basu chatterjee who introduce the middle class condition | मध्यमवर्गीयांचे बासूदा!

मध्यमवर्गीयांचे बासूदा!

‘बहुत मशहूर इकॉनॉमिस्ट गुन्नार मर्डलने एक जगह लिखा है, सरकारों का कटोती के लिये कहना बिल्कुल ऐसा ही हैं, जैसे आपका जूता छोटा हैं, अपने पाँव काट लो...’ बॉलिवूड चित्रपटातील हा संवाद आजही प्रसिद्ध आहे. ‘देशातली सरकारं बदलली, अर्थव्यवस्था बदलली. मध्यमवर्गीयांचं जीवन मात्र कित्येक वर्षे ‘जैसे थे’च आहे.’ हा संवाद आहे महान दिग्दर्शक बासू चटर्जींच्या ‘एक रूका हुआ फैसला’ चित्रपटातला. हा संवाद प्रारंभीच येतो आणि आपण त्यात हरवून जातो. अप्रतिम कथा, भक्कम पटकथा, संवाद, सहज अभिनय यामुळे आपण संमोहित होऊन जातो. हे भारतीय चित्रपटांचं मोठं असण्याचं बलस्थान आहे. त्यात आपल्या सहजसुंदर शैलीने चित्रपट करणारे तसेच चाळ, आॅफिस, ट्रेनमधील अस्सल तंतोतंत मध्यमवर्गीय व्यक्तिरेखा पडद्यावर दर्शविणारे दिग्दर्शक म्हणजे बासूदा.

४ जानेवारी १९३० ला बासू चटर्जी यांचा जन्म झाला. हे असं नाव आहे, त्यांच्या नावापुढे इतर दिग्दर्शकांसारखं ‘शोमॅन’ वगैरे बिरूदं नाहीत. मात्र, त्यांच्या सहज सुंदर चित्रपटांमुळे त्यांचं नाव अनेक वर्षे लक्षात राहणार आहे. त्यांनी लोकांच्या स्मरणात कायम राहतील अशा विषयांना पडद्यांवर चितारलं, त्यामुळेच त्यांच्या चित्रपटांची नावं आजही लोकांच्या तोंडी आहेत, हे त्यांच्यातल्या दिग्दर्शकाचं मोठेपण आहे. सन १९७२ पासून सन १९९७ पर्यंतची त्यांची कारकीर्द म्हणजे उत्तम अभिनिवेश असलेली कलाकृती पडद्यांवर साकारण्यासाठी धडपडणारा दिग्दर्शक अशीच करावी लागेल. कारण चटर्जींच्या काळात एकीकडे शहेनशहा अमिताभ बच्चन बॉक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत होता. लोकांना मनोरंजन तर हवं होतं. मात्र, ‘अँग्री यंग मॅन’ची अ‍ॅक्शन लोकांवर मोहिनी घालत होती. अशा काळात बासूदांनी हलके-फुलके विषय घेऊन समांतर चित्रपटांची निर्मिती केली व ते यशस्वीही झाले. याचं मोठं कारण म्हणजे त्यातील सामान्य मध्यमवर्गीय लोकांचं वास्तव त्यांनी इतकं बेमालूमपणे पडद्यावर आणलं की लोकही अमिताभसोबत बासूदांच्या चित्रपटांच्या प्रेमात बुडाली. ‘रजनीगंधा’, ‘बातों बातों मैं’, ‘खठ्ठा मीठा’, ‘छोटी सी बात’ या चित्रपटांची गोडी आजही प्रेक्षकांना तितकीच आहे.

बासूदांचे चित्रपट यशस्वी होत असले तरी समीक्षकांनीही त्यांच्यावर ‘तद्दन मध्यमवर्गीय चित्रपट बनविणारा’ असा शिक्का मारला. मात्र, अशा टीका व शिक्क्यांवर त्यांनी जाहीर विधान केले नाही. बासूदा अत्यंत साध्या स्वभावाचे गृहस्थ होते. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, मी अत्यंत मध्यमवर्गीय माणूस आहे. माझ्या आजूबाजूला जे घडतं, जे पाहतो, अनुभवतो तेच पडद्यावर आणतो. कदाचित याच कारणामुळे माझे चित्रपट लोकांना आपलेसे वाटतात. मी फार काही अचाट विचार करणारा माणूस नाही. मला जे सुचतं ते आजूबाजूलाच घडत असतं किंवा एखादी अशी घटना माझ्यासमोर येते अन् त्यातून मला सुचत जातं आणि मी ते तसंच तंतोतंत पडद्यावर आणतो. त्यात मी कोणताच फरक करीत नाही. ‘रजनीगंधा’तील प्रेमत्रिकोण असू दे, ‘छोटी सी बात’मधील बुजलेला नायक जो आवडत्या व्यक्तीला मिळविण्यासाठी ज्या युक्त्या करतो, असे चित्रपट आजच्या काळातही पाहिल्यानंतर लक्षात येतं, नायक, नायिकांच्या किंवा त्यांच्यातील प्रेमाच्या संकल्पना काळानुरूप पडद्यावर बदलल्या असतील. मात्र, आजही त्यातील प्रेमाचा गोडवा कोणत्याही वयातील व्यक्तीला भावतो, हे बासूदांचं वैशिष्ट्य. अमोल पालेकर हे बासूदांचे अत्यंत आवडते अभिनेते. पालेकारांच्या करिअरमधील माईलस्टोन चित्रपटांतील बऱ्यापैकी चित्रपट चटर्जींचे आहेत. बासूदा व्यंगचित्रकार होते. त्यामुळे आपल्या चित्रपटांतून मानवी भावभावनांच्या विश्वातलं व्यंग ते चपखल शोधून काढायचे आणि अगदी तंतोतंत त्याचप्रमाणे ते संवादातून चित्रपटात भाष्य करत. त्यांच्या चित्रपटांचं संगीतही तितकंच श्रवणीय व खास होतं.

‘चितचोर’मधील गाणी येशूदास यांच्या आवाजात ऐकण्याची जी वेगळीच मजा आहे त्याला तोड नाही. ‘गोरी तेरा गांव बडा न्यारा’, ‘जब दीप जले आना’ ही गाणी ऐकली की त्यातील माधुर्य जाणवतं. योग्य ठिकाणी या गाण्यांचा कथेनुसार चपखल वापर करणारे बासूदा मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक होते. हे चित्रपट एकीकडे आणि त्यांचा ‘एक रूका हुआ फैसला’ एकीकडे. कारण या चित्रपटाची एक वेगळी कथा आहे. बासूदांनी नेहमी हटके चित्रपट दिले. ‘व्योमेकेश बक्षी’, ‘रजनी’सारख्या दर्जेदार मालिका दिल्या. त्यांच्या या चित्रपटांमुळे व वेगळेपणामुळेच ते आपल्या कायम स्मरणात राहतील.

Web Title: basu chatterjee who introduce the middle class condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.