बिहार निवडणूक आणि त्यानंतर...
By Admin | Updated: November 21, 2015 04:19 IST2015-11-21T04:19:33+5:302015-11-21T04:19:33+5:30
बिहार निवडणुकीची धूळ आणि कल्लोळ हळू हळू कमी होत चालला आहे. पाच टप्प्यातली बिहार विधानसभा निवडणूक प्रचंड थकवणारी, प्रचंड कटुतेने आणि कल्लोळाने भरलेली होती.

बिहार निवडणूक आणि त्यानंतर...
- पवन वर्मा
(संसद सदस्य, संयुक्त जनता दल)
बिहार निवडणुकीची धूळ आणि कल्लोळ हळू हळू कमी होत चालला आहे. पाच टप्प्यातली बिहार विधानसभा निवडणूक प्रचंड थकवणारी, प्रचंड कटुतेने आणि कल्लोळाने भरलेली होती. या निवडणुकीत जदयु, राजद आणि कॉँग्रेसच्या महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे.
अशा प्रकारच्या विजयानंतर उत्साह नक्कीच भरभरून वाहत असतो पण त्याचबरोबर ही वेळ काहींसाठी आत्मपरिक्षणाचीसुद्धा असते. महागठबंधनचे हे यश आकस्मिक किंवा एकदाच घडणारी घटना असेल का? किंवा यात काहीतरी अप्रत्यक्ष पण मोठे निष्कर्ष होते ज्याचे परिणाम बिहारपर्यंतच मर्यादित नाहीत? भारतासारख्या अवाढव्य देशात निवडणुका उत्साहात पार पडत असतात पण त्यातल्या काही निवडणुकांचे तात्कालिक परिणाम पुढे दीर्घकाळ जाणवत असतात. बिहारच्या विधानसभेसाठी नुकतीच पार पडलेली निवडणूक या प्रकारात मोडते का, आणि मोडत असेल तर कारण काय? माझ्या मते महागठबंधनचा विजय हा सत्ताधारी भाजपासाठी एक नवा विरोधक येऊ घातल्याचा राजकीय संकेत आहे. या नवीन संकेतात काही निश्चित आणि निर्णायक घटकसुद्धा आहेत. त्यातला पहिला आणि महत्वाचा घटक म्हणजे सुशासन. भारतातले लोक त्यांच्या सत्ताधाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होण्याची दीर्घकाळ वाट बघण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्यांच्या मनात सुशासनाचे मूल्य मोठे आहे, सुदैवाने त्यांना नितीशकुमारांकडे सुशासनाचे कौशल्य दिसले आहे. नितीशकुमारांंनी आता बिहारच्या जनतेला वचन देऊन टाकले आहे की इतर गोष्टींवरचे प्राधान्य काढून ते त्यांचे सर्व लक्ष सात कलमी कार्यक्र माच्या अंमलबजावणीवर केंद्रित करणार आहेत. या कार्यक्रमात तरुणांपासून महिलांपर्यंत ठोस आणि मूर्त स्वरूपातील तरतुदींवर तसेच वीज, नळ पाणीपुरवठा आणि रस्ते बांधणीवर भर देण्यात आला आहे. ही कामे निश्चित कालावधीत आणि निवडणुकांपूर्वी जेवढ्या निधीची घोषणा करण्यात आली होती तेवढ्यातच करण्यात येणार आहेत. बिहारच्या जनतेलासुद्धा नितीशकुमार ही वचणे पूर्ण करतील यावर विश्वास आहे.
संकेतातील दुसरा आणि पर्यायी घटक आहे सामाजिक न्यायचे असाधारण महत्त्व. सुशासनाचा परिणाम म्हणून येणाऱ्या आर्थिक प्रगतीची फळे गरिबातल्या गरिबापर्यंत, दलितांपर्यंत आणि सर्व मागासलेल्या जाती-जमातींपर्यंत पोहोचली पाहिजेत. भारतासारख्या देशात न्यायासोबत प्रगतीची खात्री देणे अतिशयोक्ती ठरू शकते. दशकांपासून प्रगतीची वाटचाल सुरु आहे पण अजूनसुद्धा इथली मोठी जनसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली किंवा संदिग्ध स्वरूपात तिच्या अवती-भोवती जगते आहे. अशा पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय ही फक्त घोषणा ठरते. नितीशकुमार यांच्या प्रशासकीय नियोजनात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे त्यांचे कुठलेही प्रशासकीय धोरण किंवा नियोजन हे सामाजिक न्यायाच्या दिशेने असते. परिणामी त्यांच्या सुशासनाचे परिणाम समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचतात आणि सामान्यांच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून येतात. गेल्या दशकभरापासून मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या विरु द्ध लक्षणीय असंतोष नाही यातूनच ते स्पष्ट होते. गरीब आणि मागासवर्गीय लालूप्रसाद यांना सामाजिक सबलीकरणाचे प्रतीक मानतात ही बाब अजूनसुद्धा बऱ्याच लोकांना लक्षात येत नाही. याचमुळे नितीशकुमार यांना सलग पाठिंबा गरीब व मागासवर्गीयांकडून लाभला आहे. तिसरा घटक आहे धार्मिक आणि सामाजिक सौहार्द, ज्यात सर्वच भारतीयांचा सहभाग आहे. देशातले कुठलेच सुशासन किंवा आर्थिक प्रगती धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाला दुखवून यशस्वी झालेले नाही. भारतातील सर्वधर्मीयांनी नेहमीच शांतता, स्थैर्य, सौहार्द आणि सदिच्छांचा सामना केला आहे. भाजपाच्या धार्मिक धृवीकरणाच्या व सामाजिक विभाजनाच्या धोरणांना यथोचित प्रतिक्रि येची गरज आहे.
एकंदरच या पर्यायी राजकीय नमुन्यातून प्रशासनाला प्रभावी आणि मानवी चेहरा प्राप्त झाला आहे. शिवाय नरेंद्र मोदींच्या प्रशासन पद्धतीला सरळ विरोधसुद्धा प्राप्त झाला आहे. बिहार निवडणुकीचे महत्त्व असे की त्यातून नव्या राजकीय नमुन्याचा उदय झाला आहे. भविष्यात या नमुन्याला आणखी पाठबळ मिळवण्याचे आव्हान असणार आहे. राजकीय प्रक्रियांचे फलित दीर्घकाळाने समोर येत असते, ही नवी प्रक्रि या सध्या गर्भावस्थेत आहे म्हणून तिचा प्रत्येक टप्पा प्रगल्भ आणि काळजीपूर्वक असला पाहिजे. येणाऱ्या काळात आणखी काही राज्यांत निवडणुका होणार आहेत. भाजपाचे बळ इथेसुद्धा तपासले जाणार आहे. पण या निवडणुकात विरोधी पक्षांचे एकत्रीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
विरोधक विभागले गेले की फायदा भाजपालाच होत असतो, आणि भाजपासुद्धा उघड धार्मिक धृवीकरणाचे राजकारण करत असतो. बिहारमध्ये महागठबंधनच्या नेत्यांनी ऐक्य आणि प्रगल्भतेचे प्रदर्शन केले आहे. त्याचमुळे त्यांना भाजपला दारूण पद्धतीने हरवता आले. हा धडा आहे बिगर-भाजपा पक्षांसाठी जे बिहार निवडणुकीत खंबीरपणे उभे राहिले होते.