नव्या आरंभाचे आश्वासन
By Admin | Updated: April 21, 2015 23:59 IST2015-04-21T23:59:40+5:302015-04-21T23:59:40+5:30
मोदी सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने दिल्लीत आयोजिलेल्या रविवारच्या किसानसभेत भाषण करणाऱ्या राहुल

नव्या आरंभाचे आश्वासन
मोदी सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्षाने दिल्लीत आयोजिलेल्या रविवारच्या किसानसभेत भाषण करणाऱ्या राहुल गांधींची देशाला दिसलेली प्रतिमा त्यांच्यात झालेला बदल दर्शविणारी होती. त्या भाषणात पूर्वीचा नवखेपणा नव्हता, कोणतेही अडखळलेपण नव्हते, होता तो आत्मविश्वासाने ओथंबणारा तरुण आवेश. सोमवारी लोकसभेत त्यांनी केलेले भाषणही त्यांची ही प्रतिमा आणखी उजळ करणारे व त्यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसला आश्वस्त करणारे ठरले. सरकारचे विधेयक श्रीमंत उद्योगपतींसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणारे आहे व त्या जमिनी त्यांना शेतकऱ्यांकडून विकत घ्यायला लावण्याऐवजी सरकारच त्यांचे दलाल बनत असल्याचे सांगणारे आहे हे स्पष्ट करतानाचा त्यांचा अविर्भाव त्यांची याविषयाबाबतची बांधिलकी व ग्रामीण जनतेविषयी त्यांना वाटणारा कळवळा उघड करणारा होता. या वक्तव्यात नवे काही नसले तरी सरकारपक्षाने उद्योगपतींकडून घेतलेल्या पैशाची परतफेड करण्याचा त्याचा हा उद्योग आहे हा राहुल गांधींचा आक्षेप मात्र नवा होता. २०१४च्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष व त्याचे नेतृत्व पार विकल झाले होते. दिल्ली विधानसभेतील संपूर्ण पराभवानंतर तर त्यातला उरलासुरला जोमही संपल्यागत दिसला होता. पक्षाचे अनेक वरिष्ठ पुढारी व गांधी-नेहरू घराण्याचे जुने भक्त तो पक्ष व ते घर या काळात सोडून जाताना दिसले. माध्यमांच्या निष्ठा बदलल्या आणि मी मी म्हणविणारे पत्रकार त्यांच्या राजकीयच नव्हे तर जीवनविषयक श्रद्धा विसरून भाजपाच्या वळचणीला उभे होताना आढळले. या काळात एकट्या सोनिया गांधीच स्थिर आणि धीरगंभीर राहिल्या. प्रसंग येताच त्यांनी काँग्रेससह देशातील १४ विरोधी पक्षांचे नेतृत्वही केले. या सबंध काळात राहुल गांधींनी राजकारणाची रजा घेतल्याचे दिसले. अज्ञातवास म्हणावा एवढे गेल्या ५६ दिवसांतील त्यांचे वास्तव्य देशापासून दडवून ठेवले गेले. ते आत्मपरीक्षणार्थ रजेवर आहेत इथपासून ते विपश्यनेसाठी गेले आहेत इथपर्यंतच्या गोष्टी माध्यमांनी या काळाबाबत लोकांना सांगितल्या. मात्र एवढ्या राजकीय पडझडीनंतर व आताच्या अज्ञातवासानंतर राहुल गांधी दिल्लीत परतले ते शेतकरी व कष्टकऱ्यांचे समर्थ प्रवक्ते म्हणूनच. रविवारच्या जाहीर सभेतले व सोमवारच्या लोकसभेतले त्यांचे भाषण त्यांच्या या भूमिकेची साक्ष पटविणारे होते. किसान सभेतील त्यांच्या भाषणाच्या काही काळ अगोदर नरेंद्र मोदींनी त्यांच्या सांसदीय पक्षाच्या सभेत भाषण करताना जे मुद्दे मांडले त्यातल्या प्रत्येकच मुद्द्याला राहुल गांधींनी समर्पक उत्तर दिले व सरकारचे भांडवलदारधार्जिणेपण सगळ्या तपशिलानिशी देशासमोर मांडले. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात उपस्थित केलेल्या राजकीय विवादांनाही राहुल गांधींनी यथोचित उत्तरे दिली. विशेषत: ‘विदेशात केलेल्या भाषणात आपण जुन्या सरकारांवर टीका करून कोणता गुन्हा केला काय’ या मोदींच्या प्रश्नाला ‘हा गुन्हा नसला तरी प्रगल्भपणाचा अभाव असल्याचे’ उत्तर देऊन राहुल गांधींनी त्यांचे राजकीय परिपक्वपणही साऱ्यांच्या लक्षात आणून दिले. कॉँग्रेस पक्षात त्यांच्या अध्यक्षपदाची चर्चा सध्या सुरू आहे. काही जुन्या नेत्यांच्या मते त्या पदावर सोनिया गांधींनी आणखी काही काळ राहावे असे आहे तर अनेक नव्यांना त्या पदाची जबाबदारी राहुल गांधींनीही वाटून घ्यावी असे वाटू लागले आहे. सोनिया गांधींनी एवढी वर्षे समर्थपणे वाहिलेला पक्षाचा भार व त्याला दिलेले जबर नेतृत्व साऱ्यांच्या स्मरणात आहे. त्यांच्या प्रकृतीची व आता विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना येणाऱ्या जास्तीच्या जबाबदारीची जाणीव ज्यांना आहे त्यांचे मत त्या दोघांनीही पक्षाला सहमतीचे नेतृत्व द्यावे असेही आहे. यातच काही अतिशहाण्या माणसांनी सोनिया आणि राहुल यांच्यात वितुष्ट असल्याचाही शोध लावून घेतला आहे. मात्र दिल्लीची विराट किसानसभा आणि त्यानंतर सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी जाऊन हजारो शेतकऱ्यांनी घेतलेली भेट या दोन्हींनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच वेळी दिली आहेत. सोनिया गांधींचे पक्षातील स्थान अढळ आहे आणि त्याचे उद्याचे नेतृत्वही आता साऱ्यांच्या डोळ्यासमोर उभे झाले आहे. याहून महत्त्वाची बाब ही की या सभेला साऱ्या देशातून प्रचंड संख्येने आलेल्या शेतकरी-प्रतिनिधींनी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात आजही शाबूत व मजबूत असल्याचे साऱ्यांच्या लक्षात आणून दिले आहे. राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष यांनी जमीनधारणा विधेयकाबाबत घेतलेली भूमिका देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांना मान्य असल्यामुळे त्या साऱ्यांचे नेतृत्व अप्रत्यक्षपणे राहुल व काँग्रेस यांच्याकडे पुन्हा एकवार आले आहे. देशातील भाजपाधार्जिण्या माध्यमांनी व त्यावरील त्यांच्या तशाच प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या सभेची हेटाळणी करण्याच्या प्रयत्नाला लागलीच सुरुवात केलेली दिसली तरी तिचा प्रभाव व त्यातील नेतृत्वाची भाषणे काँग्रेसने घेतलेल्या नव्या उभारीची सूचना देणारी ठरली याविषयी कोणाच्या मनात शंका राहण्याचे कारण उरले नाही. सरकार आक्रमक असताना विरोधक विकल दिसणे ही लोकशाहीलाही बाधक ठरणारी बाब आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेली नवी उमेद व भाजपाने तिची घेतलेली गंभीर दखल यामुळे ही बाधा संपेल असा आशावाद निश्चितच निर्माण केला आहे.