उज्ज्वल शिक्षणाचा मानदंड
By Admin | Updated: February 8, 2017 23:27 IST2017-02-08T23:27:06+5:302017-02-08T23:27:06+5:30
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शहराचे व देशाचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उन्नत आणि उज्ज्वल करीत न्यावे...

उज्ज्वल शिक्षणाचा मानदंड
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शहराचे व देशाचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उन्नत आणि उज्ज्वल करीत न्यावे...
पुणे हे शहर स्वत:चे म्हणून एक वेगळी खासियत बाळगून आहे. 'सायकलींचे पुणे' अशी पुण्याची एकेकाळी ओळख होती. 'पुणेरी'पण अधोरेखित करणाऱ्या ‘पुणेरी पाट्या’ तर जगभरात प्रसिद्ध आहेत. पण त्याहीपुढे जात या शहराने उद्यमनगरी, आयटी हब अशी विविधांगी ओळख मिळवली. या विस्तार विकासामध्ये अबाधित राहिलेली एक ओळख म्हणजे ‘विद्येचे माहेरघर’. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, कर्वे आदिंनी शिक्षणाचा प्रसार केला. गती दिली आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणामुळे निर्माण झालेली पुणे शहराची ओळख त्यानंतरच्या काळात कधी पुसली तर गेली नाहीच; पण पुणे विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ती अधिक ठाशीवपणे जगासमोर आली.
पुणे विद्यापीठाची अधिकृतरीत्या स्थापना १० फेबु्रवारी १९४९ रोजी झाली. हा दिवस पुण्यातील शैक्षणिक क्रांतीचा मानला गेला. नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन मुंबई प्रांतात १९१७ मध्ये शैक्षणिक परिषद भरली होती. यंदा शताब्दी वर्ष असलेल्या या परिषदेत प्रादेशिक विद्यापीठे असावीत, असा ठराव पास करण्यात आला. १९३२ पर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ राहिली. पुढे बॅ. मुकुंदराव जयकर यांनी प्रादेशिक विद्यापीठांचा प्रश्न धसास लावला तेव्हा ब्रिटिश शासनाने त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमून अहवाल सादर करण्याची विनंती केली. हा अहवाल १९४९ च्या सुमारास स्वीकारला गेला आणि पुणे विद्यापीठाची अधिकृतरीत्या स्थापना झाली. पहिले सन्माननीय कुलगुरू ठरले मुकुंदराव जयकर. पुणे विद्यापीठाने गुणवत्तेच्या स्तरावर एक मानदंड प्रस्थापित केला आणि देशभरातील मुलांना शिक्षणासाठी यावे तर पुणे विद्यापीठात अशी ओढ निर्माण झाली. समृद्ध वारसा लाभलेल्या विद्यापीठाची वास्तूही मोठी ऐतिहासिक. पुण्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी पुण्यात गणेशखिंडीच्या रस्त्यावर बांधलेले हे राजभवन. तब्बल एक लाख ७५ हजार पौंड खर्चून ही टोलेजंग वास्तू सर बर्टल फ्रिल्पर यांनी साकारली. स्त्रीशिक्षणाची याच पुण्यात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव या विद्यापीठाला देऊन कृतज्ञतापूर्वक सामाजिक भान जपले आहे.
पुणे विद्यापीठाची पदवी संपादन करणे ही आजही तितकीच सन्मानाची बाब मानली जाते. मराठी विषयापासून ते अगदी मॅनेजमेंटची पदवी संपादन करण्यापर्यंत विद्यार्थ्यांचा ओढा असतो तो पुणे विद्यापीठाकडेच. नामांकित कुलगुरूंची साथ लाभली आणि विद्यापीठाची गौरवशाली परंपरा त्यांनी कायम वर्धिष्णू ठेवली. पुणे विद्यापीठाला जो आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे, त्यात मुकुंदराव जयकरांचे अमूल्य योगदान आहे. रँग्लर परांजपे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, डी. जी. कर्वे, न. वि. गाडगीळ, ध. रा. गाडगीळ, रँग्लर ग. स. महाजनी, डॉ. राम ताकवले, डॉ. वि. ग. भिडे, डॉ. श्रीधर गुप्ते, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. अरुण निगवेकर, डॉ. अशोक कोळस्कर, डॉ. नरेंद्र जाधव ते विद्यमान डॉ. वासुदेव गाडे इथपर्यंत साऱ्यांनीच या विद्यापीठाच्या प्रगतीत आपापल्या परीने मोलाचे योगदान दिलेले आहे. काळाची बदलती पावले ओळखून या विद्यापीठाने सातत्याने उत्तमोत्तम गोष्टी विद्यार्थ्यांना मिळतील आणि विद्यापीठ 'विद्यार्थिकेंद्रित' राखण्यात यश मिळवले. विविध विभागांसह संत नामदेव, संत तुकाराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि अध्यासनांच्या माध्यमातून मौलिक साहित्य व संशोधनपर साहित्य साकारण्यावर भर दिला जातो. सी-डॅक, आयुका, पर्यावरण विभाग, सायन्स टेक्नॉलॉजी पार्क, यूजीसी केंद्र अशा महत्त्वाच्या संस्था याच विद्यापीठाच्या आवारात आहेत. कलेला प्रोत्साहन देणारे ललित कला केंद्र तसेच पं. भीमसेन जोशी अध्यासन आपला वेगळा आब राखून आहेत.
देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट असे जयकर गं्रंथालय पुणे विद्यापीठातच आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक येथील आयुकात, तर डॉ. विजय भटकर येथील सीडॅक येथे येऊन नियमितपणे संशोधन करीत असतात. भारताला प्राचीन विद्यापीठीय परंपरांचा मोठा वारसा आहे. तो जपणाऱ्या पुणे विद्यापीठाने शहराचे व देशाचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उन्नत आणि उज्ज्वल करीत न्यावे याच स्थापनादिनी शुभेच्छा.
- विजय बाविस्कर