सौंदर्याचे स्तोत्रकार
By Admin | Updated: August 4, 2016 05:26 IST2016-08-04T05:26:08+5:302016-08-04T05:26:08+5:30
कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल.

सौंदर्याचे स्तोत्रकार
कला आणि सौंदर्य यांचे एकमेकांशी अभेद्य नाते आहे. सौंदर्याची अनुभूती आणि त्याच्याही पुढे जाऊन सौंदर्याचा आविष्कार म्हणूनच कलेकडे पाहावे लागेल. या विश्वात जर कोणती रचना नसती, सुसंगती नसती तर माणूस अस्वस्थ झाला असता. त्यामुळे कुठे व्यवस्था, रचना, तालबद्धता, सुसंगती दिसली की, तो आनंदित होतो आणि या विसंगत जीवनात आपल्याही प्रतिभेप्रमाणे काही रचना करावी, सुसंगती निर्मावी असे त्याला वाटते. त्याच्या या आर्त इच्छाशक्तीतूनच मानवी संस्कृतीचा आणि त्याच्या पुढे सर्व कलांचा जन्म झाला. कलावंत हे निसर्गाच्या सौंदर्याचे खरे पुजारी आहेत, उपासक आहेत. तेच सौंदर्याचे स्तोत्रकार आहेत आणि सौंदर्याचे भाष्यकारही, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ते जगातील सौंदर्य स्वत: समजावून घेतात आणि कलेच्या माध्यमातून त्या सौंदर्याचा अर्थ जगाला सांगतात. सौंदर्य म्हणजे काही एक वस्तू नाही तर सौंदर्याच्या अनेक जाती असल्याचे दिसून येते.
सौंदर्य हे निरनिराळ्या स्थळी निरनिराळ्या रुपात प्रकट होत असते. याचा शोध आणि बोध घ्यायला हवा. उंच उंच पर्वतांची बर्फाने आच्छादलेली आणि गगनाचे चुंबन घेणारी उत्तुंग शिखरे. खळखळत जाणाऱ्या विस्तीर्ण नद्या, त्यांच्या काठावरील फुललेली वनश्री, त्या वनश्रीत-हिरवाईत राहून निसर्गात संगीत निर्माण करणारे पशु-पक्षी, वर्षाकाळामध्ये पृथ्वीच्या मस्तकावर अभिषेक करणाऱ्या मेघांच्या रांगा, त्या कृष्णमेघांच्या विविध छटा आणि आकार, निरनिराळ्या ऋतुंमध्ये पृथ्वीच्या हृदयातून फुलांच्या, फळांच्या, पिकांच्या रुपाने निर्माण होणारी रंगाची, गंधाची, रुचीची अनंत दौलत ही निसर्गाच्या सौंदर्याची मनमोहक दालनेच. निसर्ग सौंदर्याबरोबरच मानवनिर्मित सौंदर्यही मनाला किती आकर्षित करते, हे वेगळे सांगायला नकोच.
ग्रामीण संस्कृतीतील पाणवठ्यावर झऱ्याच्या झुळझुळण्याबरोबर पाणी पिण्यासाठी थोपलेला गुरांचा तांडा, हातातली घुंगुरकाठी फिरवीत त्यांच्यामागे शीळ घालणारा गुराखी, खेडेगावातील पाणवठ्यावरून डोक्यावर घागरीवर घागरी घेऊन हसत-खेळत चाललेल्या स्त्रिया, पांदीच्या वाटेतून घुंगरांचा आवाज करीत निघालेली बैलगाडी हे सारे सौंदर्यच नाही का? पण ते टिपायला रसिकतेची दृष्टी असावी लागते. ग्रामीण संस्कृतीतील हे सौंदर्य नागर संस्कृतीत दुरापास्त झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे रसिकताही कमी झाली आहे. कला, सौंदर्य दृष्टी निर्माण करण्याची गरज आहे.
रसिकतेने विश्वाचे ते सौंदर्य अनुभवणे हीच आनंदाची दृष्टी असते आणि तीच आनंदाची सृष्टी निर्माण करते. त्यामुळे माणसाने आनंद द्यायला आणि घ्यायलाही शिकायला हवे. कलादृष्टी विकसित करायला हवी.
-डॉ. रामचंद्र देखणे