हादसों का शहर है...; मुंबईतील बोट दुर्घटना, अनेक प्रश्न अन् वास्तव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 08:06 IST2024-12-20T08:05:56+5:302024-12-20T08:06:00+5:30

२०२४ या सरत्या वर्षाच्या अखेरीस मुंबईकरांना दोन मोठे अपघात सहन करावे लागले.

boat accident in mumbai many questions and reality  | हादसों का शहर है...; मुंबईतील बोट दुर्घटना, अनेक प्रश्न अन् वास्तव 

हादसों का शहर है...; मुंबईतील बोट दुर्घटना, अनेक प्रश्न अन् वास्तव 

डोंगराळ किंवा वाळवंटी प्रदेशात वास्तव्य करणाऱ्यांना मुंबईतील समुद्रकिनाऱ्याचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत फिरायला येतात. मुंबईतील रहिवासी घाम पुसून पुसून कंटाळले की, उन्हाळ्यात काश्मीर, हिमाचल प्रदेश या डोंगराळ प्रदेशात फिरायला जातात. बुधवारी सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्यावरून एलिफंटा येथील गुंफा पाहण्याकरिता ‘नीलकमल’ या फेरी बोटीतून शंभर-सव्वाशे लोक निघाले होते. लहान मुले लाटा पाहून आनंदात होती. बाया-पुरुष सागरावरील मंद वाऱ्याने सुखावले होते. एवढ्यात नौदलाची स्पीडबोट सुसाट वेगाने येऊन या प्रवासी बोटीवर आदळली. क्षणार्धात बोटीला भगदाड पडले आणि ती उलटली. 

बोटीतून आकर्षक दिसणारा समुद्र लाटांवर तरंगतांना ‘काळ’ झाला. १३ जण या अपघातात मरण पावले. मागच्याच आठवड्यात सायंकाळच्या वेळी शेकडो लोक दिवसभर काबाडकष्ट करून कुर्ला येथून घरी परतत असताना बेस्ट उपक्रमाच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने लोकांना चिरडून गेली. आठजणांचा त्याच बळी गेला. अशा अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकार पाच लाख रुपये देते. दुर्घटनेत जबर जखमी झालेल्यांवर खासगी इस्पितळात उपचार केले व त्यांच्यावर एक-दोन शस्त्रक्रिया केल्या तरी मुंबई, ठाण्यातील खासगी इस्पितळे पाच लाखांपेक्षा जास्तच बिल करतात. मात्र त्याच दुर्घटनेत मेलेल्या जीवाचे मोल सरकारच्या लेखी पाच लाख आहे ही शोकांतिका आहे. 

मुंबई ते अलिबाग रस्तेमार्गे जाण्यापेक्षा अनेकजण समुद्रमार्गे प्रवास करतात. एलिफंटा हेही मुंबईकर व पर्यटकांचे लाडके पर्यटनस्थळ आहे. समुद्रमार्गे चालवल्या जाणाऱ्या बोटी, स्पीडबोटी, कँटमरान यातून किती प्रवासी वाहून न्यायचे, याचे निकष ठरलेले आहेत. परंतु गर्दीच्या वेळी असे निर्बंध धाब्यावर बसवून जास्त प्रवासी वाहून नेले जातात. नीलकमल बोटीची क्षमता ९० प्रवाशांची असताना त्यात ११२ प्रवासी भरले होते, असे निदर्शनास आले. नौदलाच्या स्पीड बोटी अशाच पद्धतीने वेगाने चालवल्या जातात, अशा तक्रारी प्रवासी बोटीचे मालक करीत आहेत. प्रवासी बोटीतून प्रवास करणाऱ्यांना लाइफ जॅकेट घालायला दिले नव्हते, अशी धक्कादायक माहिती उघड झाली. 

दुर्घटना घडल्यावर पाण्यावर तरंगणाऱ्या प्रवाशांना ही जॅकेट दिली गेली ही बाब अत्यंत संतापजनक आहे. यात बोटीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्या व व्यक्ती जेवढ्या दोषी आहेत तेवढेच प्रवासी अपराधी आहेत. अनेकदा प्रवाशांना लाइफ जॅकेट दिले व ते अंगावर चढवण्याची सक्ती केली तरी ते आवडत नाही. प्रवासी बोटीवरील कर्मचाऱ्यांना दुरुत्तरे करतात. अपवादात्मक घडणारी दुर्घटना आपल्याबाबत घडेल, अशी भीती अनेकांच्या मनाला शिवत नाही. 

‘चलता है’ हा मुंबईकरांचा परवलीचा शब्द झाला आहे. दाटीवाटीच्या रस्त्यावर पादचारी, दुचाकीचालक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत आणि बेस्टने ठेकेदारीवर चालवायला दिलेल्या बसचा चालक जेमतेम चार-पाच दिवसांचे प्रशिक्षण घेऊन बस रस्त्यावर घेऊन येतो. प्रवासी बोटीतील कर्मचारी प्रवाशांना लाइफ जॅकेट देत नाहीत, जास्त प्रवासी कोंबतात आणि नौदलाची स्पीड बोट कदाचित एखादा अल्पप्रशिक्षित अग्निवीर चालवत होता किंवा कसे ते माहीत नाही; पण दोन्हीकडून ‘चलता है’ हीच भावना असल्याने मग निरपराध जीव मरण पावतात. 

अत्यल्प मोबदला देऊन अल्पप्रशिक्षितांकडून कामे करून घेण्याचे दु:साहस आपल्याला त्रासदायक ठरत आहे. नौदलाची स्पीडबोट बिघडली होती. तिचे इंजिन खराब झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर अचानक बिघडले, असे आता नौदल सांगतंय. नौदलातील स्पीडबोटीचा चालक खरोखरच प्रशिक्षित होता का? स्पीडबोटीची दुरुस्ती झाली नसतानाही ती वेगात चालवली का? या प्रश्नांची उत्तरे नौदलास द्यावी लागतील. 

प्रवासी बोटीने अतिरिक्त प्रवासी कोंबून व लाइफ जॅकेट प्रवाशांना न देऊन केलेल्या अपराधाची त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. मुंबई ते अलिबाग, नवी मुंबई, एलिफंटा वगैरे सेवा पुरवणाऱ्या बऱ्याच बोटींचे मालक राजकीय पक्षांचे नेते आहेत. मागील आठवड्यात झालेल्या बेस्ट दुर्घटनेचे दु:ख व तीव्रता आपल्या लगेच विस्मरणात गेली. बोट दुर्घटनेची तीव्रताही कालांतराने कमी होईल. 

अशावेळी राजकीय वरदहस्त लाभलेले या बोटींचे मालक चौकशी अहवालात आपल्यावर ठपका येणार नाही, याचा चोख बंदोबस्त करण्याची दाट शक्यता आहे. २०२४ या सरत्या वर्षाच्या अखेरीस मुंबईकरांना दोन मोठे अपघात सहन करावे लागले. ये बम्बई शहर हादसों का शहर है... हे गीत हेच दुर्दैवाने वास्तव आहे.

 

Web Title: boat accident in mumbai many questions and reality 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.