. एकूणच, आव्हानांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी कायम सज्ज असलेला कोहली आपली कठीण परीक्षाही यशस्वीपणे पार पाडेल अशी खात्री आहे. त्याला मिळालेल्या यशाची भुरळ पडू नये हीच अपेक्षा...