हे भांडण दिखाऊ की खरे ?
By Admin | Updated: February 12, 2017 23:57 IST2017-02-12T23:57:26+5:302017-02-12T23:57:26+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शंकराचार्यांचे भक्त नसून गुंडाचार्यांचे शिष्य आहेत. गुंडांना सोबत घेतल्याखेरीज ते बाहेर पडत नाहीत.

हे भांडण दिखाऊ की खरे ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शंकराचार्यांचे भक्त नसून गुंडाचार्यांचे शिष्य आहेत. गुंडांना सोबत घेतल्याखेरीज ते बाहेर पडत नाहीत. त्यांच्या मागे मोदी आणि शाह यांचे पाठबळ नसते तर ते कमालीचे दुबळे व परावलंबी गृहस्थ असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले असते. त्यांचा महाराष्ट्राच्या ऐक्यावर विश्वास नाही आणि महाराष्ट्र एकसंध राहील अशी साधी प्रतिज्ञाही ते करीत नाहीत. इ...’. २५ वर्षे एका घरात राहिलेले सख्खे भाऊ जेव्हा एकमेकांच्या जिवावर उलटतात तेव्हा ते खऱ्या वैऱ्यांहूनही अधिक हिंस्र होतात. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर आणि परस्परांविरुद्ध लढविण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांतील भाऊबंदकीने आता अशा आरोपांची पातळी गाठली आहे. याच सुमारास गुजरातमधील पटेलांच्या विराट आंदोलनाचे नेतृत्व केलेला हार्दिक पटेल सेनेच्या बाजूने आल्याने आणि त्याने ‘फडणवीसांसह मोदींनाही निपटून टाकू’ अशी गर्जना केल्याने सेनेच्या शिडात जास्तीची हवा भरली आहे. भाजपाने केंद्रात व राज्यात सेनेला कमालीची हलकी व कमी मंत्रिपदे दिल्यापासूनच सेनेत भाजपाविरोधी धुसफूस सुरू आहे. त्यांच्यात युती टिकविण्याची व एकत्र राहून निवडणूक लढविण्याची भाषा सुरू असतानाही दुसरीकडे ‘पाहून घेऊ’ अशा धमक्यांचे आदानप्रदान होतच होते. आता युती तुटली आहे आणि दोन्ही पक्षात उघड टीका व शिवीगाळ यांना आरंभ झाला आहे. फडणवीसांनी शिवसेनेला तिची ‘औकात दाखवून देण्याची’ भाषा वापरली आणि सेनेने त्यांच्या महाराष्ट्रनिष्ठेवर आक्षेप घेतला. आता निवडणूक निकालानंतरही युती नाही, असे सेनेने जाहीर केले. इतरांची मदत घेऊन मुंबई ताब्यात घेऊ असे सेनेचे म्हणणे तर ‘मुंबईने आम्हाला २०१४ मध्येच कौल दिला आहे’ असे भाजपचे सांगणे. या दोन्ही पक्षांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतचे भांडण संपले असून त्यांना आता परस्परांशीच लढत द्यायची आहे असे त्यांच्यातील राजकारणाचे सध्याचे चित्र आहे. झालेच तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे मनोरंजन करणारे आहे. त्यातच आता सेनेने नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचे अध:पतन आणि तेथील खूनसत्राचे चित्रण करणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि नागपूरचे नेते आहेत. त्यामुळे ही पुस्तिका थेट त्यांच्यावर वार करणारी आहे. भाजपात फडणवीसांचा मनातून राग करणारे नेते खुद्द नागपुरातही आहेत व त्यांना हे चित्र सुखविणारे आहे. एक गोष्ट मात्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निश्चित केलेली दिसत आहे. ती म्हणजे शिवसेनेला तिचे खरे स्थान दाखवून देण्याची. कोणताही कार्यक्रम नाही, कसलेही धोरण नाही, हिंदुत्व नावाच्या कोणत्याही एका निश्चित बाबीची साथ नाही आणि अस्मितेच्या राजकारणाखेरीज दुसरे हाती काही नाही. तरीही सेना एवढी वर्षे मुंबईवर राज्य करीत आली. आता भाजपा केंद्रात सत्तेवर आहे आणि राज्यात त्या पक्षाचे सरकार आहे. या बळावर सेनेला तिचे स्थान (औकात) आपण नक्कीच दाखवू असा फडणवीसांचा मानस आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांहून त्या दोन पक्षातील मुंबईत होणारी लढत लक्षणीय असेल आणि मुंबईचे खरे ‘राजकीय मालक’ कोण हे त्यातून स्पष्ट होईल. एक गोष्ट मात्र साऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. परवापर्यंत हळू आवाजात बोलणारी आणि आपल्या मुखपत्रामधूनच आपली नाराजी व्यक्त करणारी सेना एवढी बोलकी व टीकाखोर बनली त्याचे रहस्य कोणते व तिच्या मागे नव्याने आलेल्या शक्ती कोणत्या? भाजपातील नाराजांची तिला मिळू शकणारी साथ महत्त्वाची की राज्यभरात निघालेले बड्या जातींचे महामोर्चे तिच्या उपयोगाचे? हार्दिक पटेल या तरुणाचे आगमन आणि पटेलांच्या आरक्षणाबाबतचा त्याचा आग्रह याबाबी सेनेच्या बाजूने जाणाऱ्या ठरणार आहेत काय? मराठ्यांचे मोर्चे पवारांसोबत गेले नाहीत आणि पवारांनीही त्यांना साथ दिल्याचे दिसले नाही. ओबीसींचे मोर्चेही सगळ्या राजकीय पक्षांपासून स्वत:ला दूर ठेवणारे दिसले आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा ‘भाजपाखेरीज इतरांची साथ घेऊन सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू’ असे म्हणतात तेव्हा त्यांचे सख्य नेमके कुणाशी असते? काहींच्या मते मुंबईची निवडणूक संपली आणि त्या शहराचे ३७ हजार कोटींचे प्रचंड बजेट हाती आले की सेनेचा कोप संपेल. पण तोवर भाजपाचा रोष वाढला असेल. तसा तो वाढत जाईल अशीच आताच्या भांडणातील या दोन पक्षांची भाषा आहे. एक कुतूहल आणखीही, फडणवीसांवर आणि मोदींवर एवढी टीका करतानाही सेनेचे मंत्री त्यांची पदे सोडत नाहीत आणि वर ‘हे सरकार आम्ही अस्थिर होऊ देणार नाही’ असे आश्वासनही देताना दिसतात. मग हे भांडण खरे की खोटे? ते सत्तेसाठी, सत्तेत जास्तीचे
काही मिळविण्यासाठी की मुंबईतील ३७ हजार कोटींच्या लोण्यासाठी? असो, त्यांचे संबंध तुटेपर्यंत ताणलेले दिसतात एवढे मात्र खरे. मिळालेली सत्ता सोडवत नाही आणि ती पुरेशीही वाटत नाही हे यातले सेनेचे शल्य. तर दिले त्यावर समाधानी राहा, जास्तीचे काही मागू नका अन्यथा तुमच्यावाचूनही आमची सत्ता अबाधित राहील हा भाजपचा तोरा. त्याचमुळे मनात येते हे भांडण दिखाऊ की खरे?