भांडारकर संस्था: सांस्कृतिक संचित

By Admin | Updated: July 14, 2016 02:31 IST2016-07-14T02:31:59+5:302016-07-14T02:31:59+5:30

भारतातच नव्हे, जगभरात नावाजलेली प्राच्य विद्येविषयीची नामांकित संशोधन संस्था असा भांडारकार प्राच्य विद्या संशोधन मंदिराचा लौकीक आहे

Bhandarkar Institute: Cultural Consolidated | भांडारकर संस्था: सांस्कृतिक संचित

भांडारकर संस्था: सांस्कृतिक संचित

भारतातच नव्हे, जगभरात नावाजलेली प्राच्य विद्येविषयीची नामांकित संशोधन संस्था असा भांडारकार प्राच्य विद्या संशोधन मंदिराचा लौकीक आहे. भारतीय साहित्याचा आणि ज्ञानशाखेचा अभ्यास करणाऱ्या पुण्यनगरीतील या संस्थेने नुकतेच शताब्दी वर्षात पदार्पण केले.
पुणे शहराला विद्येचे माहेरघर म्हटले जाते. अध्ययन-संशोधन यासाठी आॅक्सफर्ड-केंब्रिजप्रमाणेच देशी-विदेशी अभ्यासकांचे आवडते असे हे शैक्षणिक केंद्र, अशी पत आणि प्रतिष्ठा पुण्याने आजही जपली आहे. विशेषत: भारतविद्या, प्राच्यविद्या आणि संस्कृतविद्या यासाठी आजही पुणे निवडणे हे युरोपीय देशांना गरजेचे वाटते. पुण्याचे भूषण असलेली ही संस्था ॠषीतुल्य रामकृष्ण गोपाळ भांडारकर या प्राच्य विद्या संशोधक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वचिंंतक अशा व्यक्तिमत्वाच्या कार्यकर्तृत्त्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आली. भांडारकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या विद्यार्थी व हितचिंतकांनी त्यांच्याच नावे ती सुरू केली. संस्थेमध्ये महाभारत व संशोधन संकुल, हस्तलिखित साधनांचे ग्रंथालय, प्रकाशन, पदव्युत्तर अध्यापन व संशोधन आणि प्राकृत शब्दकोश असे पाच विभाग आहेत.
तत्कालीन मुंबई सरकारने वीस हजार हस्तलिखितांचा संग्रह संस्थेकडे स्वाधीन केला. त्याचप्रमाणे बॉम्बे संस्कृत अ‍ॅण्ड प्राकृत सिरीज या मालेमध्ये मुंबई सरकारने अनेक पुस्तके प्रसिद्ध करताना त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी भांडारकर संस्थेवर सोपविली. महाभारताच्या चिकित्सक संशोधित आवृत्तीच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचे काम हाती घेत तेरा हजार पृष्ठांचे महाभारताचे १९ खंड भांडारकरने प्रकाशित केले.
संशोधन कार्यास पूरक असे समृद्ध ग्रंथालय संस्थेचे भूषण आहे. यात वासुदेवशास्त्री व काशिनाथशास्त्री अभ्यंकर, पु. वि. बापट प्रभृती पंडितांनी संपादिलेली तीनशे प्रकाशने व त्याच बरोबरीने प्राचीन आणि दुर्मिळ अव्वल अशा हस्तलिखितांच्या पोथ्यांच्या समावेश आहे. मातीच्या विटांवर लिहिलेले ख्रिस्तपूर्व ६०० सालातील ताम्रपट, ताडपत्रींवर लिहिलेले दुर्मिळ हस्तलिखित अशांचा संग्रह पाहण्या-अभ्यासण्यासाठी जगभरातील संशोधकांची मांदियाळी येथे जमा होते.
प्राच्य विद्या अभ्यासक डॉ. रा. ना. दांडेकरांसारखे व्यासंगी, जिज्ञासू, चिकित्सक अभ्यासक पन्नास वर्षे संस्थेचे चिटणीस होते. त्याबरोबर डॉ. म. अ. मेहेंदळे, डॉ. सरोजा भाटे, डॉ. धडफळे ते सध्याच्या संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्यापर्यंत सर्व अभ्यासक, ग्रंथपाल, तज्ज्ञ संशोधकांनी अंत:करण ओतून या संचिताची उभारणी केली आहे. संस्थेतील दुर्मिळ अशा हस्तलिखित, प्रतिमांच्या तोडफोडीसारख्या काही अप्रिय घटनांचाही संस्थेस सामना करावा लागला. पण यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभारी घेत संस्था हा प्राच्य विद्येचा, संशोधनाचा डोलारा सांभाळत आहे. संस्थेने नुकतेच निधन झालेल्या डॉ. रा. चिंं. ढेरे यांच्या ग्रंथसंपदेचे जतन करणारा विभाग, डिजिटायझेशन आॅफ लायब्ररी हा महत्वाकांक्षी प्रकल्प याबरोबरच संकेत स्थळाचा विकास करण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. आज भौतिक विद्यांकडे संशोधनाचा कल वळू लागला आहे. काळाची पावले ओळखून आजच्या तंत्रज्ञानाचा लाभ भांडारकर संस्था घेत आहे. आधुनिक स्त्रोतांचा अवलंब करण्याचे पुरोगामित्व संस्थेमध्ये आहे. त्यामुळेच शताब्दी वर्षामध्ये जुन्या दुर्मिळ संग्रहांचे आधुनिक साधनांच्या वापरातून जतन करण्याबरोबरच तंंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या पिढीला आकर्षित करण्याचे आव्हान पेलण्यास सज्ज झालेली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था पुण्याचेच नाही तर अखिल भारताचे सांस्कृतिक संचित आहे. शताब्दी निमित्त अगणित शुभेच्छा !
- विजय बाविस्कर

Web Title: Bhandarkar Institute: Cultural Consolidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.