अरविंदजी का ठुल्ला
By Admin | Updated: July 16, 2016 02:24 IST2016-07-16T02:24:45+5:302016-07-16T02:24:45+5:30
फार फार पूर्वी रेडिओ सिलोनवर ‘अनोखे बोल’ असा एक कार्यक्रम सादर व्हायचा. हिन्दी सिनेमातील गाण्यांमध्ये बऱ्याचदा यमक जुळविण्यासाठी वा अन्य कारणांसाठी

अरविंदजी का ठुल्ला
फार फार पूर्वी रेडिओ सिलोनवर ‘अनोखे बोल’ असा एक कार्यक्रम सादर व्हायचा. हिन्दी सिनेमातील गाण्यांमध्ये बऱ्याचदा यमक जुळविण्यासाठी वा अन्य कारणांसाठी अनाकलनीय किंवा अर्थहीन शब्दांचा वापर केला जातो. अशा गाण्यांवरच हा कार्यक्रम आधारित असायचा. सिनेसंगीताचे शौकीनदेखील मग असे अनोखे बोल असलेल्या गाण्यांचा आनंद घ्यायचे पण त्या अनोख्या बोलांचे मूळ किंवा त्यांचा अर्थ शोधण्याच्या भानगडीत मात्र पडायचे नाहीत. पण हिन्दी सिनेमातल्या गाण्यांचेच कशाला, नित्याच्या व्यवहारातदेखील अनेक लोक असेच अर्थहीन शब्द वापरत असतात आणि त्यांचा अर्थ तो वापरणाऱ्याला तर ठाऊक नसतोच पण ऐकणाराही त्याचा अर्थ शोधण्याच्या फंदात पडत नाही. पण दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश मुक्ता गुप्ता याला अपवाद असाव्यात. त्यामुळेच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘ठुल्ला’ या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी अक्षरश: घाम धरला आहे. केजरीवाल यांनी म्हणे दिल्ली पोलिसाना उद्देशून या शब्दाचा वापर केला होता. तो शब्द तमाम पोलीस खात्याची बदनामी करणारा असल्याचा आक्षेप घेऊन अजयकुमार तनेजा नावाच्या पोलिसाने केजरीवालांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल केला. खालच्या न्यायालयाने त्यांना न्यायालयात हजर राहाण्याचा हुकुम जारी केल्यावर केजरीवाल उच्च न्यायालयात गेले. त्यावर न्या. गुप्ता यांनी दिलासा तर दिला, पण येत्या २१ आॅगस्टला केजरीवाल यांनी ठुल्ला शब्दाचा अर्थ आपल्या न्यायालयासमोर सादर करावा असा हुकुमही जारी केला आहे. आपण या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी अनेक शब्दकोश चाळले पण तो मिळाला नाही. पण तुम्ही तो वापरलात म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ नक्कीच ठाऊक असणार असेही न्या. गुप्ता यांनी म्हटले आहे. कपिल शर्मा या हास्यवीराच्या कार्यक्रमात पूर्वी तो ‘बाबाजी का ठुल्लु’ असे तोंडाने म्हणत दोन्ही हातांची विशिष्ट क्रिया करीत असे. पण त्या कार्यक्रमाचे स्वरुपच एकप्रकारे ‘नॉन स्टॉप नॉन्सेन्स’ असे होते. राजकारण आणि मुख्यमंत्रिपद म्हणजे ‘स्टॅन्ड-अप कॉमेडी’ नाही हे या निमित्ताने केजरीवाल समजून न घेतील तर त्यांचीच कॉमेडी होणे ‘तय है’!