भाजपाची खुमखुमी
By Admin | Updated: January 25, 2016 02:14 IST2016-01-25T02:14:11+5:302016-01-25T02:14:11+5:30
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची पुन्हा संधी मिळालेले खासदार रावसाहेब दानवे यांनी मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असे धाडसी

भाजपाची खुमखुमी
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदाची पुन्हा संधी मिळालेले खासदार रावसाहेब दानवे यांनी मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असे धाडसी विधान करून मित्रपक्ष शिवसेनेला चांगलेच डिवचले आहे. एखाद्या कथेमध्ये राजाचा जीव जसा पोपटाच्या कंठात असतो तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे अडकलेला आहे. भाजपाचा झेंडा फडकणार म्हणजे शिवसेनेची सत्ता जाणार असा सरळ अर्थ होतो़ युती सरकारमध्ये भाजपा मोठा भाऊ आहे़ मुंबई महापालिकेत मात्र शिवसेना मोठा भाऊ आहे.
भाजपाला नेमके हेच खटकते. दोन गुजराथी माणसांच्या अधिपत्याखाली असलेल्या या पक्षाला मुंबई महापालिकेची सत्तासुंदरी खुणावत आहे़ मुंबई हातात असण्याचे व्यवहारी फायदे सध्याच्या भाजपा नेतृत्वाशिवाय अधिक चांगले कोणाला समजतील़. कसेही करून महापालिकेतील सत्ता टिकवायचीच हा निर्धार केलेली शिवसेना आणि वाट्टेल ते करून सत्ता मिळवायचीच असा पण केलेली भाजपा असे दोन मित्रपक्षामधील द्वंद्वाचे रंग निवडणूक जवळ येईल तसतसे गहिरे होत जातील. विधानसभेत युती न केल्याने भाजपाला १२२ जागा मिळाल्या. युती केली असती तर आज जिंकल्या त्यापेक्षा फारतर १५ ते २० जागा जास्त लढायला मिळाल्या असत्या. त्या परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊच शकला नसता़ नेमका यशाचा हाच पॅटर्न मुंबईतही चालेल आणि वेगळे लढून शिवसेनेला मागे टाकता येईल असा भाजपाचा होरा आहे़ दानवेंचे विधान हे त्यातूनच आलेले दिसते. मुंबईतील हिंदी, गुजराथी आणि अन्य मराठीतर मतदारांच्या भरवशावर भाजपाचे गणित अवलंबून आहे. राज्यातील सत्तासूत्राप्रमाणे महापालिकेतही शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या की महापौर आपलाच असे भाजपातील काही नेत्यांना वाटते. आपल्याच जालना जिल्ह्यातील नगरपालिकाही वाचवू न शकणारे दानवे आता थेट मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवायला निघाले आहेत़ मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे तर शिवसेनेला ठोकून काढण्याची कुठलीच संधी सोडत नाहीत़ एकूणच भाजपाच्या नेतृत्वाला स्वबळाची खुमखुमी आली असून, ते दानवेंच्या तोंडून व्यक्त करीत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही शिवसेनेशी आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. विधानसभेत युती तुटली तेव्हा आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच प्रदेशाध्यक्ष होते. युती तोडण्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या मानसिकतेत आज भाजपाचा एकही बडा नेता दिसत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मार्गही कंटकमय दिसत आहे. राज्याच्या सत्तेतील दुय्यम स्थान, जिल्ह्याजिल्ह्यातील कमिट्यांवरील नियुक्त्यांमध्ये भाजपाकडून होत असलेली उपेक्षा, बाळासाहेबांच्या स्मारकाची कासवगती ही सगळी कुचंबणा सहन करून शिवसेना सत्तेला चिटकून आहे़ ही हतबलता जितक्या लवकर संपेल तितक्या लवकर महापालिकेत अडकून असलेला जीव शिवसेनेला पुढेही टिकवून ठेवता येईल़ राज्य असो की मुंबई महापालिका असो, जणू काही आपल्या दोघांनाच वाटून खायचे आहे या आविर्भावात वावरणाऱ्या भाजपा-शिवसेनेसाठी कॉँग्रेसने धोक्याची घंटा वाजवली आहे. कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदयात्रेला मुंबईत मिळालेला भरघोस प्रतिसाद लोकांच्या मनातून कॉँग्रेस गेलेली नाही हे सांगणारा आहे. गुरुदास कामत, संजय निरुपम, मिलिंद देवरा आदि मुंबईतील कॉँग्रेसचे नेते एकत्र बसले तर मोठे आव्हान उभे करू शकतात; मात्र सततच्या पराभवापासून कॉँग्रेस काहीही शिकलेली नसल्याने दैना कायम आहे. राहुल गांधी आले, त्यांनी वातावरण तयार केले आणि त्यांच्याबरोबर वातावरण उडून गेले तर त्यासारखा नेत्यांचा करंटेपणा दुसरा नसेल. कालपर्यंत मोदी मॅनियाच्या चेष्टेचे बळी ठरत होते ते राहुल गांधी मुंबईत येऊन गर्दी खेचतात हे बदलत असलेल्या हवेचे लक्षण दिसते. ‘अच्छे दिन’ दिसत नाहीत ही भावना वाढीस लागत आहे. मुंबईतील कॉँग्रेसच्या नेत्यांनी हे ओळखले तर राहुल गांधींना तिळगूळ खाऊ घालावा लागणार नाही.
- यदु जोशी