लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!

By मनोज गडनीस | Updated: June 1, 2025 10:12 IST2025-06-01T10:10:39+5:302025-06-01T10:12:12+5:30

आजच्या घडीला सोशल मीडिया, विविध मोबाइल ॲप आदी माध्यमांतून सर्वाधिक पायरसी होत आहे.

Article Piracy is taking over the entertainment industry one person subscribes, but many watch! | लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!

लेख: मनोरंजन उद्योगाला पायरसीचे ग्रहण; एक जण घेतो सबस्क्रिप्शन, पण पाहणारे मात्र अनेक!

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

एकीकडे वाढत्या खर्चामुळे बॉलीवूडसह प्रादेशिक सिनेमा, तसेच ओटीटी यांच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच आता या मनोरंजनाला मोठ्या प्रमाणावर पायरसीचे ग्रहण लागल्याची माहिती एका अहवालाद्वारे पुढे आली आहे. ईवाय-आयएएएआय या दोन संस्थांनी ‘द रॉब रिपोर्ट’ नावाने पायरसीचा सखोल अभ्यास करून यासंदर्भात माहिती प्रकाशित केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, २०२३ या वर्षाचा अभ्यास केला असता, या एकाच वर्षात पायरसीमुळे सिनेमा उद्योगाचे २२ हजार ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळले.  या अहवालानुसार, कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर तो अवैधरित्या इंटरनेटच्या माध्यमातून बाजारात येतो. त्यामुळे या उद्योगात प्रामुख्याने सिनेमाच्या निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात काम करणारे कर्मचारी गुंतले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अहवालानुसार २०२३ मध्ये सिनेमाचे १३ हजार ७०० कोटी रुपयांचे, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणाऱ्या कार्यक्रमांचे ८७०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. देशातील ५१ टक्के लोक हे चित्रपटगृह अथवा ओटीटीचे अधिकृत सबस्क्रिप्शन न घेता पायरेटेड  कॉपीजद्वारे सिनेमा अथवा मालिका बघत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या घडीला सोशल मीडिया, विविध मोबाइल ॲप आदी माध्यमांतून सर्वाधिक पायरसी होत आहे.  

पायरसीचा फायदा काय?

ज्या अवैध वेबसाइट किंवा ॲप्सद्वारे पायरसी केली जाते, त्यांच्याकडे ग्राहक जास्त आल्यास जो कन्टेट प्रदर्शित केला जातो, त्यावर त्यांना महिन्याकाठी १० लाख रुपयांचा महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. 

जीएसटीचेही नुकसान

२२ हजार ४०० कोटी रुपयांच्या पायरसीमुळे सरकारला केंद्रीय वस्तू व सेवा करापोटी (जीएसटी)  मिळणारा ४३१३ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. 

सर्वाधिक पायरेटेड कंटेन्ट कोण पाहते?

वय वर्षे १९ ते ३४ या वयोगटातील लोक पायरेटेड कन्टेंट बघत असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदवण्यात आले आहे. चित्रपटाचे तिकीट काढून बघण्याकडे कल नसल्यामुळेच लोक पायरसीच्या माध्यमातून मोफत चित्रपट पाहतात. 

एक सबस्क्रिप्शन, पाहणारे मात्र अनेक

ओटीटी माध्यमांमध्ये जसजसे तुम्ही उच्च शुल्काचे पॅकेज घेता, तसे अधिक संख्येने लॉग-इन दिले जाते. आजच्या घडीला पाच प्रमुख ओटीटी माध्यमांच्या वार्षिक शुल्काचा विचार केला, तर ती रक्कम अंदाजे २० हजार रुपयांच्या घरात जाते. त्यामुळे अनेक लोक एकत्रितरित्या हे पैसे भरतात आणि त्याद्वारे एकाच लॉग-इनद्वारे अनेक लोक त्यावरील कन्टेट पाहतात. यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या महसूलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

कोणत्या भाषांना सर्वाधिक फटका?

  • ४०% - हिंदी
  • ३१% - इंग्रजी
  • २३% - दाक्षिणात्य
  • ६% - अन्य


कुठे किती ग्राहक अवैधरीत्या पाहतात?

  • भारत : ९ कोटी ३० लाख 
  • इंडोनेशिया : ४ कोटी ७५ लाख 
  • फिलिपाईन्स  : ३ कोटी ११ लाख
  • थायलंड : १ कोटी ८२ लाख
  • व्हिएतनाम : १ कोटी ६० लाख

Web Title: Article Piracy is taking over the entertainment industry one person subscribes, but many watch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.