हिंदुत्वाच्या छत्रीखाली सर्वांना ओढण्याचे भागवतांचे विजयादशमी बौद्धिक!
By Admin | Updated: October 25, 2015 01:24 IST2015-10-25T01:24:05+5:302015-10-25T01:24:05+5:30
हिंदू संस्कृती खरंतर देशातल्या विविधतांचा स्वीकार व सन्मान करते. सहिष्णुतेचा पुरस्कार करते. बहुतांश हिंदूंना भागवतांच्या रा.स्व. संघाला अभिप्रेत असलेले कट्टरपंथी हिंदुत्व मान्य नाही.

हिंदुत्वाच्या छत्रीखाली सर्वांना ओढण्याचे भागवतांचे विजयादशमी बौद्धिक!
- सुरेश भटेवरा (राजपथावरुन)
हिंदू संस्कृती खरंतर देशातल्या विविधतांचा स्वीकार व सन्मान करते. सहिष्णुतेचा पुरस्कार करते. बहुतांश हिंदूंना भागवतांच्या रा.स्व. संघाला अभिप्रेत असलेले कट्टरपंथी हिंदुत्व मान्य नाही. याचे मुख्य कारण राज्यघटनेने स्वीकारलेल्या सेक्युलर तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा व विश्वास आहे.
रा.स्व. संघाच्या स्थापनेला यंदा ९0 वर्षे पूर्ण होत आहेत. इतकी वर्षे लोटल्यानंतरही हिंदुत्वाचा आणि हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणाऱ्या संघाला समाजात हे स्थित्यंतर का घडते आहे, त्याचे उत्तर बहुधा सापडलेले नाही. आपल्या भाषणात शेवटी भागवतांनी सर्वांना संघाचे स्वयंसेवक होण्याचे आवाहन केले. संघाचा अशा प्रकारे विस्तार करण्यापेक्षा आपल्या चिंतनाचा, वृत्तीचा आणि मनाचा विस्तार संघाने केला तर तो अधिक श्रेयस्कर ठरेल.
भागवतांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तोंड भरून प्रशंसा केली आहे. ‘साहेब वाक्यम् प्रमाणम्’ असा खास उल्लेख करीत, या ब्रिटिशकालीन संस्कृतीचा त्याग करण्याचा सल्लाही जनतेला त्यांनी दिला आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान मोदींचे वर्तन भागवतांच्या या सल्ल्याच्या नेमके विरोधात आहे. सरकार आणि पक्षात मोदींचे अघोषित वर्चस्व आहे.
राजधानीच्या वातावरणात फुटकळ गोष्टींबाबतही सर्वांनी मोदींना घाबरलेच पाहिजे, असा अलिखित संकेत पदोपदी जाणवतो. तो खरोखर कौतुकास पात्र आहे काय? याचा विचार भागवतांनी जरूर केला पाहिजे. केंद्रात मोदींचे सरकार सत्तेवर आल्यापासून देशातल्या तमाम अल्पसंख्य समाजांमधे भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. याच प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी देशातल्या २७पेक्षा अधिक मान्यवर लेखक साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले, ही घटना ताजी आहे. पंतप्रधान मोदी अजूनही या विषयावर गप्प आहेत.
सत्तेचा वापर करून संस्थांची नावे बदलली, इतिहासाच्या ओळी बदलल्या, तरी अव्याहतपणे चालत आलेली समंजस, उदार भारतीय संस्कृती अचानक कशी बदलेल? याचा विचार संघाच्या चिंतनात जाणवत नाही. काळाच्या ओघात सारे जग बदलते आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबांमधे आंतरजातीय विवाहांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अशा विवाहांच्या दोन पिढ्यांनंतर जन्मलेल्या अपत्यांचा धर्म नेमका कोणता? तरूण पिढी याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडायला तयार नाही. धर्माची संकल्पनाच येत्या काही वर्षांत कालबाह्य ठरेल अशी एकूण स्थिती आहे.
रा. स्व. संघाच्या विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मुख्य भाषण झाले. अपेक्षेनुसार हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करीत, सर्वांना हिंदुत्वाच्या छत्रीखाली आणण्याचा सूत्रबद्ध प्रयोग तर त्यांनी केलाच त्याचबरोबर समर्थ भारत घडवण्यासाठी जगभर आदराचे स्थान (!) प्राप्त केलेल्या रा.स्व. संघाचे स्वयंसेवक व्हा, असे सार्वजनिक आवाहनही त्यांनी सर्वांना केले. दूरदर्शन वाहिनीवरून सलग दुसऱ्या वर्षी या बौद्धिकाचे थेट राष्ट्रीय प्रसारण झाले. भागवतांच्या या बौद्धिकाचे देशभर तऱ्हेतऱ्हेचे पडसाद उमटले.
भागवतांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यकुशलतेचा गौरव केला. सनातन काळातल्या हिंदू संस्कृतीचा उल्लेख करीत संघाला अभिप्रेत असलेल्या हिंदुत्वाचा गौरवही त्यांनी सांगितला, याबद्दल कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. तथापि कोणत्याही सांस्कृतिक परंपरेचे कायद्याने परिवर्तन शक्य नाही, याचे उदाहरण देताना, जैन धर्मीयांचा उल्लेख कटाक्षाने त्यांनी ‘जैन पंथ’ असा केला. परंपरेने चालत आलेल्या जैनांच्या जीवनक्रमात व चिंतनात कोणतीही छेडछाड करण्यापूर्वी या पंथांच्या आचार्यांशी विचारविनिमय करावा, असा सल्लाही त्यांनी भारतीय न्यायालयांना दिला. जैनांबाबत भागवतांच्या उल्लेखावर आक्षेप नोंदवताना एक महत्त्वाची बाब स्पष्टपणे इथे नमूद करावीशी वाटते की भारतीय राज्यघटनेनुसार जैन, बुद्ध आणि शीख हे मूलत: स्वतंत्र धर्म आहेत. केवळ धर्मच नव्हे, तर त्यांची संस्कृती, जीवनपद्धती, तत्त्वज्ञान, परंपरा असे सारेकाही सनातन हिंदू संस्कृतीपेक्षा वेगळे आहे.
वैदिक ब्राह्मण समाजाच्या निर्मितीच्या कितीतरी अगोदर जैन व बुद्ध हे धर्म म्हणून अस्तित्वात होते. भारतातल्या विविध राज्यांतली उच्च न्यायालये व सर्वाेच्च न्यायालयाने १०पेक्षा अधिक खटल्यांच्या निकालात ही बाब स्पष्टपणे मान्य केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ३ सप्टेंबर १९४९ रोजी केलेल्या भाषणात तसेच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ विश्लेषण २ मध्येही त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भारतीय राज्यघटनेला व देशाच्या सर्वाेच्च न्यायालयालाही जी बाब मान्य आहे ती रा.स्व. संघाच्या विस्तारवादी हिंदुत्वाच्या दृष्टिकोनाला मात्र मान्य नाही, हे भागवतांच्या ताज्या भाषणात पुन्हा एकदा जाणवले. देशातल्या अल्पसंख्य धर्मीयांना बळजबरीने हिंदुत्वाच्या छत्रीखाली ओढण्याचा भागवतांचा हा अट्टाहास, संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या ‘विचारधन पान क्रमांक ९८’ (बंच आॅफ थॉटस् चा मराठी अनुवाद) याला अनुरूपच आहे.
विजयादशमीच्या भाषणात भाषा, प्रांत, पंथ आणि पक्षाच्या विविधतेचा भागवतांनी उल्लेख केला मात्र धर्म हा शब्द त्यांनी कटाक्षाने टाळला.
जैनांचे पर्युषण पर्व आणि संवत्सरी प्रतिवर्षी साधारणत: सप्टेंबर महिन्यात येते. या काळात देशातल्या तमाम जैन स्थानकात व मंदिरांमधे हा सोहळा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होतो. अहिंसा हे जैनांचे मूळ तत्त्वज्ञान. अहिंसेविषयी आदर व्यक्त करण्यासाठी या काळात देशभरातले कत्तलखाने एक-दोन दिवसांसाठी वर्षानुवर्षे स्वेच्छेने बंद ठेवण्यात येतात. मुख्यत्वे अनेक मुस्लीम बांधवही त्यासाठी पुढाकार घेतात. कोणत्याही जैन संघटनेने मागणी केली नसताना यंदा गोहत्या बंदीचा विषय पुढे करीत भाजपा व संघाच्या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनी या विषयाला हिंसक शस्त्र बनवले. हा विषय इतका वाढला की गोहत्येच्या अफवेचे निमित्त पुढे करून दिल्लीजवळच्या दादरीत अखलाख नामक मुस्लीम बांधवाला ठार करण्यात आले. विहिंपच्या तोगडियांनी तर भारतात गायीचे मांस खाणाऱ्यांना ऐन दसऱ्याच्या दिवशी सज्जड धमकीच दिली आहे. भारतातल्या मुस्लिमांचे पूर्वजही हिंदूच होते हा तर रा.स्व. संघाचा जुना दावा. विश्व हिंदू परिषदेने वारंवार त्याचा पुनरुच्चार केला आहे. गिरीराजसिंग, निरंजन ज्योतींसारखे केंद्रीय मंत्री, अवैधनाथ, साक्षी महाराज यांच्यासारखे खासदार, संघपरिवारातल्या साध्वी प्राची, साध्वी ॠतंबरा, अशोक सिंघल, (ही यादी तशी बरीच लांबलचक आहे) यांची वेळेवेळची प्रक्षोभक वक्त्यव्ये आगीत आणखी तेल ओतत आहेत. त्यांना गप्प बसवण्याचा समंजस सल्ला भागवतांनी आपल्या भाषणात काही दिला नाही. रा.स्व. संघ असो की पंतप्रधान मोदी कोणीही त्याचे आजवर खंडनही केले नाही.
हिंदू संस्कृती खरंतर देशातल्या तमाम विविधतांचा स्वीकार व सन्मान करते. सहिष्णुतेचा पुरस्कार करते. जनगणनेनुसार भारतात जवळपास ७८ ते ८0 टक्के लोक हिंदू आहेत. यापैकी बहुतांश हिंदूंना भागवतांच्या रा.स्व. संघाला अभिप्रेत असलेले कट्टरपंथी हिंदुत्व मान्य नाही. याचे मुख्य कारण राज्यघटनेने स्वीकारलेल्या सेक्युलर तत्त्वज्ञानावर त्यांची श्रद्धा व विश्वास आहे. देशाच्या आरक्षण व्यवस्थेची समीक्षा करण्याचा आग्रह भागवतांनी मध्यंतरी दोनदा जाहीरपणे बोलून दाखवला. दलित, आदिवासींसह तमाम मागास समाजांमधे तेव्हापासून अस्वस्थता व चिंतेचे वातावरण आहे. बिहारच्या निवडणुकीत तर हा मुद्दा अक्षरश: ऐरणीवर आला आहे. महाडच्या चवदार तळ्याचा आणि नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अंतत: बौद्ध धर्म का स्वीकारावासा वाटला, त्याचा इतिहास तपासला तर अस्पृश्यतेचा पुरस्कार करणाऱ्या तत्कालीन हिंदू कट्टरपंथियांच्या आक्रमक वर्तनात त्याचे उत्तर जरूर सापडेल. भारतात जन्मलेला बौद्ध धर्म चीन, जपान, मंगोलिया, श्रीलंकासह जगभर अनेक देशांत पोहोचला. नेपाळ हे जगाच्या पाठीवरचे एकमेव घोषित हिंदू राष्ट्र, त्यानेही अलीकडेच हिंदू राष्ट्राचे बिरूद सोडून सेक्युलर तत्त्वज्ञान स्वीकारले. हे वास्तव संघाला कधी जाणवलेच नाही, असे कसे म्हणता येईल? धर्मांतराला विरोध करण्याच्या मोहिमेखाली ख्रिश्चनांचे अनेक चर्च, अहवा डांग भागात उघड्यावर क्रॉस लावलेली प्रार्थनास्थळे कोणी तोडली? याची उत्तरेही साऱ्या देशाला ठाऊक आहेत.
हिंदूंखेरीज अन्य धर्मीयांना अशी सापत्न वागणूक का दिली जाते?