बलुचींचे आभारप्रदर्शन आणि मोदींचा ऋणनिर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2016 00:05 IST2016-08-17T00:05:37+5:302016-08-17T00:05:37+5:30

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सर्वात लक्षणीय ठरला तो त्यांनी केलेला बलुचिस्तानच्या समस्येचा उल्लेख.

Baluchi's Thanksgiving and Modi's Guidelines | बलुचींचे आभारप्रदर्शन आणि मोदींचा ऋणनिर्देश

बलुचींचे आभारप्रदर्शन आणि मोदींचा ऋणनिर्देश

प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणात सर्वात लक्षणीय ठरला तो त्यांनी केलेला बलुचिस्तानच्या समस्येचा उल्लेख. भारतातील अनेकांना हा विषय नेमकेपणाने उमगणारही नाही.
पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत आणि बलुचिस्तान हे पाकमधले चार प्रांत. पाकच्या विविध प्रांतांत अस्वस्थता असली तरी बलुचिस्तानात ती सर्वाधिक आहे. तेथील लोकांची संस्कृती पाकमधल्या राज्यकर्त्या पंजाबी मुस्लीमांपेक्षा पूर्णत: वेगळी आहे. त्यामुळेच बलुच जनता पाकमध्ये राहायला तयार नाही. तिथे पाकपासून ‘मुक्तता’ मिळवण्यासाठी लोक लढा देत आहेत आणि पाकचे लष्कर त्यांच्यावर दडपशाही करीत आहे. ही चळवळ भारत पुरस्कृत असल्याचा पाकच्या राज्यकर्त्यांचा आरोप आहे आणि भारत तो नाकारीत आला आहे. इतकेच नव्हे तर जाहीरपणाने याबद्दल कोणतेही वक्तव्य कुणीही कधी केलेले नाही. गेल्या एकोणसत्तर वर्षांच्या मौनाच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या भाषणातील बलुचिस्तानचा उल्लेख दुर्लक्षिण्यासारखा नाही हे नक्की. खुद्द पाकमध्ये आणि जगात इतरत्रही त्याची प्रतिक्रि या उमटणे साहजिकच आहे.
न्यूयॉर्क आणि बेंगळुरु येथून प्रकाशित होणाऱ्या ‘इंटरनॅशनल बिझनेस टाईम्स’नी दिलेल्या बातमीनुसार चौदा आॅगस्टला पाकच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कराचीमध्ये काही बलुची तरुणांनी एका शासकीय हॉस्पिटलवरचा पाकचा झेंडा काढून टाकून तिथे बलुचिस्तानचा झेंडा फडकवल्याची बातमी ठळकपणे वाचायला मिळते. अनेकांनी पाकच्या पारपत्रांची जाहीरपणे होळी केली व पाकच्या नेत्यांच्या फोटोंना जोडे मारत आपला रागही व्यक्त केला. बलुचिस्तानच्या मस्तंगमध्ये काही बलुची तरु णांनी एका शाळेमध्ये असाच प्रकार केल्याचेही यात वाचायला मिळते. या अगोदर क्वेट्टा इथल्या कोर्टाच्या परिसरात बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे बलुचिस्तानमध्ये अस्वस्थता असल्याचे लपून राहिलेले नाही. नैला काद्री या बलुची महिलेने तसेच इतरही बलुची लोकांनी बलुची तसेच पाकव्याप्त काश्मीर सारख्या भागातल्या लोकांना पाठिंबा दिल्याबद्दल भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानणारे ट्विट केल्याचेही दिसते. ट्विटरवरच्या चर्चेत अनेक बलुच नागरिकांनी उघडपणाने भारताचे आणि मोदींचे आभार मानल्याचे दिसते. मोदींच्या भाषणाला या घटनांची पार्श्वभूमी आहे.
मोदींच्या भाषणात पेशावरमधील एका शाळेत दहशतवाद्यांनी हल्ला करून अनेक मुलांना मारल्याच्या घटनेचा व या हल्ल्याबाबत भारतीयांमध्ये जाणवलेल्या तीव्र दु:ख आणि संतापाच्या भावनेचा संदर्भ होता. एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तान दहशतवादी कारवायांचे उघड समर्थन करीत असल्याने संपूर्ण जगापुढे त्याचे खरे स्वरूप उघड झाल्याचे मोदी म्हणाले. याच संदर्भात बलुची तसेच गिलगीट आणि पाकव्याप्त काश्मीरमधली जनतेने त्यांना मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मोदींचे आभार मानले असून आपण त्यांचे त्यासाठी ऋणी आहोत असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
पाकच्या ‘डॉन’ने मोदींच्या भाषणाला ठळक प्रसिद्धी देणे साहजिकच आहे. पाकच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या ताब्यात असलेल्या काश्मीरातील जनतेने काळा दिवस पाळल्याची मुझफ्फराबाद येथून तारीख नकाश यांनी पाठविलेली बातमीही डॉनने ठळकपणाने दिली आहे. अर्थात हा काळा दिवस त्यांनी भारताच्या विरोधात पाळल्याचा डॉनचा दावा आहे. समर अब्बास यांच्या वार्तापत्रात मोदींच्या भाषणावरील तेथील संरक्षणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा समावेश आहे. मोदींवर टीका करताना अझीझ म्हणतात की, मोदींनी काश्मीरमधील अत्याचाराकडून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताची ‘रॉ’ ही गुप्तचर संघटना बलुचिस्तानमध्ये कार्यरत असल्याचा आरोपही अझीझ यांनी केला आहे. भारत हा एक मोठा देश असला तरीे तो आपोआपच महान देश मानला जात नाही, अशी मसालेदार फोडणीदेखील अझीझ यांनी दिल्याचे या वार्तापत्रात वाचायला मिळते. पंधरा आॅगस्टच्या आपल्या संपादकीयात डॉनने म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान जेव्हा जेव्हा चुकीचे वर्तन करतात तेव्हा तेव्हां परिस्थितीमधला तणाव वाढतो व नव्या समस्या जन्मास येतात. बलुच प्रश्नाचा मोदींनी केलेला उल्लेख राजनैतिक परंपरांच्या मर्यादा ओलांडणारा आणि पाकच्या अंतर्गत कारभारातला हस्तक्षेप असून मोदींनी या संदर्भात अधिक विचार करायला हवा होता, असेदेखील डॉनने म्हटले आहे.
जिनिव्हात राहाणारे बलुच नेते ब्राहामदाघ बुग्ती यांनी त्यांच्या लढ्यासाठी भारताचे सहाय्य मागितले असल्याची बातमी ‘द नेशन’ या पाकच्या वृत्तपत्राने दिली आहे. ज्या प्रकारचे सहाय्य भारताने बांगलादेशला केले तशीच मदत आपल्यालादेखील करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांनीच फेसबुकवरच्या संदेशात बलुच लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचविल्याबद्दल भारत सरकार आणि मोदींचे आभार मानल्याचे वृत्त उर्दू बीबीसीने दिले आहे. ‘डीडब्ल्यु’ या जर्मन वृत्तवाहिनीने मोदींनी केलेल्या बलुचिस्तानच्या उल्लेखामुळे पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती देताना काश्मीर प्रश्नासारखी बलुचिस्तानच्या प्रश्नाला प्रसिद्धी मिळाली नसल्याची बलुच नेत्यांची भावना असल्याचे नमूद केले आहे.
बलुचिस्तान आणि काश्मीर हे दोन वेगळे विषय आहेत आणि त्यांच्यात साम्य नाही असे तिथल्या नामधारी शासनाचे मंत्री सर्फराज बुग्ती सांगतात. परंतु हा लढा पाकचे राज्यकर्ते दाखवतात त्याप्रमाणे केवळ बलुचिस्तान मधल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा नसून बलुच जनतेचा आता पाकवर विश्वासच उरलेला नाही, पाकने तिथे मोठ्या प्रमाणावर दमनसत्र चालवले आहे व आजपर्यंत पंचवीस हजारांवर बलुची नागरिक गायब झाले आहेत पण यापैकी कशालाही पाकमध्ये प्रसिद्धी मिळू शकत नाही, असे बलुच नेते मुस्तफा बलुच यांनी म्हटले आहे. मोदींच्या वक्तव्याने बलुच समस्येकडे जगाचे लक्ष वेधले जाणार आहे असेही त्यांनी म्हटल्याचे वृत्त ‘डीडब्ल्यू’ने दिले आहे.

Web Title: Baluchi's Thanksgiving and Modi's Guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.