संजय भाटिया, माजी उपलोकायुक्त, महाराष्ट्र राज्य
माझ्या मागील लेखांमध्ये मी ‘तरुणांसाठी ध्यानाचे महत्त्व’ आणि ‘ध्यानाचा खरा उद्देश’, म्हणजेच ‘चेतनेची उत्क्रांती’ यासंदर्भात चर्चा केली होती. आजच्या लेखाद्वारे मी ध्यानामधील ‘शुद्धीकरणाची’ अत्यंत महत्त्वाची भूमिका स्पष्ट करणार आहे. ध्यानामधील शुद्धीकरण म्हणजे आपल्या वर्तनाच्या पद्धती ठरवणाऱ्या आणि आपल्या नेणीवेत खोलवर रुतलेल्या इम्प्रेशन्सना किंवा ठशांना पुसून टाकणे. आपल्यापैकी प्रत्येकाला असे जाणवते की, एखादी विशिष्ट परिस्थिती समोर आली की, आपण दरवेळी जवळजवळ सारख्याच प्रकारे व्यक्त होतो. आपली ही प्रतिक्रिया चिडचिड, राग, भीती, द्वेष, नैराश्य किंवा आकर्षण अशी कोणतीही असू शकते. याचे कारण म्हणजे अशा परिस्थितींविषयी आपल्या नेणीवेत एक विशिष्ट विचारपद्धती तयार झालेली असते आणि ती हळूहळू अधिक ठोस (कठीण) बनत जाते.
हे एका उदाहरणातून समजून घेऊ या : एकदा एक तरुण मुलगी वीज गेल्यामुळे पंधरा मिनिटे लिफ्टमध्ये अडकली. त्या वेळी तिला खूप भीती वाटली. या घटनेमुळे तिच्या मनावर लिफ्टमध्ये जाणे किंवा बंद जागेत राहणे याबद्दल एक खोल ठसा उमटला. हा ठसा तिच्या नेणीवेत गेला आणि प्रत्येक वेळी लिफ्टमध्ये जाताना तिला भीती वाटू लागली. कालांतराने ती वृद्ध झाली, पण तो ठसा कायम राहिला आणि तिला अजूनही लिफ्टची भीती वाटते. अशा प्रकारचे शेकडो उथळ किंवा खोल ठसे आपण दररोज तयार करत असतो. हे ठसे फक्त नकारात्मकच नसतात; ते सकारात्मकही असू शकतात. मात्र, जे ठसे अधिक मजबूत असतात ते नेणीवेत खोलवर रुजतात. पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धती असे मानतात की, हेच ठसे आपल्या आवडी-निवडी ठरवतात आणि जन्म-मृत्यूच्या चक्राचे कारण ठरतात. या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी विविध पद्धती या ठशांना दूर करण्याचा प्रयत्न करतात.
कसे होते शुद्धीकरण?
मी गेल्या एकोणीस वर्षांपासून करत असलेल्या ‘हार्टफुलनेस’ ध्यानपद्धतीतही शुद्धीकरणाला अत्यंत महत्त्व आहे. या पद्धतीत अंतर्गत शुद्धीकरण, खोल ठसे आणि वर्तनपद्धती दूर करण्यासाठी ‘स्वच्छता’ ही मुख्य प्रक्रिया आहे. योगिक ट्रान्समिशनच्या (प्राणाहुती) सहाय्याने प्रशिक्षक (प्रिसेप्टर) नव्या साधकाची सुरुवातीला थोडी स्वच्छता करतो, ज्यामुळे तो दैवी शक्तीशी जोडला जातो. त्यानंतर योगिक ट्रान्समिशन थेट साधकापर्यंत पोहोचते आणि त्याला सखोल ध्यान करण्यास व उच्च चेतनेच्या स्तरांपर्यंत पोहोचण्यास मदत करते. यानंतर प्रत्येक साधकाने दररोज सुमारे १५-२० मिनिटे अशा पद्धतीने शुद्धीकरण करणे आवश्यक असते, ज्यामुळे दिवसभरात साचलेले ठसे दूर होतात. तसेच, आठवड्यातून एकदा साधकाने प्रशिक्षकासोबत सुमारे ३० मिनिटे ध्यानसत्र (सिटिंग) घ्यावे, ज्यामुळे अधिक खोल शुद्धीकरण होते. अशा प्रकारे शुद्धीकरण तीन प्रकारे होऊ शकते.
- प्रारंभी प्रशिक्षकाद्वारे केलेले शुद्धीकरण.
- साधकाने स्वतः दररोज केलेले शुद्धीकरण.
- प्रशिक्षकासोबत केलेले सखोल शुद्धीकरण.
हार्टफुलनेसच्या या शुद्धीकरण प्रक्रियेमुळे अतिरेक वर्तन, नैराश्य, राग आणि झोपेचे विकार यांसारख्या मानसिक समस्या कमी होताना मी पाहिल्या आहेत. कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांसाठीही विशेष ‘केअर ग्रुप’ उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रशिक्षक रुग्णांना दूरस्थपणे शुद्धीकरण करून मानसिक बळ देतात. शेवटी, जसे आपण दररोज शरीराची स्वच्छता करतो, तसेच अंतर्गत शुद्धीकरण करणेही अत्यंत आवश्यक आहे.
विपश्यना ध्यानपद्धतीनुसार प्रत्येक भावना शरीरात एक शारीरिक संवेदना निर्माण करते. या पद्धतीत त्या संवेदनांकडे साक्षीभावाने पाहणे आणि त्यावर प्रतिक्रिया न देणे शिकवले जाते. यामुळे आपल्या मनात साठलेल्या विचार आणि वर्तनाच्या पद्धती तुटू लागतात. हीच ‘शुद्धीकरण’ प्रक्रिया आहे जी हळूहळू नेणीवेतील ठसे कमी करते. जवळजवळ सर्व आध्यात्मिक पद्धती काही ना काही प्रकारची ‘आंतरिक शुद्धीकरण’ करतात.