आषाढीचा ‘तुकाराम’ पॅटर्न !
By Admin | Updated: July 21, 2015 23:30 IST2015-07-21T23:30:16+5:302015-07-21T23:30:16+5:30
विठुरायाच्या ओढीने राज्यभरातून पायी निघालेला वारकरी श्रद्धेने ‘जावू देवाचिया गावा... घेऊ तेथेचि विसावा...’ हा भक्तिभाव जतन करीत आषाढी वारीसाठी पंढरीत

आषाढीचा ‘तुकाराम’ पॅटर्न !
विठुरायाच्या ओढीने राज्यभरातून पायी निघालेला वारकरी श्रद्धेने ‘जावू देवाचिया गावा... घेऊ तेथेचि विसावा...’ हा भक्तिभाव जतन करीत आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतो. दर्शन हेच ध्येय राखणाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबी दरवर्षी विसावा मात्र नसतोच. गर्दीमुळे होणारी खेचाखेची, अपुऱ्या सुविधांमुळे उडणारी तारांबळ, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वणवण, स्वच्छतागृहांची दुरवस्था, कुठेही पडलेली घाण आणि दुर्गंधीच्या साम्राज्यातच भक्ताला आपल्या लाडक्या विठुरायाला भेटावे लागते. ही परिस्थिती बदलून आषाढी वारीत वारकऱ्यांना शांत दर्शन आणि विसावा नक्की कधी लाभणार? या प्रश्नाचे उत्तर वर्षानुवर्षे मिळत नाही. करोडो रुपये खर्च होतात आणि वारी संपली की सर्व विषयांवर पडदा पडतो. पण आता परिस्थिती बदलून विठुरायाच्या भक्तांना आषाढी वारीत सुखद अनुभव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे बाराशे पालख्या आणि तब्बल पाच हजार दिंड्यांसह आठ लाखांच्यावर वारकरी आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. वारीचे नियोजन हा विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा क्रांतिकारी प्रयत्न यावर्षी होताना दिसतो आहे. भाजपा युतीच्या सरकारने मंदीर समिती बरखास्त केल्याने जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे मंदीर समितीचे सर्व अधिकार आले. मुंढेंनीही या संधीचा वापर करीत आषाढी वारी व्यवस्थापनाला नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. आपत्ती व्यवस्थापन पद्धतीमध्ये जगातील युरोप-अमेरिकेत ज्या पद्धतीचा अवलंब करण्यात येतो त्याच पद्धतीचा आधार घेण्यात आला. आयआरएस (इन्सिडन्ट रिस्पॉन्स सिस्टीम) नावाची पद्धत जून महिन्यात तयार करण्यात आली. त्यात आणीबाणीची परिस्थिती हाताळण्याची क्षमता असणारे विशेष पथक तयार करण्यात आले. ज्याचे ईओसी (इमर्जन्सी आॅपरेटिव्ह सेंटर) असे नामकरण करण्यात आले. एखाद्या आंतरराष्ट्रीय इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असणारी आॅर्गनायझेशनल चार्ट पद्धत विकसित करण्यात आली. यापूर्वी आषाढी वारीचे व्यवस्थापन, शासनाचे वेगवेगळे विभाग आपापल्या पद्धतीने वारीच्या कामात सहभागी असायचे. मुंढे यांनी मात्र नव्या पद्धतीत सर्व विभागांचे स्वतंत्र अस्तित्वच संपुष्टात आणले आणि आॅर्गनायझेशनल चार्ट पद्धतीने तब्बल पाच हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच टीम बनवली. त्याच टीममधील अप्रतिम समन्वयामुळे आषाढी वारीचा एक नवा तुकाराम मुंढे पॅटर्न तयार झाला, जो आषाढी वारी व्यवस्थापनातील एक क्रांतिकारी पाऊल ठरावा.
जे अनेक वर्षे घडले नाही ते या पॅटर्नने घडवून दाखविले. पंढरी आणि आषाढी वारीच्या समृद्ध परंपरा हा उभ्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तो जिव्हाळा जपला गेलाच पाहिजे. ही प्रत्येक भाविकाची अपेक्षा आहे. त्याच जिव्हाळ्याचा मूलाधार हा सर्वसामान्य वारकऱ्यांचा भक्तिभाव आहे. त्याच वारकऱ्यांना केंद्रिभूत ठेवून जिल्हाधिकारी मुंढे यांनी ठोस क्रांतिकारी पावले टाकली. राज्यभरातून येणाऱ्या पालख्यांच्या पालखी तळांचे विशेष नियोजन केले. प्रत्येक तळावर एक पथक तैनात केले. पंढरपूर शहरात तशाच प्रकारची पथके तयार केली. त्या पथकांमधील संवाद आणि समन्वयासाठी जागतिक दर्जाची हॅम रेडिओ ही तेवीस लाख रुपये किमतीची कम्युनिकेशन सिस्टीम विकत घेतली. याच सिस्टीमद्वारे ५२ वायरलेस वॉकीटॉकीद्वारे वारीची संपूर्ण यंत्रणा गतिमान केली जात आहे.
जिल्हाधिकारी मुंढे यांनी प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून त्यावर तातडीने कार्यवाहीचा सपाटा लावला. चंद्रभागा नदीपात्रात होणारी राहुट्यांची गर्दी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गैरसोयी यावर उपाय म्हणून वारकऱ्यांचा ६५ एकर क्षेत्र असलेला एक विशेष तळ विकसित केला. ज्या ठिकाणी वीज, पाणी, रस्ते, शौचालये आणि या सर्वांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा उभी केली. विष्णुपदाजवळ बंधारा बांधण्याची वर्षानुवर्षांची मागणी अवघ्या तीन महिन्यांत बंधारा बांधून पूर्ण केली. चंद्रभागेचे वारी काळातील वाहून जाणारे पाणी आता त्यामुळे स्थिर झाले आहे.
वाखरी, पिराची कुरोली, भंडीशेगाव या पालखी तळांच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याबरोबरच अकलूज, माळशिरस आणि पंढरपुरातील वारी मार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे धाडस दाखविले. आज पंढरीत अत्याधुनिक पद्धतीची १८,५०० स्वच्छतागृहे उभी करीत असतानाच मंदीर परिसर आणि दर्शनरांगदेखील अतिक्रमणमुक्त केली आहे. एकीकडे नदीपात्र प्रदूषण आणि अतिक्रमणमुक्त करताना वारीतच नव्हे तर वर्षभर वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे.
आषाढी वारीनिमित्त होणारी महापूजा, नित्य पूजा यांना किती वेळ द्यावा हा भावनेचा आणि वादाचा मुद्दा असू शकेल, परंतु वारकऱ्यांना २२ तास दर्शन खुले ठेवण्याचा मुंढेंनी घेतलेला निर्णय सर्वांनाच भावणारा आहे. सध्या आषाढीच्या निमित्ताने पंढरपुरात जे घडते आहे ते यापूर्वी कधी घडले नाही. दर्शन रांगेतील वारकऱ्यांना चहा आणि पिण्याचे पाणी देण्याचा निर्णय देखील ऐतिहासिकच ठरतो आहे. आता आषाढीचा ‘तुकाराम’ पॅटर्न वारकऱ्यांना फलदायी ठरून तो रूढ व्हावा, ही अपेक्षा.
- राजा माने
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)