दृष्टिकोन : वाचन समृद्धीची रेषा मोठी करणारा ‘बुक मार्च’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 06:09 AM2019-12-24T06:09:40+5:302019-12-24T06:11:51+5:30

आजची पिढी पुस्तके व ग्रंथांपासून दुरावत चालली आहे

 'Book March' widening the lines of reading prosperity | दृष्टिकोन : वाचन समृद्धीची रेषा मोठी करणारा ‘बुक मार्च’

दृष्टिकोन : वाचन समृद्धीची रेषा मोठी करणारा ‘बुक मार्च’

Next

किरण अग्रवाल

जीवनमूल्यांच्याप्रेरणेचा मार्ग प्रशस्त होतो तो ज्ञानातून. हे ज्ञान मिळवायचे तर त्यासाठी वाचन हवे; पण हल्लीची पिढी नेमक्या या वाचनापासूनच दुरावत चालल्याने ज्ञानाधिष्ठित समाजव्यवस्था साकारण्याबाबत चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक ठरावे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ओढावणाऱ्या ताणतणावातून मुक्ती मिळवायची तर वाचनच अधिक श्रेष्ठ व सोयीस्कर ठरावे. कारण वाचनातून जे जीवनदर्शन घडते, जो आत्मविश्वास लाभतो वा जी प्रगल्भता येते ती अन्य कोणत्याही मार्गाने मिळू शकत नाही. म्हणूनच बालवयापासून वाचनाचे संस्कार होणे गरजेचे बनले आहे. याकरिता अभिनवतेने काही उपक्रमांची योजना करीत वाचन चळवळ वाढविण्यासाठी परिश्रम घेण्याची गरज आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या नाशकातून त्यांच्याच प्रतिष्ठानच्या साहाय्याने सुरू झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाकडेही त्याच दृष्टीने बघता यावे.

आजची पिढी पुस्तके व ग्रंथांपासून दुरावत चालली आहे. यामागे बदलती जीवनशैली नक्कीच आहे; परंतु या नवीन शैलीतील काही साधने मात्र अशी आहेत, जी वाचनाला पूरक म्हणता यावीत. विशेषत: तरुण पिढीच्या हाती आलेल्या अद्ययावत भ्रमणध्वनीत जणू ग्रंथालयच सामावलेले असते. त्यामुळे हवे ते पुस्तक मिळविण्यासाठी किंवा त्यासाठी ग्रंथालये धुंडाळण्यात जी एक हुरहुर असे व ते मिळाल्यावर लाभणारा अवर्णनीय आनंद, तो लयास जाऊ पाहतो आहे. ग्रंथालये वाढत आहेत; पण हाती पुस्तक घेऊन वाचण्याऐवजी नवीन पिढीचा ओढा ‘आॅनस्क्रीन’ वाचनाकडे वाढला आहे, परंतु त्यात वाचनाचा तो आनंद नाही व ते समाधानही; हे नक्की. म्हणूनच वाचकांच्या हाती व त्यांच्या दारी ग्रंथ पोहोचविण्याची व्यवस्था या योजनेद्वारे केली जात असते.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या साहाय्याने विनायक रानडे या ग्रंथप्रेमीने सुरू केलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने दशकपूर्ती साधली असून, जेथे जेथे मराठी वाचक आहे, तेथे तेथे ग्रंथ त्यांच्या दारी पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. वाचन संस्कृती वाढविण्याकरिता हातभार लावू इच्छिणाऱ्यांकडून आपल्या वाढदिवसानिमित्त कुसुमाग्रज प्रतिष्ठानला जी यथायोग्य देणगी दिली जाते त्या देणगीतून पंचवीस पुस्तकांची ग्रंथपेटी साकारून ती ठिकठिकाणी विनामोबदला उपलब्ध करून दिली जाते. शहरी वस्त्या, औद्योगिक वसाहती, आदिवासी पाडे, शाळा-महाविद्यालये, पोलीस स्थानके, रुग्णालयातील रुग्ण व तुरुंगामधील बंदिवानांसाठीदेखील या गं्रथपेट्या उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे सव्वादोन कोटी रुपयांची एक लाखाहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध झाली असून, महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक व भारताबाहेरही दुबई, नेदरलँड, अ‍ॅटलांटा, फिनलॅण्ड, आॅस्ट्रेलिया, मॉरिशस, सिंगापूर आदी पंधरा देशांमध्ये या योजनेचा विस्तार झाला आहे. मराठी साहित्याला सातासमुद्रापार नेऊन पोहोचविण्याचे कार्य या उपक्रमातून घडून येत असून, वाचन संस्कृती वर्धिष्णू राहण्याच्या दृष्टीने ही योजना मैलाचा दगड ठरत असल्याचे त्यास लाभणाºया प्रतिसादावरून लक्षात येते.
विशेष म्हणजे, ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम राबवताना यंदा दशकपूर्तीनिमित्त ‘बुक मार्च’चा अभिनव प्रयोग केला गेला. कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून निघालेल्या या ‘मार्च’ने कुसुमाग्रज स्मारकापर्यंतचा पल्ला गाठत वाचन वाढविण्याबद्दलची जनजागृती घडवून आणली. खरे तर असला बुक मार्च काढला जात असताना वाचकांची अभिरुची वाढविणारे सकस, दर्जेदार असे साहित्य येते आहे काय, असाही प्रश्न उपस्थित व्हावा. साहित्यकृतींच्या आवृत्तींवर आवृत्ती काढण्याचे भाग्य किती लेखकांना लाभते? यापूर्वी कसदार लेखनाला प्रकाशात आणणाºया प्रकाशन संस्थांची संख्या मोजकीच होती. आता गल्लीबोळात झालेल्या प्रकाशन संस्थांकडून ‘कुणीही या आणि पुस्तक छापून घ्या’, अशी योजना राबविली जात असल्याने भारंभर पुस्तकांचा मारा वाचकांवर होतो आहे. अर्थात, वाचक चोखंदळ असतो. त्यामुळे जे सकस आणि कसदार असते तेच टिकते. पुस्तके मोठ्या प्रमाणातबाजारात येत असली तरी त्यामुळे वाचक चळवळ जोमात आली, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. आजही वाचकांकडून छावा, स्वामी, ययाती यासारख्या पुस्तकांना मागणी असते. याचा अर्थ जे चांगले, दर्जेदार आहे, तेच खपते. बुक मार्चच्या माध्यमातून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने हेच दर्शविले. अशा उपक्रमांनी नव्या पिढीची वाचनक्षमता तर वाढावीच शिवाय, माय मराठीविषयी गोडीही वाढावी. त्यामुळे यातून वाचन समृद्धीची रेषा आणखी मोठी होण्याची अपेक्षा करता यावी.

(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)

Web Title:  'Book March' widening the lines of reading prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.