मुफ्ती वाढवताहेत भाजपाचा रक्तदाब

By Admin | Updated: March 9, 2015 23:21 IST2015-03-09T23:21:08+5:302015-03-09T23:21:08+5:30

मुफ्ती मोहम्मद सईद हा इसम दरदिवशी भाजपाचा रक्तदाब वाढवीत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ भाजपाच्या मदतीने घेतली तेव्हाच त्याने

BJP's blood pressure to increase Mufti | मुफ्ती वाढवताहेत भाजपाचा रक्तदाब

मुफ्ती वाढवताहेत भाजपाचा रक्तदाब

मुफ्ती मोहम्मद सईद हा इसम दरदिवशी भाजपाचा रक्तदाब वाढवीत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ भाजपाच्या मदतीने घेतली तेव्हाच त्याने पाकिस्तानसह काश्मिरातील दहशतवाद्यांचे आभार मानून भाजपाला त्याच्या भुवया उंचवायला लावल्या होत्या. हुरियत कॉन्फरन्स या दहशतवादी संघटनेच्या नेत्याला आपल्या मंत्रिमंडळात स्थान देऊन व त्याला भाजपाच्या मंत्र्यांच्या बरोबरीने बसवून त्याने भाजपाला दुसऱ्यांना खाली पहायला लावले होते. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना, संसदेवर हल्ला चढविणारा अफझल गुरू पोलिसांकडून पकडला गेला व त्याला देशाच्या न्यायव्यवस्थेने फाशीची शिक्षा सुनावली. मुफ्तींना या अफझलचे तिहारच्या तुरुंगात गाडलेले प्रेत काश्मिरात नेऊन त्यावर मजार उभारायची आहे. अफझलच्या या प्रकरणात भाजपाने आपली नाराजी लपविली नसली, तरी ती पुरेशी प्रगटही केल्याचे दिसले नाही. आता काश्मीरच्या तुरुंगात अडकलेल्या ज्या दहशतखोरांविरुद्ध अद्याप गुन्हे दाखल झाले नाहीत त्या साऱ्यांना सोडून देण्याचा निर्णय मुफ्तींनी घेतला असून, त्यामुळे भाजपाच्या पायाखालीच भूकंपाचे हादरे आले आहेत. मसरत आलम भट या काश्मीर मुस्लीम लीगच्या अध्यक्षाला तुरुंगातून सोडवून त्याच्या घरी सुखरूप पोहोचवून मुफ्तींनी भाजपाला संशयाच्या भोवऱ्यातच अडकविले आहे. मसरत भट या ४२ वर्षे वयाच्या दहशतखोरावर दहा लाखांचे इनाम आहे. २०१०मध्ये त्याने काश्मिरात घडवून आणलेल्या दंगलीत ११२ जण ठार झाले, तर शेकडो पोलीस त्यात जखमी झाले.
सुरक्षा यंत्रणा व पोलीस विभाग यांच्यावर हल्ले चढविण्याच्या अनेक योजना आखण्याचा व त्या अमलात आणण्याचा आरोप त्याच्या शिरावर आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली त्याला सहा वेळा अटक झाली असून, तो बराच उशिरा व पोलिसांची भरपूर दमछाक करून तुरुंगात डांबला गेला आहे. १८ आॅक्टोबर २०१० पासून तुरुंगात असलेल्या या मसरतला मुफ्तींच्या सरकारने निर्दोष सोडून त्याच्या श्रीनगरातील घरी सुखरूप पोहचविण्याची कामगिरी आता केली आहे. पाकिस्तान, हुरियत, दहशती संघटना व पूर्व पाकिस्तानातील हल्लेखोर या साऱ्यांविषयी सारखीच सहानुभूती व आत्मीयता असलेले मुफ्ती भाजपाच्या पाठिंब्याने काश्मीरचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि काश्मिरात आजवर झालेल्या दंगलीत भाग घेतलेल्यांना व पुढे तो घेऊ शकणाऱ्यांना शांत करायचे तर त्यांच्या जखमांवर असे मलम लावणे आवश्यक आहे असे ते देशाला सांगत आहेत. त्यांची सुकन्या मेहबूबा मुफ्ती ही त्यांच्या पक्षाची अध्यक्ष आहे आणि हे मलम प्रकरण तिनेच प्रथम उचलून धरले आहे. भाजपाची आतली गोची ही की मैत्रीच्या नात्याने मुफ्तीशी बांधले गेल्याने तो पक्ष मुफ्तींवर टीका करू शकत नाही आणि काश्मिरातील सरकारात टिकायचे तर मुफ्तीच्या कारवायांना त्याला विरोधही करता येत नाही. भाजपाची पितृसंघटना असलेल्या रा. स्व. संघाच्या मुखपत्राने मात्र ‘मुफ्ती भारताचे की पाकिस्तानचे’ असा सरळ प्रश्न यासंदर्भात विचारला असून, भाजपाची पंचाईत आणखी वाढवली आहे. शिवसेनेनेही मुफ्तींशी
भाजपाने केलेले मैत्र देशहिताच्या आड येणारे असल्याचे आपल्या मित्रपक्षाला ऐकविले आहे. मात्र भाजपाला अशा दुहेरी वाटचालीची व गुंत्याची सवय आहे. तो पक्ष अकाली दलासोबत पंजाबच्या मंत्रिमंडळात आहे आणि पंजाबचे बादल सरकार दर महिन्याआड एक ना एक देशविरोधी पाऊल उचलताना दिसले आहे. आॅपरेशन ब्ल्यू स्टार ही
देशाची अखंडता राखण्यासाठी आखलेली मोहीम त्या पक्षाने पंजाब व शीखविरोधी असल्याचे जाहीर केले आहे. त्या कारवाईत ठार झालेल्या साऱ्या दहशतखोरांना त्याने हौतात्म्याचा दर्जा दिला आहे. भिंद्रनवाले या दहशतवादी नेत्याची पूजा त्याने थेट सुवर्ण मंदिरातच चालविली
आहे. पुढे जाऊन इंदिरा गांधी व जनरल वैद्य यांची हत्त्या करणाऱ्या गुन्हेगारांना धर्मवीर म्हणून गौरविले आहे. हे सारे अकाली दलाकडून होत असताना, भाजपाने
त्याच्याशी आपली मैत्री घट्ट राखली आहे. आपापले धर्मवेड हे त्या दोन्ही पक्षांना एकत्र आणणारे व
देशाच्या धर्मनिरपेक्ष राजकारणापासून दूर राखणारे
सूत्र आहे. अकाल्यांनी काहीही करावे आणि भाजपाने
त्याकडे काणाडोळा करावा असेच राजकारण गेली काही वर्षे पंजाबात सुरू राहिले आहे. आता त्याचीच
पुनरावृत्ती काश्मिरात होत आहे. देशाने ज्यांना देशद्रोहाचे
गुन्हेगार ठरविले, संसदेवर हल्ला चढविण्याच्या आरोपावरून ज्यांना फाशीच्या शिक्षा सुनावल्या आणि ज्यांच्या डोक्यावर लाखोंचे इनाम लादले त्या दहशतखोरांविषयी मुफ्तींच्या पीडीपी-भाजपा सरकारला आलेला मैत्रीचा पुळका या पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा आहे. अकाली दलाने त्याच्या आनंदपूरसाहिब अधिवेशनात एक देशविरोधी ठराव मंजूर केला. त्यात
केंद्र सरकारकडे फक्त पाच विषयांचा कारभार असावा व बाकी सारे अधिकार राज्यांकडे असावेत अशी
मागणी केली. ही मागणी थेट मुस्लीम लीगने १९४५च्या सुमारास केलेल्या मागणीच्या धाटणीवरची आहे. ही मागणी अकाली दलाने अद्याप सोडली नाही.
हुरियत कॉन्फरन्सनेही त्याचा देशविरोधी पवित्रा
तसाच कायम ठेवला आहे. आश्चर्य याचे की, भाजपाने याही स्थितीत त्यांच्याशी आपली मैत्री कायम राखली आहे.

Web Title: BJP's blood pressure to increase Mufti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.