शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नुसत्या ‘माहिती’पासून ‘शहाणपणा’पर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 08:36 IST

२०१० च्या सुमारास गणनक्षमतेची गणकनंदा अन् विदेची विदारथी या दोन स्वतंत्र नद्यांचा संगम झाला. यातूनच पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा गंगौघ सुरू झाला.

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक

उत्तराखंडमध्ये देवप्रयाग नावाचे गाव आहे. हिमालयातून निघणाऱ्या अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांचा संगम तिथे होतो. तिथून सुरू होतो गंगेचा मुख्य ओघ. गंगेचे पावित्र्य आणि महत्त्व इथून अधिकच वाढते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गंगेबाबतही असेच काहीसे म्हणता येते. गणनक्षमता म्हणजे कम्प्युटिंग आणि विदा म्हणजे डेटा या दोन प्रवाहांचा संगम झाल्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा गंगौघ निर्माण होऊ शकला. चार्लस बार्बेज, एदा लोवेलिअस, अँलन ट्यूरिंग, फ्रँक रोझनब्लाट यांच्यापासून ते डार्टमाऊथ परिषदेतील तज्ज्ञांपर्यंत अनेकांच्या कार्यातून घडत गेला तो गणनक्षमतेचा प्रवाह. संगणकाची कल्पना, रचना, आज्ञावली, गणिती सूत्रे आणि तर्क, इलेक्ट्रॉनिक्स, माहितीशास्त्र अशा अनेक क्षेत्रातील योगदानातून गणनक्षमतेचा प्रवाह मोठा होत गेला. कृत्रिम बुद्धिमत्तेची चुणूक त्यात दिसत होती. त्यातून मोठा गंगौघ निर्माण होऊ शकेल, हेही जाणवत होते; पण प्रत्यक्षात मात्र ते घडत नव्हते. मागील लेखात उल्लेख आल्याप्रमाणे बीस साल बाद या आश्वासनाच्या चक्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवाह अडकून बसला होता.विदाशास्त्राचा प्रवाहही त्याच्या गतीने वाहत होताच. एकोणविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बार्बेज, लोवेलिअस यांच्या कामातून संगणनशास्त्राचा प्रवाह सुरू झाला. साधारणतः त्याच काळात विल्यम फार आणि फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या कामातून विदानिर्मिती आणि वापराचा झरा वाहू लागला होता; पण त्याला आकार आणि वेग नव्हता. मुळात विदानिर्मितीच कमी होती आणि ज्या रुपात ती होत होती ती गणनक्षमतेशी सुसंवादी नव्हती. मुळात विदा म्हणजे काय? विदा म्हणजे कुठल्याही अस्तित्वाची केलेली नोंद.उदाहरणार्थ वर्गात विद्यार्थी फक्त उपस्थित असल्याने त्याची विदा होत नाही. त्या उपस्थितीची हजेरीपटावर किंवा डिजिटल पद्धतीने नोंद केली तर विदा निर्माण होते. या नोंदीवर किंवा विदेवर जेव्हा काहीएक प्रक्रिया होते तेव्हा त्याला माहिती म्हणतात. ही प्रक्रिया अगदी नाव देणे, मोजणे किंवा वर्गवारी करणे इथपासून ते त्यातील कल शोधणे इथपर्यंत अनेक प्रकारची असू शकते. या माहितीवर विश्लेषण करणे, पडताळा घेणे, इतर माहितीशी सहसंबंध शोधणे अशा विविध प्रक्रिया केल्या की त्यातून निर्माण होते ते ज्ञान आणि अशा विविध प्रकारच्या ज्ञानाच्या आणि मूल्यांच्या संयोगातून जो विधायक, कृतिपूरक दृष्टिकोन साकारतो ते शहाणपण. विदा ते शहाणपण असा हा मानवी बुद्धिमत्तेचा आणि जाणिवेचा एक मोठा प्रवास आहे आणि अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेचाही. विदा निर्माण करणे, ती साठवणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्यातून ज्ञान निर्माण करणे हा तसा दैनंदिन जगण्यातला व्यवहार. तो महत्त्वाचाच; पण कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी फक्त तेवढे पुरेसे नाही.विदा योग्य रुपात मिळाली तरच एक आणि शून्याच्या भाषेतून सगळ्या गोष्टी समजू शकणाऱ्या गणनव्यवस्थेला ती उपयोगाची आणि ती योग्य प्रमाणात मिळाली तरच त्यापासून निघणारे निष्कर्ष आणि भाकिते विश्वासार्ह. मानवी प्रयत्नांतून आणि कागदांच्या माध्यमावर नोंदली जाणारी विदा त्यादृष्टीने तशी असंगत आणि अपुरी. ही कोंडी फुटली ती डिजिटल तंत्रज्ञानामुळे. डिजिटल तंत्रज्ञान म्हणजे शून्य आणि एक या भाषेत समजून घेणारे आणि नोंदी ठेवणारे तंत्रज्ञान. संगणक हा त्याचाच आविष्कार; पण संगणकाप्रमाणेच विविध प्रकारचे डिजिटल संवेदक (सेन्सर्स), कॅमेरे, माईक, डिजिटल ओळखपत्रे (आधारकार्ड), चलनपत्रे (डेबिट क्रेडिट कार्डस्) हे जसजसे आपल्या जगण्याचा भाग होऊ लागले तसतशी डिजिटल विदा वेगाने वाढू लागली. एका अंदाजानुसार विसाव्या शतकाखेर उपलब्ध एकूण विदेपैकी फक्त २५ टक्के विदा डिजिटल स्वरुपात साठविलेली होती; पण इंटरनेट व इतर जाळ्यांमुळे आज ती ९८ टक्के आहे. डिजिटल साधनांच्या वापरासरशी क्षणोक्षणी विदा तयार होते व साठविली जाते. आज कोणता पदार्थ बनविला, हे दाखविणाऱ्या पोस्टपासून ते आपल्या वैद्यकीय अहवालापर्यंत आणि किरकोळ वाणसामानाच्या खरेदीपासून ते आपल्या राजकीय मतांपर्यंत आणि औपचारिक संवादापासून ते प्रणयी संवादापर्यंत जगण्याच्या जवळजवळ प्रत्येक व्यवहाराचे डिजिटायझेशन होते आहे. मोबाइल फोन, सीसीटीव्ही कॅमेरे, इमेल्स, ट्वीट, फेसबुक पोस्ट, इन्स्टा स्टोरी, पेमेंट ॲप अशा अनेकानेक मार्गाने आपल्या अस्तित्वाच्या, जगण्याच्या आणि दैनंदिन व्यवहारांच्या जवळजवळ अनेक नोंदी ठेवल्या जात आहेत. त्यातून प्रचंड विदा निर्माण होत आहे आणि ती जगण्याच्या अधिक जवळ सरकत आहे. या खोलवरच्या बदलांचा अंदाज १९९०च्या मध्यापासूनच येऊ लागला होता.सिलिकॉन ग्राफिक्स कंपनीतील विदातज्ज्ञ जॉन मॅशी यांनी त्याला नाव दिले- बिग डेटा. मराठीत महाविदा. अनेक प्रकारच्या गोष्टी समजून घेण्यासाठी आणि भाकिते करण्यासाठी उपयोगी पडेल, अशी प्रचंड आणि वर्धमान विदा म्हणजे महाविदा अशी संकल्पना त्यांनी मांडली. नव्वदीनंतरच्या काळात विदा नुसती वेगाने वाढत होती असे नव्हे तर ती साठवणे, तिचे रुपांतर करणे, तिच्यावर प्रक्रिया करणे या एरवी कठीण असलेल्या गोष्टीही सुलभ होत होत्या. मायक्रोचिप आणि संगणन क्षमतेतील वाढ, साठवणुकीचे प्रमाणीकरण, विदा रुपांतराच्या सुलभ सुविधा आदींमुळे ही महाविदा ही फक्त अचंब्याने फक्त पाहात राहावी, अशी स्थिती राहिली नव्हती.

विदेच्या प्रवाहाला वळण देण्याचे, बांध घालण्याची क्षमता प्राप्त झाली होती. साधारण २०१० च्या सुमारास, संगणकक्षेत्र आणि विद्यापीठांप्रमाणाचे उद्योगजगत, शासनव्यवस्था, धोरणकर्ते अशा अनेक क्षेत्रांना महविदेचे दूरगामी महत्त्व लक्षात येऊ लागले होते आणि या महाविदेवर वाढती कृत्रिम गणनक्षमताच काम करू शकेल, हेही लक्षात आले होते. एका अर्थाने बॅबेज, एदा, फार आणि नाईटेंगेल यांच्यानंतर दिडेकशे वर्षांनी आणि डार्टमाऊथ परिषदेनंतर पन्नासेक वर्षांनी म्हणजे २०१०च्या सुमारास गणनक्षमतेची गणकनंदा आणि विदेची विदारथी या दोन स्वतंत्र नद्यांचा संगम झाला. या संगमातूनच आपल्याला आज जो जाणवतो तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा गंगौघ सुरू झाला.vishramdhole@gmail.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञान