दृष्टिकोन : पुरोगामी विचारांचा बळी घ्यायचा भाजपचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:09 AM2020-02-17T03:09:05+5:302020-02-17T03:12:07+5:30

भाजपने गेल्या वर्षी पेरियार यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या

BJP's Will try to victimize progressive thinking of left | दृष्टिकोन : पुरोगामी विचारांचा बळी घ्यायचा भाजपचा डाव

दृष्टिकोन : पुरोगामी विचारांचा बळी घ्यायचा भाजपचा डाव

Next

डॉ. सुभाष देसाई 

दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी १४ जानेवारीला तुघलक मासिकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना पेरियार संघटनेने १९७१ साली अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत काढलेल्या मिरवणुकीवर टीकाटिप्पणी केली. ‘त्या मिरवणुकीत हिंदू धर्माची बदनामी करण्यात आली होती’, असे भाष्य त्यांनी केले. या विधानामुळे तामिळनाडूत सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. १९७१ सालातील वादाचे भूत उकरून काढून भाजपला अयोध्येतील राम मंदिर प्रश्नाला बळ द्यायचे आहे. त्याचबरोबर रामस्वामी पेरियार यांच्या पुरोगामी विचारांना मूठमातीही द्यायची आहे. भाजपचा हा डाव यापूर्वीही दोन वेळा अंगलट आला आहे. आता रजनीकांत यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना गड जिंकायचा आहे. मात्र या कुटिल नीतीचा पाडाव पेरियार यांच्या अनुयायांनी केला आहे.

भाजपने गेल्या वर्षी पेरियार यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या व्यक्तिगत जीवनावर आक्षेपार्ह टिप्पणीचे टिष्ट्वट केले होते आणि त्यानंतर उडालेला सामाजिक विद्रोह पाहून त्यांनी ते लगेच मागेही घेतले होते. भाजपला प्रत्येक विरोधकाच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून वाद निर्माण करायचा असतो आणि त्यातून लोक किती जागृत आहेत याचा अंदाज घ्यायचा असतो. तसाच त्यांनी तामिळनाडूतही अंदाज घ्यायचा प्रयत्न केला आणि आताही सुरू आहे. रजनीकांत यांनी कार्यक्रमात म्हटले की, ‘पेरियार यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मिरवणुकीत हिंदू देवतांची विटंबना केली’ तर पेरियार गटाने रजनीकांत किती खोटे बोलताहेत, उलट मनुवाद्यांनी मिरवणुकीवर चपला कशा फेकल्या हे सगळे कथन केले. शेवटी हा वाद मद्रास हायकोर्टात गेला. यादरम्यान अनेक साक्षीपुरावे न्यायालयासमोर सादर झाले. वृत्तपत्रांच्या त्या वेळच्या अंकासह साक्ष काढण्यात आली. रजनीकांत मात्र आपल्या भूमिकेशी आजही ठाम आहेत. ते म्हणतात, मी मुळीच माफी मागणार नाही. २४ जानेवारीला रजनीकांतविरुद्धचा बदनामीचा खटला हायकोर्टाने काढून टाकला.
आता ६९ वर्षांच्या रजनीकांतना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यामुळे भाजपचा बौद्धिक गट, त्यांना नवे वाद उकरून काढण्यास प्रवृत्त करत आहे. मद्रास हायकोर्टाच्या निकालाने भाजपला तामिळनाडूत घुसखोरी करणे सोपे जाईल असे वाटते. पण डाव्या विचारांची तटबंदी त्यांना पाऊलही ठेवून घ्यायला तयार नाही. पेरियार यांच्या संघटनेचे उपाध्यक्ष काली पूर्ण गुंड यांनी खुलासा केला आहे की, ‘रजनीकांत हे धादांत खोटे बोलत आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे हिंदू देवतांची विटंबना वगैरे काही झाली नव्हती. आमच्याच मिरवणुकीवर हल्ला करणारे हे मनुवादी लोक होते. त्याबाबत रजनीकांत यांचे घोर अज्ञान आहे आणि आता भाजपला ते हवे आहेत. रजनीकांत यांचा भाजपच्या मदतीने तामिळनाडूत सत्ता स्थापन करण्याचा इरादा आहे.’

राजकीय विश्लेषकांच्या मते द्रविड संस्कृतीची पाळेमुळे दक्षिण भारतात फार सखोल रुजलेली आहेत आणि ती उखडून टाकण्यासाठी रजनीकांत यांचा वापर करून घ्यायचा हे हिंदुत्ववादी शक्तींनी ठरवले आहे. एम.जी. रामचंद्र आणि जयललिता यांनी कधीही धार्मिक भावनांना हात घातला नाही. परंतु ते नेहमी यशस्वी राजकीय पुढारी ठरले. एका वादातून दुसरा वाद निर्माण करण्यात भाजपचा हात धरणारे कोणी नाही. त्यांनी त्या वेळच्या दोन वृत्तपत्रांची साक्ष काढली. त्यात पेरियार यांच्या काही विधानांचे संदर्भरहित उतारे दिले होते. त्यात पेरियार यांच्या १९७१ च्या सभेत एक ठराव मंजूर झाला होता आणि त्यातील एक विधान चुकीच्या पद्धतीने भाजपने सादर केले होते. भाजपच्या या प्रचाराचा ताबडतोब टीव्ही चौकअप्पा यांनी ५ फेब्रुवारी १९७१ च्या हिंदू वृत्तपत्रांत इन्कार केला. त्यांनी असे म्हटले होते की, ‘अल्पवयीन मुलीला फूस लावणे हा फौजदारी गुन्हा मानण्यात यावा. पण भाजपने त्याचा संदर्भ रावणाशी लावला आणि पेरियार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.’ पुन्हा हा वाद मद्रास हायकोर्टात गेला. भाजपने या वादाचे भांडवल करून पेरियार हे हिंदू देव-देवतांची बदनामी करत सुटले आहेत असे म्हणून मतांचा जोगवा मागितला. यामुळे साऱ्या देशभर कोणाला देशभक्त आणि कोणाला देशद्रोही म्हणायचे, कुणाला हिंदू धर्माचे भक्त आणि कुणाला हिंदू धर्माचे विरोधी म्हणायचे याची सारी गणिते भाजपकडे तयार आहेत आणि त्याचा वापर करून प्रसारमाध्यमातून गोबेल्स पद्धतीने आपले राजकारण करायचे असेच सुरू आहे.

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

Web Title: BJP's Will try to victimize progressive thinking of left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.