सुधीर लंके निवासी संपादक, लोकमत, अहिल्यानगरबिबट्यांनी आपल्यावर हल्ला करू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी गळ्यात टोकदार पट्टे घातले आहेत. असे पट्टे शेतकरी आजवर पाळीव प्राण्यांच्या गळ्यात घालत होते. महिलाही मंगळसूत्र घालावे तसे हे पट्टे घालून शेतात कामाला जात आहेत. माणूस आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष किती टोकदार झाला आहे याचे हे ज्वलंत उदाहरण. गत जुलै महिन्यात विधिमंडळात माहिती देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, राज्यात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरही हे मृत्यू सुरूच आहेत. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात बिबट्याने अलीकडे तीन बळी घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातही हे घडले. नाशिकसारख्या शहरात बिबट्या घुसला. वनविभाग आता १० कोटी रुपये खर्चून १० हजार पिंजरे खरेदी करणार आहे.
बिबटे पकडून ते ‘वनतारा’त किंवा परराज्यात पाठवू, असेही वनमंत्री म्हणाले. बिबट्यांची नसबंदी करण्याचाही प्रस्ताव आहे. पण, खरेच तेवढ्याने भागणार आहे का? बिबट्यांचे अभ्यासक स्वप्निल कुंभोजकर यांचे म्हणणे आहे की, ‘बिबट्या आपला अधिवास सहसा लवकर बदलत नाही. पुणे जिल्ह्यात जुन्नर परिसरात जी धरणे झाली त्यातून जंगलाची जागा पाण्याखाली गेली. त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे सरकले. ही धरणे सत्तरच्या दशकात झाली. पण, बिबट्यांचे हल्ले साधारण सन २००० पासून दिसतात. याचा अर्थ विस्थापित झालेला बिबट्या जंगलातून माणसांकडे सरकण्यासाठी २५-३० वर्षांचा काळ लागला. आता त्याचा प्रवास पुन्हा जंगलाच्या दिशेने करायचा असेल तर तेही लवकर घडणार नाही. त्यासाठी दीर्घकालीन उपाय लागतील. पण, आत्ता तातडीने माणसांच्या सुरक्षेसाठी उपाय हवेत.’
वनमंत्र्यांनीही तात्पुरत्या व दीर्घकालीन उपायांबाबत भाष्य केले आहे. केनिया देशाने जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी ‘सोलर लायन लाईट’चा प्रकल्प राबविला. यात गावाच्या आसपास रात्री चमकणारे एलईडी फ्लॅश लाईट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्राणी गावाजवळ येण्याचे प्रमाण कमी होते. उत्तराखंडमध्ये जंगलाभोवती ‘लेमनग्रास, अगेव्ह, रम्बंस’ या गवतांचे कुंपण (बायोफेंसिंग) करण्यात आले आहे. यातून काटेरी, दाट वनस्पतींचा पट्टा तयार होतो. आपणाकडेही साबरकांडे ही काटेरी वनस्पती वनविभाग जंगलाच्या सीमेवर लावत होता. त्यातून मार्ग काढणे बिबट्याला सोपे नाही. पण, माणसांनी हे कुंपण टिकू दिले पाहिजे.
खेड्यातील लोकांना तातडीने चार्जेबल बॅटरी, काठ्या पुरविणे हे प्राथमिक उपाय आहेत, असे कुंभोजकरांसारखे तज्ज्ञ सांगतात. कारण बॅटरीच्या प्रकाशामुळे बिबट्या जवळ येत नाही. लोकांनी गळ्यात घातलेले काटेरी पट्टे हा दुर्दैवी उपाय आहे. पण, मानेवरील हल्ला हा सर्वांत जीवघेणा असतो. तो या पट्ट्यामुळे टळेल. शेतात काम करताना भ्रमणध्वनीवर किंवा ब्लू टूथच्या स्पिकरवर गाणे वाजविणे, मोठ्याने गप्पा मारणे हेही उपाय आहेत. कारण, आवाजाला बिबट्या घाबरतो.
घराजवळ उसाची शेती टाळणे हाही उपाय आहे. पण, शेतकरी ते करू शकत नाही. कारण त्याचे अर्थाजनच त्यावर आहे. दिवसाच वीज पुरवली तर शेतकऱ्यावर पिकाला पाणी देण्यासाठी रात्री बाहेर पडण्याची वेळच येणार नाही. अर्थात आता बिबट्या दिवसाही हल्ले करू लागला आहे. पण, तरीही काही प्रमाणात यास अटकाव बसेल. त्यामुळे आता वनखात्याने एकट्याने आपले घोडे दामटू नये. या विषयावर साध्या ग्रामसभा अद्यापपर्यंत बोलावलेल्या नाहीत. अनेक गावे दहशतीखाली आहेत. ग्रामसभा घेऊन लोकांकडे, अभ्यासकांकडे काय उपाय आहेत ते सरकारने ऐकले पाहिजे. जिल्हा प्रशासनही यात सतर्क हवे. सरकार दुर्लक्ष करीत राहिले तर लोकांचा क्षोभ वाढेल. वनखाते हाताची घडी घालून बसले तर बिबट्यांना थेट मारुनच टाका या चर्चेला जोर चढेल. कारण हाडामांसाची माणसे डोळ्यांदेखत मृत्युमुखी पडत आहेत. बिबट्या जगलाच पाहिजे. पण, अगोदर माणूस जगला पाहिजे हे सरकारला लक्षात घ्यावे लागेल. बिबट्या गावात आहे, सरकारने केवळ मंत्रालयातून धोरण ठरवून कसे चालेल?
Web Summary : Escalating leopard attacks instill fear, prompting villagers to take drastic measures for safety. Experts suggest immediate solutions like lighting and long-term strategies like bio-fencing. The Forest Department faces pressure to protect both humans and leopards, urging community involvement and proactive measures to prevent further conflict.
Web Summary : बढ़ते तेंदुए के हमलों से दहशत, ग्रामीणों को सुरक्षा के लिए कठोर उपाय करने के लिए प्रेरित किया जा रहा है। विशेषज्ञ प्रकाश व्यवस्था जैसे तत्काल समाधान और बायो-फेंसिंग जैसी दीर्घकालिक रणनीतियों का सुझाव देते हैं। वन विभाग मनुष्यों और तेंदुओं दोनों की रक्षा के लिए दबाव का सामना कर रहा है, सामुदायिक भागीदारी और आगे संघर्ष को रोकने के लिए सक्रिय उपायों का आग्रह किया जा रहा है।