विवेकी हिलरी विरुद्ध भांडखोर ट्रम्प
By Admin | Updated: August 8, 2016 04:17 IST2016-08-08T04:17:24+5:302016-08-08T04:17:24+5:30
अमेरिकेच्या अध्यक्षपदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील एकाची निवड येत्या आठ नोव्हेंबरला होईल

विवेकी हिलरी विरुद्ध भांडखोर ट्रम्प
अमेरिकेच्या अध्यक्षपदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील एकाची निवड येत्या आठ नोव्हेंबरला होईल आणि २० जानेवारी २०१७ ला नवनियुक्त अध्यक्ष आपल्या पदाची शपथ घेऊन देशाची सूत्रे हाती घेईल. या दोन्ही उमेदवारांच्या भूमिका परस्परभिन्नच नव्हे, तर टोकाच्या, वेगळ्या व परस्परविरोधी आहेत. त्यांच्यातील जो कोणी अमेरिकेचा अध्यक्ष होईल तो त्या देशाएवढेच जगाच्या राजकारणालाही वेगळे वळण देणारा ठरेल, असे त्या दोघांच्या राजकीय भूमिकांतील भिन्नत्व आहे. यापैकी ट्रम्प यांची उमेदवारी समन्वयाहून विरोधावर आणि सर्वसमावेशकतेहून एकांगी वाटचालीवर उभी तर क्लिंटन यांच्या उमेदवारीचा भर समन्वय आणि सर्वसमावेशकतेवर अधिक आहे. ‘मी अध्यक्ष झालो तर अमेरिकेत मुसलमानांचे येणे बंद करीन, मेक्सिकनांना देशात प्रवेश करू देणार नाही, अमेरिकेच्या फौजा त्याच्या ज्या मित्र देशांत आज तैनात आहेत, त्या देशांकडून त्या फौजांचा खर्च व त्यांच्या सेवेचा मोबदला वसूल करीन’ ही ट्रम्प यांची भूमिका. हिलरींना मात्र त्यांचा देश पूर्वीएवढाच खुला व स्वागतशील राखायचा असून अमेरिकेच्या मित्र देशांना सोबत घेऊनच जगावरच्या दहशतवादी संकटांचा सामना करायचा आहे. तात्पर्य, ट्रम्प हे आक्रमक तर हिलरी या विवेकी नेत्या आहेत. ट्रम्प यांना एकूणच बदल हवा तर हिलरींना आहे त्यात सुधारणा हव्या आहेत. ट्रम्प यांचे वागणे बोलणे एखाद्या एकाधिकारशहासारखे, सारे काही त्यांना कळत असल्याचे आणि त्यांना दुसऱ्या कोणाची मदत, सल्ला वा सहकार्य नको असल्याचे सांगणारे. तर हिलरींची वागणूक अमेरिकेची पहिली महिला नागरिक, सिनेटर आणि परराष्ट्रमंत्री अशी मोठी पदे भूषविल्यानंतरही ‘मला अजून काही समजून घ्यायचे राहिले आहे’ असे दर्शविणारी. ट्रम्पच्या प्रत्येक वाक्यात ‘मी’ असतो. हिलरी ‘आम्ही अमेरिकन’ असं म्हणतात. त्यांच्या वृत्तीतला हा फरक या निवडणूक प्रचाराचा आरंभ ज्या प्रायमरी निवडणुकींमध्ये झाला त्याचवेळी साऱ्यांच्या लक्षात आला. ट्रम्प यांनी त्यांच्या पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना खोटारडे, अर्धवट, अडाणी अशी शेलकी विशेषणे वापरून घायाळ केले, तर हिलरींनी आपले पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी अखेर एकत्रच येणार आहेत, अशी भाषा वापरली. त्यांच्या प्रकृतिधर्मातच फरक आहे. ट्रम्प हे राजकारणाबाहेर राहिलेले बांधकाम व्यवसायातले आंतरराष्ट्रीय म्हणावे असे धनवंत व्यापारी. तर हिलरी या प्रथम पतीसोबत राजकारणाचे धडे घेतलेल्या, मग देशाच्या पहिल्या महिला नागरिक झालेल्या पुढे सिनेटर व परराष्ट्रमंत्री या नात्याने प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियांचा, त्यातल्या वाटाघाटी, चर्चा, संवाद आणि देवाणघेवाण या साऱ्यांचा अनुभव असलेल्या संपन्न नेत्या आहेत. एक एकारलेला अहंमन्य व धनवंत व्यापारी विरुद्ध राजकारणात मुरलेल्या विनयशील उमेदवारांतली ही लढत आहे. भारताच्या दृष्टीने या निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. भारतीय व आशियाई मुला-मुलींनी अमेरिकेत येऊन आमच्या मुलांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या आहेत, त्यासाठी त्यांच्यावर बंधने घातली पाहिजेत, असे ट्रम्पचे म्हणणे. तर येणाऱ्या मुला-मुलींनी स्वत:सोबत अमेरिकेची संपन्नता वाढवली, हे हिलरींचे सांगणे आहे. ही मुले ट्रम्पच्या मते अमेरिकेची संपत्ती हिरावतात. ट्रम्प उद्या विजयी झाले तर ते या साऱ्यांच्या रोजगारीवर गदा येऊ शकते, हा आपल्या काळजीचा विषय. शिवाय ट्रम्प अमेरिकेने इतर देशांना, (यात मित्रदेशही आले) केलेल्या प्रत्येक मदतीचा मोबदला मागणार. दहशतवादाविरुद्धच्या लढाईसाठी ते संबंधित देशांना त्यांचा सर्व खर्च करायला भाग पाडणार. या उलट हिलरी अमेरिकेने दहशतवादाविरुद्धच्या जगाच्या लढाईचे नेतृत्व करावे व त्या युद्धात साऱ्यांनी सहभागी व्हावे, असे म्हणणार. हिलरी यापूर्वी अनेकदा भारतात आल्या आहेत. त्यांचे यजमान बिल क्लिंटन यांच्यासोबत आणि त्या स्वत: अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना. भारतातील सरकार पक्षातल्या नेत्यांएवढेच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताला हिलरींचा विजय आवडणारा ठरणार आहे. जगात युद्धाची अनेक केंद्रे आता उभी होत आहेत. सारा मध्य आशिया ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्यातला तणाव आता तुटेपर्यंत ताणला गेला आहे. सीरिया, इराण, इराक, ट्युनिशिया, लिबिया यांसारखे देश दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानाएवढेच बेचिराख केले आहेत. फ्रान्स आणि जर्मनीतही दहशतवादी हल्ले झाल्याचे आता दिसले आहे. काश्मीर हे कमालीचे अशांत क्षेत्र आहे आणि या साऱ्यांत आता चीनच्या दक्षिण भागालगतच्या समुद्राच्या मालकी हक्काचे भांडण उभे झाले आहे. हा काळ भडक माथ्याच्या, क्षणात संतापणाऱ्या आणि लागलीच अण्वस्त्राची भाषा बोलणाऱ्या नेत्यांचा नाही. संयमी, विवेकी, उदारमतवादी व समन्वयी वृत्तीच्या पुढाऱ्याच्या हाती जगाचे राजकारण सोपविण्याची ही वेळ आहे. हिलरी संयमी आहेत पण जेथे ठणकावून बोलायचे तेथे त्या तसे बोलणाऱ्याही आहेत. इस्रायलवर बॉम्ब टाकाल तर तुमचा देश क्षणात नाहीसा करू हे त्यांनी इराणच्या राज्यकर्त्यांना एकदा ऐकविलेही आहे. असा समज असणारे अमेरिकेचे संयमी पण कणखर नेतृत्वच यापुढे जगाला हवे आहे.