जनसामान्यांचा आधारवड

By Admin | Updated: July 26, 2015 22:27 IST2015-07-26T22:27:06+5:302015-07-26T22:27:06+5:30

बि हार आणि केरळ या राज्यांचे माजी राज्यपाल, घटनेचे अभ्यासू भाष्यकार, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या

Base of masses | जनसामान्यांचा आधारवड

जनसामान्यांचा आधारवड


बि हार आणि केरळ या राज्यांचे माजी राज्यपाल, घटनेचे अभ्यासू भाष्यकार, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या सर्व भूमिका बजावणारे लोकप्रिय पुढारी रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनामुळे दलित जनतेने तिचा एक महत्त्वाचा आधार व महाराष्ट्राने त्याचा एक जाणता नेता गमावला आहे. गवई राज्यविधानसभेत विरोधी पक्षाचे नेते होते आणि त्यांचे राज्यातील सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी आत्मीयतेचे संबंध होते. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे त्यांच्या हातून जे काम झाले ते सर्वस्वी अतुलनीय व साऱ्यांना विनम्र करणारे होते. जगातला सर्वात मोठा विहार त्यांच्या नेतृत्वात नागपूरच्या दीक्षाभूमीवर उभारून झाला आणि देशातील लाखो दलितांचे ते प्रेरणास्थान ठरले. नागपूर व अमरावतीच्या शैक्षणिक क्षेत्रात अतिशय श्रेष्ठ दर्जाच्या शिक्षण संस्था उभारून त्या सर्व तऱ्हेच्या वादांपासून दूर राखणे त्यांना जमले आणि समाजातील लहानांपासून थोरापर्यंतच्या लोकांशी त्यांना सहजसाधा संपर्क राखणेही साधले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे अनेक तुकडे झाले. विशेषत: सत्तारूढ कॉँग्रेसशी जवळीक की तिच्याशी पूर्वीचाच वैरभाव या मुद्द्यावर त्यात तीव्र मतभेद उभे राहिले. त्या काळात ज्या नेत्यांनी सत्तेच्या बरोबरीने राहण्यातच दलितांचे कल्याण आहे हे ओळखले व त्यासाठी प्रसंगी आपल्या लोकप्रियतेची किंमतही चुकविली त्यात दादासाहेब आघाडीवर होते. समन्वय आणि तडजोड अशी मध्यममार्गी भूमिका घेणाऱ्या प्रत्येकच नेत्याला दोन्ही बाजूंकडून कुतूहल व प्रशंसेएवढीच हेटाळणी व कुचेष्टाही सहन करावी लागते. दादासाहेबांना या कसोटीतून दीर्घकाळ जावे लागले आहे. मात्र या सबंध काळात त्यांची ‘दलितांच्या कल्याणासाठी सत्ता’ ही भूमिका कधी बदलली नाही. थेट यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत त्यांचे संबंध स्नेहाचे होते. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांनी कधी वैर धरले नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळी सर्वपक्षीय नेतृत्वाचा प्रश्न महाराष्ट्रात आला तेव्हा तेव्हा रा. सू. गवई यांचेच नाव त्यासाठी समोर आले. संघाचे तत्कालीन बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य दादासाहेबांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती समारंभात स्पष्टच म्हणाले, ‘महाराष्ट्रात एखादेवेळी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर रा. सू. गवई हेच त्या सरकारचे मुख्यमंत्री होतील.’ गेल्या काही वर्षांपासून ते निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले. मात्र याच काळात त्यांच्याकडे देशातील प्रमुख राज्यांच्या राज्यपालपदाची सूत्रे आली. दीक्षाभूमीचे कामही या काळात त्यांनी पूर्णत्वाला नेले. त्याहून महत्त्वाची गोष्ट ही की या काळात त्यांची जुनी राजकीय वैरेही निकालात निघून ते सर्वपक्षीयच नव्हे तर साऱ्या समाजाचे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर व वचनांवर श्रद्धा हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. केवढाही तणावाचा प्रसंग आला वा कोणत्याही राजकीय अडचणीला तोंड द्यावे लागले तरी त्यांची ही निष्ठा कधी विचलित झाली नाही. पण आंबेडकरांची पूजा म्हणून इतरांचा घाऊक द्वेषही त्यांनी कधी केला नाही. त्याचमुळे साऱ्या ज्ञाती वर्गात त्यांना त्यांचे चाहते व स्नेही मिळाले. तसा वारसा जपता न आलेल्या अनेक कडव्या आंबेडकरवाद्यांचा त्यांच्यावर रोषही होता. परंतु आंबेडकरांची दृष्टी व्यापक व सर्वसमावेशक होती आणि दलितांच्या कल्याणाएवढेच साऱ्या समाजाचे हितही साधू पाहणारी होती, यावरचा दादासाहेबांचा विश्वास अखेरपर्यंत अढळ राहिला. परिणामी दलितांचे नेते असले तरी साऱ्या जनसामान्यांचे आधारस्तंभ होण्याची किमया त्यांनी साधली. त्यांना साहित्यात रस होता. वाङ्मयीन व्यासपीठावरची त्यांची व्याख्याने अभ्यासपूर्ण व त्यांना असलेली साहित्याची जाण सांगणारी असत. नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या अनेक संमेलनांचे ते उद््घाटक राहिले आणि त्यावेळची त्यांची भाषणे वाङ्मयीन क्षेत्राला व्यापक बनविण्याचे आवाहन करणारी राहिली. तात्पर्य, राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि साहित्य अशा सर्व क्षेत्रात सहज संचार करू शकणाऱ्या दादासाहेबांनी साऱ्या महाराष्ट्रात आपल्या चाहत्यांचा मोठा वर्ग जोडला होता. सर्व क्षेत्रातील कार्यकर्त्यांनाही ते त्यांचे मार्गदर्शक व विश्वासाचे ठिकाण वाटत आलेले होते. गेली काही वर्षे ते सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाल्यासारखे दिसले, तरी दीक्षाभूमी, डॉ. आंबेडकर व भारतीय राज्यघटना यांच्या कार्याशी ते सक्रियपणे जुळलेलेच राहिले. त्यांच्या जाण्यामुळे अनेक संस्थांएवढेच त्यांच्या चाहत्यांनाही यापुढे एक रितेपण जाणवणार आहे. समाजातले ज्ञातीवर्ग एकमेकांपासून दूर नेण्याचे व त्यांच्यात वैरभाव उत्पन्न करण्याचे उद्योग सर्वत्र होताना जेव्हा दिसतात तेव्हा समाजाला जोडून ठेवू शकणारी व त्याच्या विविध वर्गांत सौहार्द व समन्वय उभी करणारी माणसे फार गरजेची असतात. त्यामुळे दादासाहेबांचे जाणे चटका लावून जात असतानाच एका अभावाचीही जाणीव निर्माण करून जाणारे आहे. मात्र समाजाची दीर्घकाळ सेवा करणाऱ्या व त्यामुळेच तृप्त होणाऱ्या माणसांत एक सहजसाध्या निवृत्तीची भावना निर्माण होते. दादासाहेब मनाने असे तृप्त व निवृत्त होते. वयपरत्वे त्यांचे जाणे स्वाभाविक असले, तरी त्यांच्या मागे ते फार मोठी शोककळा ठेवणारे आहे.

Web Title: Base of masses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.