अणुशक्ती हा उत्तम पर्याय
By Admin | Updated: August 2, 2015 04:16 IST2015-08-02T04:16:45+5:302015-08-02T04:16:45+5:30
आपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विश्वशांतीसाठी अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आज उपलब्ध असलेल्या

अणुशक्ती हा उत्तम पर्याय
- डॉ. अनिल काकोडकर (लेखक ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आहेत.)
आपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विश्वशांतीसाठी अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. आज उपलब्ध असलेल्या स्रोतांवरही काही मर्यादा आहेत, शिवाय जगातील बहुतांशी लोकसंख्या विकासापासून वंचित आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून आपण पुनर्वापर आणि नूतनीकरण या पर्यायांवर भर देत आहोत. मात्र भविष्यात या स्रोतांच्या कमतरेमुळे देशावरील भार वाढण्याचा धोका टाळता येणार नाही. भविष्यातील या संकटासाठी आताच समाजातील सर्व स्तरांमधील जनजागृती करून अणुशक्ती संदर्भातील समज-गैरसमज दूर केले पाहिजेत.
विश्वशांतीकडे वाटचाल करताना दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यात सर्वप्रथम लोकांच्या मनातून असुरक्षिततेची भावना काढून टाकणे, आणि त्यानंतर नवनव्या स्रोंताची निर्मिती करणे हे पर्याय आहेत. यातील लोकांच्या मनातील असुरक्षिततेची भावना काढून टाकण्यास दीर्घकाळ अपेक्षित आहे. त्यामुळे दुसऱ्या पर्यायाचा विचार करून नवनव्या स्रोतांची निर्मिती करण्यास अभ्यास, संशोधन सुरू आहे. पुनर्वापर नूतनीकरणासोबत आपल्याला नव्या स्रोतांचीही गरज आहे. त्यामुळे कमी प्रमाणात स्रोतांचा वापर करून अधिकाधिक गरजा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेवर भर दिला जातो आहे. अणुशक्तीचा उपयोग अत्यंत सूचक आहे.
भारतातील भविष्यातील दरडोई वीजवापर पाहता भविष्यात आपल्याला जगाच्या आजच्या वीजनिर्मितीच्या ४० टक्के अधिक वीजनिर्मितीची गरज आहे. अर्थात, भविष्यातील लोकसंख्या, विकास नियोजन आणि गरजा विचारात घेऊन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते गाठण्यास चीनला मात्र आपल्यापेक्षा निम्मी वीजनिर्मिती वाढवावी लागेल. कोळशाचे भूमिगत साठे वीजनिर्मितीसाठी आणखी १०-११ वर्षे आपल्याला उपयोगी पडू शकतील.
चीन, जपान, अमेरिका यांसारखे देश आजही वीजनिर्मितीत अग्रेसर आहेत. चीन, अमेरिका, जपान आणि रशिया ही आज जगातील सर्वांत जास्त वीजनिर्मिती करणारी राष्ट्रे आहेत. यांमध्ये भारत अजूनही मागे आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत वीजटंचाईची समस्या आपल्या देशात अधिक लवकर जाणवणार आहे. उर्वरित जगाला इतक्या लवकर ही समस्या ग्रासणार नाही, पण भारताला मात्र ती नजीकच्या काळात चांगलीच जाणवणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्यादृष्टीने अणुऊर्जेकडे पाहिले पाहिजे.
शब्दांकन : स्नेहा मोरे