शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

लेख: लेकीचं लग्न ‘लॉन’वर कशाला? घरासमोरच लावू; लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका!

By सुधीर लंके | Updated: June 4, 2025 10:27 IST

मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी लग्नातल्या दिखाऊपणाला आळा घालण्यासाठी ‘आदर्श आचारसंहिता’ आणली आहे, तिचा सार्वत्रिक स्वीकार झाला पाहिजे.

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहिल्यानगर

अखिल भारतीय मराठा महासंघाने आता राज्यभर एक घोषवाक्य लिहायला सुरुवात केली आहे, ‘लोक म्हणतील होऊ द्या खर्च, पण मुला-मुलींच्या लग्नात करा जपून खर्च’. लग्नात खर्च-बडेजाव टाळा, लग्नमंडपाचे राजकीय व्यासपीठ बनवू नका, कुंडलीऐवजी मुला-मुलींचे कर्तृत्व पाहा, अशी आचारसंहिताच या संघटनेने आणली आहे. अहिल्यानगर येथील बैठकीत मराठा समाजाने ठराव केला की, ‘दोनशे लोकांत लग्न लावा’. अशी जाणीवजागृती करण्याची गरज मराठा समाजाला वाटू लागली आहे, हे स्वागतार्ह आहे.

वैष्णवी हगवणे या मराठा समाजातील विवाहित तरुणीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी शाही थाटात विवाह लावला. लग्नाला अजित पवारांसारखे बडे पाहुणे होते, सगळी धर्मकार्ये झाली. पण, या सगळ्या गोष्टी तिचा संसार नीट करू शकल्या नाहीत. हुंडा, कुंडली, ज्योतिष, मंगलाष्टके, वऱ्हाडी, अक्षता हे कुणीही तिला वाचवू शकले नाही. पैसे उधळले, धर्मसोपस्कार केले, म्हणजेच लग्न टिकेल ही अंधश्रद्धा आहे, हे लोकांना कळले. अशा काही घटना घडल्या की समाजभान जागे होते. तसे आताही घडले आहे.

मराठा समाज स्वत:ला प्रगत व पुढारलेला मानतो. पण, या समाजाने आजवर प्रबोधनाची कास धरलेली नाही, हे वास्तव आहे. पाटीलकीच्या तोऱ्याने मराठ्यांना प्रबोधनाच्या परंपरेपासून दूर ठेवले. १९१५ साली लिहिलेल्या ‘गावगाडा’ या पुस्तकात त्र्यंबक नारायण अत्रे म्हणतात, ‘मी सर्वांचा पोशिंदा आहे व माझ्यात सर्व दुनियेचा वाटा आहे, या धर्मसमजुतीने कुणबी हटत गेला आहे. तो आर्थिकदृष्ट्या चेंगरत गेला आहे.’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदेही तेच सांगत होते, ‘आता शेतकरीवर्गही दलित होऊ लागला आहे व आपल्याच शेतावर खंडदार होण्याचीही त्याची ऐपत राहिलेली नाही’. शिंदे मराठा समाजातले.. पण, ते सांगत होते, स्पृश्य-अस्पृश्य भेद टाळा. अर्थात शिंदेंनाही मराठा समाजाने आजवर समजून घेतले नाही, हे वेगळे!

विवाह हा कुटुंब व्यवस्थेचा कणा. विवाहात श्रीमंती उधळली, तरच संसार होईल असे नव्हे. तरीही लोक महागडे विवाह करतात. लग्न हा सामाजिक व राजकीय इव्हेंट बनविला गेला. मराठा नेते तर आपल्या लेकी राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरातच देऊ लागले, म्हणजे लेकीच्या लग्नातही मतांचा व प्रतिष्ठेचा हिशेब. पूर्वी खेडोपाडी लग्नात मांडवडहाळे व्हायचे, म्हणजे गावातील लोक बैलगाडीतून लग्नघरी आंब्याच्या झाडाचे डहाळे घेऊन जात मंडप साकारायचे. गावातील लोकच लग्नाचा स्वयंपाक बनवायचे. लग्न कसे पार पडले, हे मुलीच्या बापाला कळायचेदेखील नाही. गरीब कुटुंब असेल, तर गावच आहेर करून लग्न लावून द्यायचे. आता रिंग सेरेमनी, साखरपुडा, गडगनर, हळदी समारंभ, संगीत, मेहंदी, वैदिक विवाह, मुख्य विवाह, स्वागत समारंभ अशी इव्हेंटची साखळी बनली आहे. या प्रत्येक टप्प्यावर लाखोंचा खर्च.  भाड्याचे लॉन, आलिशान सेट, डीजे, वऱ्हाडींना भेटी, आशीर्वादाची राजकीय भाषणे, पंचपक्वान्न, शक्तिप्रदर्शन हे सगळे नखरे लग्नात आले. आता शेतकरीसुद्धा मोठायकी दाखविण्यासाठी कर्ज काढून शहरातील लॉन आरक्षित करतो. गावात घरासमोर मांडव घालून लग्न करणे त्याला अप्रतिष्ठेचे वाटू लागले आहे.

हे केवळ मराठा समाजातच आहे असे नव्हे. हा श्रीमंतीचा दिखावा हिंदू धर्मात सगळ्याच समाजात सुरू झाला आहे. श्रीमंती लग्नांना केवळ आई, वडील जबाबदार नाहीत. मुले-मुलीही हट्टाला पेटतात. त्यांनाही ‘प्री वेडिंग शूट’, महागडा मेकअप, लाखांचे कपडे हवे आहेत. लग्नात हौस नको का, ही त्यावरची मखलाशी. नात्यातील व गावातील सर्व विवाह एकाच दिवशी करता येतील. पण, तसे होत नाही.  पुढारी आल्याशिवाय बहुजन समाजात लग्न, दहावे, अंत्यविधी व्हायला तयार नाहीत एवढा समाज प्रतिष्ठेला हपापला आहे. लग्नपत्रिकेतच शंभर नावे असतात. कोरोनाने ‘शॉर्ट कट’ लग्नाची पद्धत शिकवली होती, तेव्हा पाच-पन्नास माणसांत लग्ने झाली. ते संसार टिकले नाहीत का? पण, समाज ही अर्थसाक्षरता स्वीकारायला तयार नाही.

या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी या सगळ्या दिखाऊपणाला आळा घालण्यासाठी 'आदर्श आचारसंहिता' आणली आहे. लग्नात डीजे-प्री वेडिंग-वरातीत दारु पिऊन नाचणे, भेटवस्तूंचा देखावा, पंगतीला पन्नास पदार्थ हे सारे बंद करावे असे  ही आचारसंहिता सांगते. कर्ज काढून खर्च नको हे सांगताना वरमाला घालताना नवरा-नवरीला उचलून घेण्यासारखे फाजीलपण टाळावे असेही बजावते. चार चार दिवस सोहोळे चालवण्याऐवजी साखरपुडा-हळद-लग्न एकाच दिवशी उरकावे असा व्यावहारिक सल्लाही या आचारसंहितेत आहे.

ही सुबुद्धी टिकली पाहिजे. सार्वत्रिक स्तरावर तिचा स्वीकार झाला पाहिजे. खोट्या प्रतिष्ठेपायी चाललेला लाखो रुपयांचा चुराडा टाळण्यासाठी, त्यातून येणारा कर्जबाजारीपणाचा ताण हलका होण्यासाठी हे व्यावहारिक शहाणपण गरजेचे आहे. ते मराठा समाजाने तर अंगीकारावेच; पण अन्य समाजांनीही त्यातून धडा घ्यावा.

sudhir.lanke@lokmat.com

 

टॅग्स :marriageलग्नmarathaमराठा