गुणोत्सव होवो!

By Admin | Updated: August 29, 2014 01:54 IST2014-08-29T01:54:06+5:302014-08-29T01:54:06+5:30

श्रीगणरायाचे आगमन मंगलमय वातावरणात आज होत आहे. भोवताली चैतन्य पसरले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तिगीते, आरत्यांसह ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सर्वत्र निनादत राहील

Be a festival! | गुणोत्सव होवो!

गुणोत्सव होवो!

श्रीगणरायाचे आगमन मंगलमय वातावरणात आज होत आहे. भोवताली चैतन्य पसरले आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तिगीते, आरत्यांसह ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष सर्वत्र निनादत राहील. या आनंदपर्वात अवतीभवती उत्साहाची कारंजी उसळताना दिसतील. महाराष्ट्रात हजारो गणेशोत्सव मंडळांकडून सार्वजनिक स्तरावर आणि घराघरांतूनही ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात होत आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता असलेल्या श्रीगजाननाचे आगमन सद्भाव वाढविणारे आणि सकलजनांना आत्मबल प्रदान करणारे आहे. दैनंदिन जीवनातील समस्यांनी मेटाकुटीस आलेल्या सामान्य माणसाच्या मनात नवी उमेद जागविणारे आहे. गणपतीचे आगमन म्हणजे सर्जनशीलतेच्या उत्सवाचे स्वागत करणे आहे. चैतन्याचा पाझर आणि भक्तीचा निर्झर समाजमनात प्रवाहित करणारे हे शुभागमन आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. विद्या, कला, साहित्य, संस्कृती, ऊर्जा आदी अनेकविध गुणांचा हा तेजोनिधी आहे. सकल कलांचा अधिपती असलेला हा विद्याधिपती मानवी संस्कृती अधिक प्रगल्भ करणारा, विधायक प्रेरणा जागविणारा आहे. लोकमान्य टिळकांनी जाणीवपूर्वक या उत्सवाचे बीजारोपण समाजमनात केले. सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा विकसित करीत असतानाच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या उत्सवाने केले आहे. अमाप उत्साहाचा हा लोकोत्सव प्रदीर्घ आणि वैभवशाली सांस्कृतिक परंपरा घेऊन आता जगभरात उभा राहिला आहे. सर्व समाज एकसंध राखण्याची या उत्सवाने निर्माण केलेली भूमिका आजही तितकीच मोलाची आणि गरजेची आहे. गणपती आणि गुणपती असलेल्या मंगलमूर्ती गणरायाला लोकमान्य टिळकांनी समाज संघटित होण्यासाठी सार्वजनिक उत्सवाच्या मांडवाखाली आणले. मरगळलेल्या समाजाला या गणेशोत्सवाने नवी ऊर्जा प्राप्त करून दिली. वैश्विक पातळीवर एकमेकांबद्दल वैरभाव व दुस्वास दिसत असताना आपण सारे हे महोत्सव गुण्यागोविंदाने, खेळीमेळीच्या वातावरणात साजरे करू शकतो हे दाखविण्याची नव्हे, तर कृतीमधून सिद्ध करण्याची संधी आपल्याला मिळवून दिली आहे. ओंकारस्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. व्यावसायिक आणि राजकारणी लोकांनी हे उत्सव ‘ताब्यात’ घेण्याची जणू स्पर्धाच सुरू केली आहे. हा सुखकर्ता, विघ्नहर्ता बुद्धीची, कलेची देवता आहे, याचाच विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू झाला, त्या हेतूलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र दु:खकारक व क्लेशदायक आहे. उत्सव आणि उत्साह परस्परपूरक आहेत. गणेशोत्सवाच्या काळात समस्त जनतेला जपणे आवश्यक आहे. या उत्सवाला उधाण येईल; पण कोणाला अपाय होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणपती हा जसा गणाधिपती आहे, तसाच तो गुणाधिपतीही आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा; गणेशोत्सव हा गुणोत्सव व्हावा, ही काळाची गरज आहे. याच भूमिकेतून ‘लोकमत’ने उत्सवाचा मुळ उद्देश टिकवून ठेवत आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ अधिक दृढ करण्यासाठी ‘आपले बाप्पा’ हा उपक्रम सुरू केला आहे. ’ कृती, संस्कृती आणि निर्मितीचा संदेश देतानाच गणेशोत्सव अधिक स्वच्छ, सुसंस्कृत, संर्जनशील आणि सुरक्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहोत. आपल्या मनातील गणेश रेखाटून गणेशोत्सव विश्वविक्रमी करण्याचा संकल्प सोडला आहे. कोणताही अनाचार, दुराचार या काळात होणार नाही, यासाठी सर्व घटकांनी सजग आणि सतर्क राहायला हवे; नव्हे ती सर्वांचीच जबाबदारी आहे. हा महोत्सव ‘मनोरंजनाचा इव्हेंट’ न होता, ‘प्रबोधनाचा उत्सव’ व्हायला हवा. सामाजिक-सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून आणि आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला, त्याच पुण्या-मुंबईसह महाराष्ट्रातील आजचे सार्वजनिक जीवन चिंता वाटायला लावणारे आहे. सध्याचे एकूणच वातावरण अस्थिरतेचे, दहशतीच्या सावटाखालचे आणि महागाईने होरपळून टाकणारे आहे. प्रबोधन, जागरण, संघटन, पर्यावरण, विचारमंथन, मनोरंजन, ज्ञान-विज्ञानाची नवी दिशा हरवत चालल्याच्या जाणिवेने संवेदनशील मनाला वेदना झाल्याशिवाय राहत नाहीत. अशा प्रतिकूल काळात ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’चा प्रत्यय गणरायाच्या आराधनेतून मिळो आणि समाजाचा भविष्यकाळ अधिकाधिक उज्ज्वल, समृद्ध व निरामय होवो, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील या गणेशोत्सवामुळे मंगल प्रेरणा देणाऱ्या विधायक ऊर्जेच्या आविष्काराचे दर्शन घडो, माणसांची मने उजळोत, ही मंगल कामना! ‘बाप्पा, या दहा दिवसांच्या मुक्कामात जीवनातील सर्जन आणि विसर्जन यामागील तत्त्वज्ञान समाजमनात पाझरण्यासाठी सर्व भक्तांना सद्बुद्धी दे, ही तुझ्याच चरणी प्रार्थना!’

Web Title: Be a festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.