भुजबळ असल्यानेच!

By Admin | Updated: April 25, 2016 03:35 IST2016-04-25T03:35:21+5:302016-04-25T03:35:21+5:30

सध्या हवा पालटासाठी मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात गेलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा संबंध असल्यानेच या प्रकरणाचा बराच गवगवा होतो आहे

Being Bhujbal! | भुजबळ असल्यानेच!

भुजबळ असल्यानेच!

सध्या हवा पालटासाठी मुंबईच्या आॅर्थर रोड कारागृहात गेलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा संबंध असल्यानेच या प्रकरणाचा बराच गवगवा होतो आहे. एरवी भुजबळांच्या बाबतीत जे झाले ते संपूर्ण राज्यात अगदी सरसकट होत आले आहे व होतेही आहे; पण सरकारला जर त्याची जाणीव नसल्यास एक तर सरकार ‘सरकार’ म्हणून काम करण्यास अपात्र आहे वा डोळेझाक करीत राहण्याची याच नव्हे तर सर्व सरकारांनी स्वत:ला सवयच जडवून घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने भुजबळांना अटक केल्यानंतर कारागृहात डांबून ठेवण्याआधी त्यांची संपूर्ण शारीरिक तपासणी करून घेतली होती. तरीही वातावरण आणि विशेषत: ऐशोआराम यांच्यातील बदल व उतरणीस लागलेले वयोमान लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीत चढउतार होणे तसे नैसर्गिकच मानावे लागेल! त्यातूनच रक्तदाब, मधुमेह आणि अस्थमा हे कायमस्वरूपी विकार त्यांची साथ करीत असतात असे म्हणतात. परिणामी मध्यंतरी त्यांचा रक्तदाब अचानक वाढला व त्यावर औषधोपचारही झाले. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून न्यायालयाने त्यांना काही सवलतीदेखील बहाल केल्या होत्या. याशिवाय खुद्द कारागृहात रुग्णसेवेची कायमस्वरूपी व्यवस्था असतेच. असे असताना कारागृहातील एका डॉक्टरने भुजबळांना मुंबईतील सेण्ट जॉर्ज रुग्णालयात हलविण्याची शिफारस केली व तशी व्यवस्थाही झाली. सेण्ट जॉर्ज रुग्णालय विशेषत: मंत्रिगण आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकारी यांच्याच सेवेत असते व इतरेजनांसाठी जेजे, जीटी किंवा तत्सम रुग्णालये असतात हे येथे लक्षात घ्यावयाचे. कसेही झाले आणि आज एक संशयित आरोपी असले तरी भुजबळ अखेर राज्यातील एक बलदंड नेते आहेत. त्यामुळे इतर रुग्णांची जरी नाही तरी त्यांची सेवा आणि तीदेखील त्यांच्या इतमामाला साजेशी अशीच करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे असे मानून संबंधित डॉक्टरने त्याच्या सेवाधर्माचे पालन केले असावे. पण तेच आता त्याच्या अंगलट येईल असे दिसते. त्याचीही काही कारणे आहेत. मुळात भुजबळांना रक्तदाब, मधुमेह वा हृदयविकार नव्हे तर म्हणे साधी दात वा दाढदुखी छळत होती. पण संबंधित दयावान डॉक्टरने कागदपत्रांमध्ये म्हणजे केसपेपरमध्ये हेराफेरी करून भुजबळांना उपकृत केले असा त्याच्यावर वहीम आहे. तो त्याने साफ झिडकारला आहे, हे वेगळे. पण पुन्हा मूळ मुद्द्यापाशी यायचे तर भुजबळांच्या बाबतीत जे झाले ते काही न भूतो श्रेणीत बसणारे नव्हे. अत्यंत खतरनाक आणि कठोर शिक्षा भोगणारे कैदीदेखील अशीच परमविशिष्ट सेवा कारागृहातील डॉक्टर्स आणि त्यांच्याशी हातमिळवणी केलेले सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स यांच्यातील सेवाभाव जागृत करून पदरात पाडून घेत असतात. ते जर सरकारला चालते आणि त्याविषयी साऱ्यांची अळीमिळी असते, तर मग कच्च्या कैद्यातील एका बिचाऱ्या पक्क्या राजकारण्याला जराशी सवलत मिळाली तर इतके काहूर का बरे उठावे? पवार-भुजबळ सतत ज्याचा उल्लेख करतात तेच हे सुडाचे राजकारण तर नव्हे?

 

Web Title: Being Bhujbal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.