अंतर्गत मतभेदाने भाजपा बेजार

By Admin | Updated: February 11, 2017 00:19 IST2017-02-11T00:19:18+5:302017-02-11T00:19:18+5:30

जळगावात प्राबल्य असलेल्या भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र अंतर्गत मतभेदाने बेजार केले आहे. पालकमंत्री बदलाची मात्रादेखील प्रभावी ठरत नसल्याचे एकंदर चित्र आहे.

BJP tears under internal differences | अंतर्गत मतभेदाने भाजपा बेजार

अंतर्गत मतभेदाने भाजपा बेजार

जळगावात प्राबल्य असलेल्या भाजपाला जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र अंतर्गत मतभेदाने बेजार केले आहे. पालकमंत्री बदलाची मात्रादेखील प्रभावी ठरत नसल्याचे एकंदर चित्र आहे.
जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे तिरंगी लढत होत आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन आघाडी करण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन तालुक्यांत झालेली बिघाडी आणि दोन-चार जागांवरील मैत्रीपूर्ण लढती वगळता दोन्ही काँग्रेस एकदिलाने मैदानात उतरले आहेत. याउलट भाजपा-शिवसेना या केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषदेत युती म्हणून कारभार सांभाळणारे पक्ष कट्टर शत्रूसारखे एकमेकांवर तुटून पडले आहेत.
गेल्या २० वर्षांपासून जळगावची जिल्हा परिषद भाजपा-शिवसेनेच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही पक्ष निवडणूक स्वतंत्रपणे लढवितात आणि सत्तेसाठी एकत्र येतात. सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते २० वर्षांपासून जळगाव जिल्हा परिषदेत सुरू आहे. याठिकाणी भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. म्हणजे अध्यक्ष भाजपाचा तर उपाध्यक्ष शिवसेनेचा असतो. महत्त्वाची सभापतिपदे भाजपाकडे असतात. एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण पाच वर्षे चालते. निवडणुका आल्या की पुन्हा एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. दोन्ही पक्षांसह मतदारांनाही आता याची सवय झाली आहे. यंदाचा बदल एवढाच आहे की, भाजपा हळुहळू काँग्रेसच्या वाटेने जाऊ लागला आहे. बेदिली, बंडखोरी, पाडापाडी अशा बाबी कॉंग्रेसमध्ये गृहीत धरल्या जायच्या. परंतु ‘पार्टी विथ द डिफरन्स’ म्हणविणाऱ्या भाजपामध्ये तीन वर्षांत एवढा बदल होईल, असे वाटत नव्हते. दोन खासदार, सहा आमदार, दोन विधान परिषद सदस्य, सहकारी संस्थांवर वर्चस्व मिळविलेल्या भाजपामध्ये आयारामांची संख्या वाढली व महत्त्वाकांक्षी नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाला. नगरपालिका निवडणुकीत त्याचा पहिला अंक दिसून आला. एवढे होऊनही भाजपाला चांगले यश मिळाले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत मतभेदांना जाहीर स्वरूप येऊ लागले आहे. भुसावळात तिकीट नाकारल्याने पंचायत समिती सभापतीने कार्यालयातील आ. संजय सावकारे यांची प्रतिमा काढून टाकली. दुसरे आमदार उन्मेष पाटील यांच्याविरुद्ध माजी आमदार साहेबराव घोडे यांनी असंतुष्टांची मोट बांधत जाहीर तोफ डागली. निवडणूक वचननाम्यात आमदार उन्मेष पाटील यांचे छायाचित्रच न टाकल्याने आणि खासदारांच्या आधी विधान परिषद सदस्य असलेल्या जिल्हाध्यक्षांच्या पत्नी स्मिता वाघ यांचे छायाचित्र छापल्याने पक्षातील खदखद समोर आली.
भाजपाच्या नेतृत्वाची धुरा येथे एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सांभाळत आहेत. मंत्री, प्रदेश नेते आले की, खडसे पक्षाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. अन्यथा आपल्या मतदारसंघापुरते त्यांनी स्वत:ला सीमित करून घेतले आहे. महाजन यांच्याकडे नाशिक महापालिकेची जबाबदारी दिली असल्याने त्यांनी जळगावसाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. पाटील दोनदा तर मुख्यमंत्री एकदा येऊन गेले. शिवसेनेची धुरा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, सहसंपर्कप्रमुख के. पी.नाईक यांच्याकडे आहे. पाटील हे परभणीचे पालकमंत्री असल्याने ते तिकडेही लक्ष घालत आहेत. राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसतर्फे भाई जगताप हे नेतृत्व करीत आहेत. ६७ पैकी केवळ दोन सदस्य पुन्हा निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. गटाची फेररचना आणि आरक्षणात बदलामुळे ही पंचाईत झाली. अर्थात त्यावरही तोडगा काढण्यात आला. पत्नी, सून, वहिनी, भावजय यांना रिंगणात उतरविण्यात आले. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी नातलगांची वर्णी लावली आहे. जिल्हा परिषदेत शालेय गणवेश योजना, पोषण आहार योजना, पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहार गाजले. गुंडेवार समितीने कारभाराची चिरफाड केली. परंतु ठोस कारवाई झालेली नाही; मात्र हे मुद्दे निवडणुकीत उचलण्यात विरोधी पक्षदेखील कमी पडत असल्याने भाजपा-सेनेचे फावले आहे. नोटाबंदीचा परिणाम ग्रामीण भागात अजूनही जाणवत असल्याने त्याचा फटका भाजपा-सेनेला बसेल आणि दोघांमधील भांडणामुळे लाभ होईल, या आशेवर दोन्ही काँग्रेस आहेत.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: BJP tears under internal differences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.