नास्तिक म्हणजे अहंकारी... नव्हे! विज्ञानवादी?

By Admin | Updated: April 23, 2017 01:45 IST2017-04-23T01:45:49+5:302017-04-23T01:45:49+5:30

नास्तिक म्हणजे अहंकारी, नास्तिक म्हणजे उर्मट.. असाच काहीसा समज. याच समजाला छेद देण्यासाठी ९ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या

The atheist is not arrogant ...! Scientists? | नास्तिक म्हणजे अहंकारी... नव्हे! विज्ञानवादी?

नास्तिक म्हणजे अहंकारी... नव्हे! विज्ञानवादी?

- अक्षय चोरगे

नास्तिक म्हणजे अहंकारी, नास्तिक म्हणजे उर्मट.. असाच काहीसा समज. याच समजाला छेद देण्यासाठी ९ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात नास्तिकांचा, मुक्तचिंतकांचा मेळावा भरला. ‘वुई दी ब्राइट्स’ आयोजित या मेळाव्यातील नास्तिक थोडासा वेगळा वाटला. दुर्मुखलेला नव्हे, तर खुल्या चर्चेसाठी तयार असणारा, प्रबोधन करू इच्छिणारा, विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारा नास्तिक या मेळाव्यातून समोर येऊ पाहात होता, त्याचा हा आढावा.

या परिषदेतील पहिला उद्घोष म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाचा. नास्तिक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी आणि बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नास्तिक असे हे समीकरण दृढ करण्याचा प्रयत्न मेळाव्यात झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव, धर्माविरोधात ठोस आणि आक्रमक भूमिका घेत नाही. त्यामुळे या नव्या व्यासपीठाची निर्मिती केल्याचे संयोजकांनी या वेळी स्पष्ट केले.
स्वत:ला ब्राइटस् असे संबोधणाऱ्या या नास्तिकांनी स्वत:ला हुतात्मा भगत सिंगांचे अनुयायी घोषित केले. आम्ही भगतसिंगाच्या विचाराने चालतो, अशी घोषणा करणाऱ्या या मुक्तचिंतकांनी खरेच भगत सिंग पचविला का, हा प्रश्नच आहे. ‘मी नास्तिक का आहे?’ या लेखात निरअहंकारी, खोल आणि गंभीर विचारांचा नास्तिक भगतसिंग आपल्याला भेटतो. आपल्या विचारांवर दृढ आणि स्पष्ट. नेमका त्याचाच अभाव मेळाव्यात प्रकर्षाने जाणवला.
एकीकडे अहंकारी नाही म्हणायचे आणि दुसरीकडे दुसरीकडे स्वत:च्या बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रत्येक वाक्यासरशी ‘उदो... उदो’ करायचा. शिवाय, नास्तिकांचा मेळावा मध्येच बेमालूमपणे राजकीय वळणेही घ्यायचा. त्यामुळे मेळावा नास्तिकांचा होता की, विशिष्ट राजकीय विचारसरणी जोपासणाऱ्यांचे गेट टुगेदर याचे उत्तर ‘ब्राइटस्’च्या भावी वाटचालीतून मिळेलच.
परिषदेच्या शेवटी आपल्या धर्मनिरपेक्ष देशात भारतीय दंडविधानातील कलमे १५३ अ, २९५ अ, आणि २९८ या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या अन्यायकारक तरतुदींचे अस्तित्व नष्ट करून, या कलमांना कायद्यातून रद्द करावे आणि त्यामध्ये घटनात्मक दुरुस्ती करावी, यासाठी लोकशाही मार्गाने लढा देण्यचा संकल्प ब्राइट्सने केला.
एकंदर राजकीय सूर लावणारे हे मुक्तचिंतक म्हणजे अज्ञेयवादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी वगैरेच आहेत, असा समज बाळगायला हरकत नाही.

अहंकार नाही हे वदवून घेतले
‘माझ्यात अहंकार नाही’ हे नास्तिक मेळावा आयोजकांनी सर्व नास्तिकांकडून वदवून घेतले. नास्तिक म्हणजे उर्मट असा सर्वसाधारण समज चुकीचा ठरविण्यासाठी आयोजकांनी आम्ही अहंकारी नसल्याची जणू या माध्यमातून घोषणाच केली.

नास्तिक परिषदेमागची कारणे
जनसामान्यांमध्ये नास्तिकांबद्धल जी वाईट आणि चुकीची मते आहेत, ती बदलण्यासाठी, ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी, सर्व नास्तिकांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे, म्हणून विविध उपक्रम राबविण्यासाठी ही परिषद घेण्यात आली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागचा प्रवास येथे मांडला, नास्तिकांसदर्भात राज्यासह जगभरातील परिस्थितीबद्दल अनुभव मांडले.

अंनिसमधून जन्माला आलेली वेगळी संघटना
या परिषदेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे स्वत:ला ब्राइट्स म्हणवणारे तरुण अंनिसमधून बाहेर पडले आहेत. अंनिस धर्मविरोधी देवविरोधी भूमिका घेत नाही, ती घेता यावी, म्हणून ‘ब्राइट्स’चा जन्म झाला आहे. ‘ब्राइट्स’ म्हणजे असे नास्तिक जे सर्व अलौकिक, सुपरनॅचरल शक्तीचे अस्तित्व नाकारतात व ते निसर्गाच्या नियमाने चालतात. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाने शोधतात. धर्माचा अभौतिक भाग नाकारतात. सत्यनारायण, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या सर्व गोष्टी ‘ब्राइट्स’ नाकारतात.

Web Title: The atheist is not arrogant ...! Scientists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.