‘भाजप’च दादा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:10 AM2018-08-04T03:10:16+5:302018-08-04T03:10:23+5:30

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे.

 'BJP is grandfather! | ‘भाजप’च दादा!

‘भाजप’च दादा!

Next

महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता ‘दादा’गिरी सुरू केली आहे. विशेषत: राज्यात सत्तेवर आल्यापासून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांकावर राहण्यात यश मिळविले आहे. सत्तेवर असण्याचा लाभ असतो. मात्र, त्यासाठी राजकीय चातुर्य वापरावे लागते. पक्ष संघटन आणि राज्यसत्ता यांचा समन्वय साधावा लागतो. तो उत्तमपणे सांभाळण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. यापूर्वी कॉँग्रेस आघाडीचे सरकार होते, तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस हा कनिष्ठ मित्रपक्ष असला तरी पक्षसंघटन आणि सत्तेचे पाठबळ याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात दबदबा निर्माण केला होता. त्याच जोरावर विधान परिषदेतही राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून वावरत होता. ती सर्व जागा आता भाजपने व्यापून टाकली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसची त्यासाठी धडपड आहे. मात्र सत्तेचे वलय संपले आहे. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देता येत नाही. भाजपने अनेक निवडणुका जिंकल्या. त्यापैकी काल पार पडलेल्या खानदेशातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकांची निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या. जळगाव आणि सांगलीच्या राजकारणावर योगायोगाने ‘दादा’ नावांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा दबदबा राहिला आहे. जळगाव नगरपालिका आणि नंतर महापालिकेवर ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचे कायम वर्चस्व राहिले आहे. जळगाव म्हणजे सुरेशदादा असेच समीकरण होते. या शहराला नवी ओळख त्यांनी दिली. मध्यंतराच्या काळात त्यांना विविध प्रकरणात राजकीय शह बसला. त्यात महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याने भाजपने उचल खाल्ली आणि संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व असताना शहरातील वर्चस्वासाठी त्यांनी प्रयत्न चालविले. परत एकदा राज्यसत्तेचा वापर करीत जळगावच्या विकासासाठीचे नवे मॉडेल देण्याचे आश्वासित केले. सातत्याची सत्ता असल्याने बदलासाठी मतदारांनी भाजपच्या आश्वासनाला साथ दिली, असाच त्याचा अर्थ निघतो. भाजपने इतर पक्षातील अनेक उमेदवार घेतले. त्यांच्या अनेक नेत्यांना विश्वासच नव्हता की, सुरेशदादा जैन यांच्याशी एकाकी लढत देता येईल, यासाठी शिवसेनेशी युती करण्याची तयारी चालली होती. त्यात एकनाथ खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन यांच्या वादाचा आडपडदा आला आणि युती झाली नाही. या सर्व घडामोडींचा लाभ मात्र गिरीश महाजन यांनी उठविला आणि जळगावच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. त्याला मुख्यमंत्र्यांचीही साथ होती. एकीकडे भाजपने एका ‘दादा’ला बाजूला केले, अन् खडसे यांनाही शह देत महाजनांना बळ देण्यात यश मिळविले. हा भाजपचा मोठा विजय आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही ‘दादा’ या नावाचा योगायोग होता. सांगली शहर आणि जिल्हा आजही वसंतदादा पाटील यांच्या नावाने ओळखतो. दादांना जाऊन आता तीन दशके होत आली तरी त्यांच्या नावानेच राजकारण होते. मात्र, त्यांच्या राजकारणातील लोककल्याणाची बाजू कुणी सांभाळत नाही. परिणामी, कॉँग्रेसची दिवसेंदिवस वाताहात होत चालली आहे. भाजपने हे अचूक ओळखले आणि नव्या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न केला. प्रारंभी त्यांना सर्व जागा लढविण्यास उमेदवार मिळत नव्हते; तरीही सर्व पक्षातील नाराजांना एकत्र करून सत्ता, संपत्ती आदींच्या बळावर कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आव्हान उभे केले. ‘दादां’च्या नावाला विरोध करणारे भाजपचे चंद्रकांत‘दादा’ यांच्यावर जबाबदारी सोपविली होती. हेच दादा जळगावचेही पालकमंत्री आहेत. कॉँग्रेस अंतर्गत गटबाजी, नेतृत्वाच्या धडाडीचा अभाव आदी कारणाने कॉँग्रेसने आव्हान उभेच केले नाही.

Web Title:  'BJP is grandfather!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा