- सचिन जवळकोटे, निवासी संपादक, लोकमत, सोलापूरगांगुली दादाच्या तब्येतीपेक्षा त्याच्या ‘ऑइल ब्रॅण्ड’ची चर्चा सर्वाधिक होऊ लागली, तेव्हा इंद्र महाराजांनी विचारलं, ‘मुनीऽऽ हा ब्रॅण्ड काय प्रकार आहे?.. नारद उत्तरले, “इमेजचं ब्रॅण्डिंग करणारी एखाद्या उत्पादनाची वा व्यक्तीची ओळख म्हणजे ब्रॅण्ड. जसा की उर्वशी, रंभा अन् मेनका या आपल्या दरबाराच्या ब्रॅण्डऽऽ”
..विषय तोडत इंद्रांनी नारदांना नेत्यांचा ब्रॅण्ड हुडकायचा आदेश दिला. स्वत:च्या हातातला ॲन्टिक ब्रॅण्ड म्हणजे वीणा वाजवत मुनी नागपुरात पोहोचले. त्रिकोनी पार्कच्या बंगल्यात देवेंद्रपंत निवांतपणे जाकिटाच्या गुंड्या कुरवाळत बसले होते. ‘आयेगाऽऽ आनेवालाऽऽ’ हे आर्त गाणं ऐकू येत होतं. आता ‘आयेगा’ म्हणजे ‘अजितदादांचा निरोप’ तर नसेल ना, या विचारानं मुनी हसले.
लातुरात रितेशभाऊ भेटले. ‘टिकटाॅक’ बंद झाल्यापासून त्यांचा मूड गेलेला, तरीही रोज किमान चार-पाच व्हिडीओ तयार करायची सवय तशीच होती.. या देशमुख फॅमिलीत मात्र त्यांची ‘लाडकी मम्मी’ हाच मोठा ‘इमोशनल ब्रॅण्ड’ असल्याचं मुनींनी ओळखलं. पुण्याकडं जाताना ‘उजनी धरण’ लागलं. मुनींना आपसूकच धाकटे दादा बारामतीकर आठवले. ठसका लागला. एवढ्यात धरणातले खेकडे पाहून परंड्याचे थोर राजकीय शास्त्रज्ञ ‘तानाजी’ही त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेले.
मुनी बारामतीत शिरले. तिथं थोरले काका भेटले नाहीत; मात्र बागेतील कारंज्याचे थुईथुई तुषार पाहून त्यांना साताऱ्याचा पाऊस आठवला. ‘राज-नर्गिस’ जोडीनं छत्रीचा ब्रॅण्ड गाजवला होताच, इथं तर या नेत्यानं चक्क पावसालाच ब्रॅण्ड केलंय, या विचाराने मुनी थरारले! मात्र शेवटपर्यंत मुनींना एक समजलं नाही, ज्या पावसानं अख्ख्या महाराष्ट्रात विरोधकांची क्रेझ धुऊन टाकली, तोच पाऊस ‘सातारा अन् कोरेगाव’मध्ये मात्र ‘थोरल्या काकां’ची माणसं पडण्यापासून का वाचवू नाही शकला?
‘मातोश्री’वर आदित्यराजेंनी आपला पेंग्विन ब्रॅण्ड बदलला नसावा, याची खात्री वाटल्यानं मुनी रस्ता चुकवून ‘कृष्ण कुंज’वर राजना भेटले. ‘मी रोज एक भूमिका बदलतो, त्यामुळं ब्रॅण्ड बिण्ड किस झाड की पत्तीऽऽ,’ म्हणत त्यांनी विषय बदलला. ‘ईडी’समोर रौतांचे संजयराव रागानं थरथरत उभे होते. त्यांच्या शिवराळ भाषेवर अत्यंत सभ्य शब्दांत टीकाटिप्पणी करण्यात चंदूदादा कोथरुडकर रमलेले. एवढ्यात त्या ठिकाणी नितेश मालवणकर अन् नाथाभाऊ जळगावकर हेही आले. पकपकाऽऽक कोंबडीच्या कलकलाटा-पेक्षाही राणेंचा गलबलाट टिपेला पोहोचला होता. नाथाभाऊंचाही आवाज वाढलेला उतरेना. तेव्हा ‘शिवराळ भाषा’ हाच या तिघांचा ब्रॅण्ड, हे ओळखून मुनींनी लांबूनच नमस्कार ठोकला आणि ते मार्गस्थ झाले.sachin.javalkote@lokmat.com