केंद्रातील मोदी सरकार पाडण्यासाठी विरोधीपक्षांना फारशी खटपट करावी लागेल असे दिसत नाही, कारण हे सरकार पाडण्याची जबाबदारी प्रवीण तोगडिया, गिरिराजसिंह आदी हिंदुत्ववादी जहाल नेते; तसेच भाजपामधील तेलंगणातील नेते के. लक्ष्मण किंवा गोव्यातील भाजपाचे मंत्री ढवळीकर आदी प्रभृतींनी घेतलेली दिसत आहे. हे सर्व नेते दरदिवसाआड मोदी सरकारला अडचणीत आणणारी विधाने करून, सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडीत आहेत. हे कमी आहे म्हणून की काय ह्यअसे मित्र नकोत असे वाटायला लावणारे शिवसेनेसारखे मित्रपक्ष रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधवांच्या तोंडात चपात्या कोंबून संसदेत सरकारला अडचणीत आणण्याची व्यवस्था करीत आहेत. भारताची जागतिक दर्जाची टेनिसपटू सानिया मिर्झा हिला पाकिस्तानची सून म्हणून तिला तेलंगणची ब्रँड अँबॅसिडर करण्याला त्याच राज्यातील भाजपा नेत्याने आक्षेप घेतला आहे. एखाद्या भारतीय मुलाने अथवा भारतीय मुलीने परदेशी व्यक्तीशी विवाह केला म्हणून त्याला परकी हस्तक मानायचे ठरवले तर आज भारतातील अनेक तरुण-तरुणींना देशद्रोही ठरवावे लागेल. पण खरा मुद्दा तो नाही. खरा मुद्दा हा आहे की, मोदी सत्तेवर आल्यानंतर आजवर दबलेल्या हिंदू जातीयवादी शक्ती आता डोके वर काढू लागल्या आहेत आणि मोदी गुजरातचा जातीय अजेंडा कधी राबवतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच मोदी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून कधी घोषित करतात, याचे वेध गोव्याचे ढवळीकर यांना लागले आहेत. तोगडियांना मुस्लिमांनी आपली पायरी ओळखून वागावे असे वाटू लागले आहे. या एकापाठोपाठ येणार्या हिंदुत्ववादी मागण्यांमुळे मोदी सरकारची मात्र पंचाईत होत आहे. या मागण्यांना पाठिंबा द्यावा, तर हे हिंदू तालिबानी सरकारला डोईजड ठरण्याची भीती आहे आणि नाही दिला, तर ज्यांना राममंदिराचे आमिष दाखवून सत्ता मिळविली आहे, ते नाराज
होऊ न आणखीन नवनवे उपद्व्याप करणार. सानिया मिर्झा प्रकरणावर काय भूमिका घ्यावी, याबद्दल तर सरकारमध्ये बराच संभ्रम दिसून आला. के. लक्ष्मण यांच्या भूमिकेला भाजपात नव्याने आलेले सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला, तर मुख्तार अब्बास नकवी यांनी विरोध केला, तर मुरली मनोहर जोशी यांनी नरो वा कुंजरोवा भूमिका घेतली. शेवटी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचा झेंडा उंचावला आहे व ती आजच्या भारतीय तरुणाईच्या गळ्यातली ताईत आहे, त्यामुळे तिला पाकिस्तानी ठरविण्याची भूमिका अंगलट येऊ शकते, हे लक्षात आल्यावर प्रकाश जावडेकरांना संसदेत सारवासारव करावी लागली. सरकारकडे पूर्ण बहुमत असल्यामुळे सरकारची अब्रू वाचली, पण बहुमत नसते तर हे सगळे खेळ अंगाशी आले असते; पण पक्षातील जहाल आणि बाकी हिंदुत्ववादी यांना नेमकी या बहुमताचीच झिंग चाढली आहे. या बहुमताच्या जोरावर त्यांना काश्मीरचे ३७0 वे कलम रद्द करायचे आहे, राममंदिर बांधून काढायचे आहे, सानिया मिर्झासारख्या देशप्रेमी मुस्लिमांना पाकिस्तानी ठरवायचे आणि एके दिवशी भारत हे हिंदूराष्ट्र घोषित करायचे आहे. मोदी यांच्याविषयी अल्पसंख्यांमध्ये अविश्वासाची भावना आहे, असा या लोकसभा निवडणुकीतला भाजपाविरोधी पक्षांचा प्रचाराचा मुद्दा होता. हा मुद्दा खोडून काढणारे वर्तन करण्याऐवजी भाजपाचेच नेते व कार्यकर्ते हा मुद्दा खरा असल्याचे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे नक्कीच मुस्लिमांमधील असुरक्षिततेचे वातावरण वाढीस लागू शकते. सानिया मिर्झासारख्या नामवंत मुस्लिम खेळाडुंच्या राष्ट्रनिष्ठेविषयीच जाहीरपणे संशय व्यक्त केला जात असेल,
तर सामान्य मुस्लिमांची काय वाट लागेल, याची कल्पनाच केलेली बरी. मोदी सत्तेवर आल्यानंतर हे जे काही हिंदुत्ववादी नारे लागत आहेत, त्याबाबत स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशा वक्तव्यांवर त्यांनी मौन धरले तर या वक्तव्यांना त्यांची संमती आहे, असा अर्थ लावला जाईल. मोदी यांचे आतापर्यंतचे वर्तन भारताच्या पंतप्रधानाला साजेसे राहिले आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमाही बदलू लागली आहे. पण, तोगडिया, ढवळीकर, लक्ष्मण
प्रभृतींच्या बडबडीला त्यांनी आळा घातला नाही, तर त्याची झळ मोदी यांच्या प्रतिमेला बसल्यावाचून राहणार नाही, हे लक्षात घेतलेले बरे!