हिंदू असणं पाप नाही; पण..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 04:04 AM2019-12-28T04:04:44+5:302019-12-28T04:05:16+5:30

नागरिकत्वाच्या अनुषंगाने मतप्रदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदू

 Being a Hindu is not a sin; But ..! | हिंदू असणं पाप नाही; पण..!

हिंदू असणं पाप नाही; पण..!

Next

डॉ. रविनंद होवाळ

नागरिकत्वाच्या अनुषंगाने मतप्रदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंदू असणे पाप आहे का, असा सवाल नागपुरातून जाहीरपणे विचारला आहे. नागपुरातील मोर्चादरम्यान आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही. समाजातून अस्पृश्यता व जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राम मंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याने ठेवली होती. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. आजवर आपल्या देशाने जगाला सहिष्णुता शिकवली आहे. हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे. मतांच्या राजकारणातून संभ्रम निर्माण केला जात आहे, अशा आशयाची टीका गडकरींनी केलेली आहे. त्या टीकेला उत्तर दिले जाणे क्रमप्राप्त आहे व ते आपले कर्तव्यही आहे.
आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही, असे गडकरी म्हणतात. अनेक जण असे म्हणतात. पण कोण या विधानाशी कितपत प्रामाणिक राहतो, हे मोजण्याचे आपल्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे कोणी आम्ही जाती मानत नाही, असे म्हटले की आपल्याला अनेकदा गप्प राहावे लागते. या गप्प राहण्यातून प्रश्न सुटलेला नाही, हे मात्र नक्की! जाती मानत नाही, असे म्हणत असताना जाती नामशेष करू पाहणारांची तळी आपण उचलून धरतो, की त्या मजबूत करू पाहणारांची, हा प्रश्न मात्र इथे महत्त्वपूर्ण ठरतो! जाती शिल्लक ठेवून त्या न मानण्याचा दावा करणे व जाती मुळापासूनच नामशेष करण्याचा प्रयत्न करणे या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. यातील पहिल्या गोष्टीत दगाबाजी व फसवणुकीला वाव राहतो. त्यामुळे आम्ही जातीय भेदाभेद मानत नाही, या मुद्द्यावर आम्ही समाधानी राहू शकत नाही. आम्ही जाती नामशेष करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, या म्हणण्याने आम्ही थोडेफार समाधानी होऊ शकू; कारण इथेही पुन्हा कथनी आणि करणीतील फरकाचा मुद्दा शिल्लक राहतोच!

समाजातून अस्पृश्यता आणि जातीयवाद दूर करायचा आहे, असेही गडकरी म्हणत आहेत. त्यांना याबाबत असा प्रश्न आहे की, अस्पृश्यता तर भारतीय संविधानाने १९५0 सालीच कायदेशीरपणे रद्द केलेली आहे. आज या गोष्टीला सत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत. तरीही अजून या देशातील अस्पृश्यता जर संपलेली नसेल व तिला दूर करण्याची त्यांची किंवा त्यांच्या पक्षाची खरेच इच्छा असेल, तर मग या सत्तर वर्षांत ती संपू न शकण्यास कोण मंडळी कारणीभूत होती किंवा आहेत, याचा शोध गडकरींनी घेतला पाहिजे. स्वत:ला हिंदू समजणारीच काही मंडळी मोठ्या प्रमाणात या गोष्टीमागे आहे, हे आम्हाला तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ दिसत आहे. राम मंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याने ठेवली, असे गडकरी म्हणतात. ती कोणीही ठेवली असली, तरी अनुसूचित जातीच्या व्यक्तीने ती ठेवली, असे गडकरींना का सांगावे लागत आहे? चांगली कामे स्वत: करावी व वाईट कामे इतरांच्या हातून करून घ्यावीत, हा नकारात्मक राजकारणातला एक धडा आम्हालाही ऐकून माहीत आहे. इतर सर्व ठिकाणी अनुसूचित जातींचा क्रमांक शेवटी लागत असताना इथे मात्र पहिला क्रमांक लागावा, हा केवळ योगायोग कसा? शंबुकाची कथा माहीत असलेल्या बहुजनातील कोणत्या व्यक्तीच्या मनात याबाबत शंका उत्पन्न होणार नाही?

हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, असे गडकरी म्हणतात. हे साफ चुकीचे आहे. हिंदुत्व हे भारताचे राष्ट्रीयत्व कधीच बनू शकत नाही. भारतीयत्व हेच केवळ भारताचे राष्ट्रीयत्व बनू शकते. तुम्ही म्हणता, म्हणून सर्व भारतीय लोक स्वत:ला हिंदू म्हणवून घेणार नाहीत. शिवाय हिंदुत्व म्हणजे काय, याबाबत स्वत:ला हिंदू समजणाऱ्या भारतीयांचेही एकमत नाही. मी हिंदू म्हणून जन्मलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी शपथ घेणाºया डॉ. आंबेडकरांचा व त्यांच्यासारख्या कोट्यवधी भारतीयांचा हिंदुत्ववादी विचारसरणीने किती मोठा छळ केला, याकडे गडकरी किंवा त्यांचा पक्ष दुर्लक्ष करीत असला, तरी सर्व भारतीय याकडे दुर्लक्ष करू शकणार नाहीत. अगदी सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा याकडे दुर्लक्ष करू इच्छित नाहीत व त्यामुळेच तुमचे हिंदुत्व व आमचे हिंदुत्व वेगळे, असे त्यांनी भाजपला जाहीरपणे सुनावलेले आहे. कोणी कोणत्या धर्म किंवा जातीत जन्म घ्यायचा याचा निर्णय कोणाच्याही हाती असत नाही. त्यामुळे हिंदू असणे हा गुन्हा ठरत नाही व मुसलमान किंवा इतर कोणी असणे हाही गुन्हा ठरत नाही. पाप ठरत नाही. परिस्थितीचा गैरफायदा घेणे, हे मात्र पाप ठरू शकते. हिंदू समाजाच्या धार्मिक पुढाऱ्यांनी धर्मग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या त्यांच्या काही विषमतावादी धर्मग्रंथांतील विषमतावादी मजकूर अजूनही अधिकृतपणे रद्दबातल केलेला नाही.

उदा. मनुस्मृती! अजूनही काही हिंदू मंडळी या ग्रंथाचा आदर्श ग्रंथ म्हणून उल्लेख करतात. अशा ग्रंथांचा प्रभाव भारतीय संविधानाने तेराव्या कलमातून कायदेशीरपणे शून्य केलेला असला, तरी स्वत:ला हिंदू समजणाºया काही धार्मिक मंडळींनी मात्र या उद्घोषणेचे गांभीर्य आणि महत्त्व अजून लक्षात घेतलेले नाही. त्यांनी भारतीय संविधानालाच विरोध करण्याची आडमुठी भूमिका घेतलेली आहे. स्वतंत्र भारतात हा प्रश्न त्यामुळेच अजूनही संघर्षाचे एक कारण बनलेला आहे. त्यामुळे अशा गोष्टींबाबत न्याय्य किंवा नि:संदिग्ध भूमिका न घेता हिंदू असणे हे पाप आहे काय, असा मोघम प्रश्न उपस्थित करणे, हे मात्र नक्कीच एक मोठे पाप आहे!

(लेखक शोषणमुक्त भारत अभियानाचे  प्रवर्तक आहेत)

Web Title:  Being a Hindu is not a sin; But ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hinduहिंदू