आकांक्षा, आततायीपणा आणि आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 05:59 PM2019-06-06T17:59:31+5:302019-06-06T18:01:06+5:30

आततायीपणा केल्यास आत्मघात अटळ असतो, हे लक्षात घ्यायला हवे.

Aspiration, Intimidation, and Self-Sufficiency | आकांक्षा, आततायीपणा आणि आत्मघात

आकांक्षा, आततायीपणा आणि आत्मघात

Next

मिलिंद कुलकर्णी
प्रत्येक व्यक्तीला आकांक्षा असते. पायी चालणाऱ्याला वाटते, माझ्याकडे सायकल असावी. सायकलस्वाराला वाटते स्वयंचलित दुचाकी वाहन असेल तर किती बरे होईल. ऊन, पाऊस, थंडी यापासून बचाव करायचा तर स्वत:चे चारचाकी वाहन हवे, असे मध्यमवर्गीयाला वाटते. कर्ज काढून तो चारचाकी वाहन घेतो. आकांक्षा असणे गैर नाही. परिस्थितीनुसार आकांक्षांचे स्वरुप बदलणेदेखील चुकीचे नाही. परंतु, आततायीपणा केल्यास आत्मघात अटळ असतो, हे लक्षात घ्यायला हवे.
अंथरुण पाहून पाय पसरा या म्हणीविषयी दुमत असू शकते. अल्पसंतुष्ट राहिले तर प्रगती कशी होणार? धाडस दाखविल्याशिवाय मोठी स्वप्ने साकारली जाणार नाही, असा युक्तीवाद केला जाऊ शकतो. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही प्रवृत्ती नको, याविषयी सार्वमत होईल. त्यामुळे म्हणी, वाक्प्रचार, सुुभाषिते, सुविचार यांचा प्रसंग, परिस्थितीनुसार वेगवेगळा अन्वयार्थ काढता येतो.
रामायण, महाभारत, गीता असे धार्मिक ग्रंथ, संतांची काव्यसंपदा, अभंग, भजने, भारुड यातील एखादा प्रसंग, दृष्टांत, कडवे किती अर्थपूर्ण, जीवनातील साराने परिपूर्ण असतात, याचा प्रत्यय आपण घेत असतो. कीर्तनकार, प्रवचनकार, पुराणिकबुवा हे एखाद्या कडव्यावर, अभंगांवर संपूर्ण कीर्तन, प्रवचनात निरुपण करताना आपण पाहतो. मूळ मुद्दा असा आहे, हे सगळे ज्ञात असूनही आम्ही व्यवहारात त्याचा उपयोग किती करतो? ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशी स्थिती असते. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण, असेही काहींच्या बाबतीत अनुभवाला येते. म्हणून उक्ती आणि कृतीमध्ये अंतर असता कामा नये. अन्यथा विसंगती लगेच दिसून येते. अलिकडचे राजकारणातील उदाहरण घेऊया. (राजकारणातील उदाहरण बहुसंख्य मंडळींना लगेच कळते, म्हणून ते उदाहरण घेत आहोत. किंवा चित्रपटसृष्टी, क्रिकेट याच्या बरोबरीने आम्हाला राजकारणात रस असल्याने विषय लगेच समजावा म्हणून ते उदाहरण घेऊया)
‘लाव रे तो व्हीडिओ’ हा राज ठाकरे यांनी परवलीचा शब्द नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बनविला. त्यांच्या सभांना झालेली गर्दी बघितल्यावर भाजप-सेनेच्या नेत्यांना धडकी भरली असणार. (भले ते आता मान्य करणार नाही. तेव्हाही अवसान आणून त्यांनी ते मान्य केले नव्हतेच) पण ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आाश्वासन आणि वास्तव काय आहे हे चित्र लोकांपुढे मांडले. उक्ती आणि कृतीतील अंतर त्यांनी लक्षात आणून दिले. ते लोकांना भावले. आता काहींच्या मनात प्रश्न आला असेल की, सभेला झालेल्या गर्दीचे मतांमध्ये रुपांतर का झाले नाही. त्याला इतरही अनेक कारणे असू शकतात, पण त्यातील एक कारण ठळकपणे समोर येते की, भाजपने ठाकरेंच्या टीकेला दिलेले प्रत्युत्तर मतदारांनी नजरेआड केलेले दिसत नाही. भाजपच्या मीडिया सेलने राज ठाकरे यांनी मोदी हे गुजराथचे मुख्यमंत्री असताना केलेला दौरा, उधळलेली स्तुतीसुमने यांचे ‘व्हीडिओ’ प्रसारीत केले. मोदींच्या पायाचे पाणी महाराष्टÑातील नेत्यांनी तीर्थ म्हणून प्राशन करावे, असे केलेले आवाहन आणि आता मोदींवरील प्रखर टीका...पाच वर्षांपूर्वीची स्तुती योग्य की, आताची टीका योग्य असा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात भाजप यशस्वी झाला, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
आकांक्षा असली तरी भूतकाळातील काही बाबी, भविष्यात लोढणे म्हणून गळ्यात पडतात, त्याची अनेक उदाहरणे राजकारणात आहेतच. शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हटले जात असले तरी ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला’, विश्वास घात केला, हा भूतकाळ त्यांचा पिच्छा सोडत नाही. सतरावी लोकसभा त्रिशंकू राहिली असती तर प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना महत्त्व आले असते. चंद्राबाबू नायडू तर निकालापूर्वीच सक्रीय झालेले आपण पाहिले. प्रत्यक्षात त्यांच्या आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत त्यांना धोबीपछाड मिळाली. हा आततायीपणा अंगलट आला. असाच आततायीपणा पुण्याचे सुरेश कलमाडी यांनी पवारांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवून केला होता. महाराष्टÑभर वातावरण झाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार. यशवंतराव चव्हाण होऊ शकले नाही, पण ही संधी आता पवारांना मिळणार. दिल्लीतही कलमाडी यांनी त्यांच्या शैलीने वातावरण निर्मिती केली. पण झाले काय, हा इतिहास सगळ्यांना माहित आहे. ज्या मुद्यावर कॉंग्रेस सोडली, त्याच काँग्रेससोबत महाराष्टÑात सत्तेत भागीदार झाले, केंद्रात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीत ते आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले. २०१४ व २०१९ मध्ये त्यांचे महाराष्टÑात चारच खासदार निवडून आले. कार्यकर्ते, सहकारी आपल्या नेत्याला कसे अडचणीत आणतात त्याचे हे उदाहरण होते. परवा भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकाने ‘संकटमोचकां’च्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदनाचा फलक लावताना ‘भावी मुख्यमंत्री’ असा त्यांचा उल्लेख केला. आकांक्षा योग्य आहे, पण....आततायीपणा नको, हा बोध आता नेत्यांनीच कार्यकर्त्यांना घालून देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Aspiration, Intimidation, and Self-Sufficiency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.