सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा डोक्याला बाम चोळतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:42+5:302021-03-20T06:53:18+5:30

न्या. डी. वाय. चंद्रचूड अलीकडे म्हणाले, “...तो शेवटचा परिच्छेद वाचताना मी काय भोगले, हे सांगणेही कठीण!”- असे झाले काय नेमके?

article on Supreme Court judge | सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा डोक्याला बाम चोळतात...

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जेव्हा डोक्याला बाम चोळतात...

Next

नंदकिशोर पाटील, कार्यकारी संपादक, लोकमत -

एखाद्या गुन्ह्यातील दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली म्हणजे न्याय! पण, न्यायाची संकल्पना एवढी संकुचित नाही. ‘न्यायदान’ ही  समाजावर दीर्घकाळ परिणाम साधणारी व्यापक प्रक्रिया असते. त्यामुळेच त्याची प्रक्रिया सहज, सोपी, सुस्पष्ट असली पाहिजे. भारतासारख्या देशात तर न्यायदानाची प्रक्रिया जटिल असल्याने  न्यायदान सहज, सोपे आणि सुस्पष्ट असावे, अशी अपेक्षा असते. विशेषत: निकालपत्रातील भाषा, वाक्यरचना आणि शब्दांची निवड अचूक हवी. 

हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयात असेच काहीसे झालेले दिसते. तो निकाल वाचताना डोक्याला बाम चोळावा लागला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशाच्या हायकोर्टाने दिलेल्या एका निर्णयावर सुप्रीम कोर्टात न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठासमोर  सुनावणी सुरू होती. न्या. शहा म्हणाले, “हायकोर्टाने दिलेला निर्णय आकलनापलीकडे आहे. निकालपत्रात मोठी-मोठी वाक्ये आहेत. ती वाक्ये कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात याचा मेळच लागत नाही. विरामचिन्हेही चुकीच्या ठिकाणी वापरली आहेत. हा निर्णय वाचल्यानंतर मला माझ्या आकलनाचीच शंका येऊ लागली. निर्णय नेहमी सोप्या भाषेत लिहावा. जो सामान्य व्यक्तीला समजेल!”

- तर न्या. चंद्रचूड म्हणाले, “हायकोर्टाच्या निर्णयातील शेवटचा परिच्छेद वाचल्यानंतर तर मला डोक्याला बाम लावावा लागला. मी सकाळी १०.१० मिनिटांनी हा निर्णय वाचायला घेतला आणि १०.५५ मिनिटांनी तो वाचून संपवला. हे वाचताना मी काय भोगले आहे, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझी अवस्था वर्णन करण्याच्या पलीकडे होती!”  

- हायकोर्टाचा निकाल वाचून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची अशी अवस्था झाली असेल तर सामान्य माणसाची काय गत? न्यायालयीन निकालपत्र हे ललित वाङ‌्मय नसते हे मान्य; परंतु  किमान ते दुर्बोध आणि संदिग्ध तरी असू नये.  महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून न्यायालयीन निकालपत्रांकडे पाहिले जाते. निकालपत्रात केवळ कायद्यातील कलमांचा अर्थ सुस्पष्ट करून भागत नाही, तर संदर्भासहित स्पष्टीकरणही अपेक्षित असते. आजवर अनेक न्यायाधीशांनी कालातीत ठरतील अशी अप्रतिम ‘जजमेन्ट्‌स’ लिहिली आहेत. रामजन्मभूमी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी निवाड्यांत न्या. चंद्रचूड यांनी लिहिलेली निकालपत्रे वाचण्यासारखी आहेत. केशवानंद भारती, इंदिरा सहानी, शहाबानो, ट्रिपल तलाक आदी गाजलेल्या खटल्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे आजही तितकेच महत्त्वाचे मानले जातात, ते त्यातील अन्वयार्थामुळे.  न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी सांगत , उत्तम वकील होण्यासाठी कायद्याच्या ज्ञानाबरोबरच विपुल वाचन, चौफेर दृष्टिकोन, तारतम्य, संवेदनशीलता आणि चिकित्सक वृत्ती लागते! याप्रमाणे समजण्यास सोपे निकलापत्रे देण्यात आली तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनाच काय, सामान्य माणसालासुद्धा डोक्याला बाम चोळावा लागणार नाही. नाहीतरी, आयुष्यात कधीच कोर्टाची पायरी चढावी लागू नये, अशीच आपल्याकडे सर्वसाधारण धारणा असतेच.

Web Title: article on Supreme Court judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.