शंतनु कुवेसकर वन्यजीव संशोधक, माणगाव
भारतीय पेंगोलिन म्हणजे साध्या सोप्या मराठीत खवले मांजर (शास्त्रीय नाव: Manis crassicaudata). एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमयी प्राणी. त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, म्हणजेच संपूर्ण शरीरावर असलेली मजबूत खवले (स्केल्स), हीच त्याची ओळख पटवणारी खास खूण. ही खवले केराटिनपासून बनलेले असतात आणि मानवी नखांप्रमाणेच असतात. ही संरचना त्याला नैसर्गिक संरक्षण देते.
खवले मांजर मुख्यतः निशाचर प्राणी आहेत, ते रात्री सक्रिय असतात. मुख्यत्वे जमीन खणून त्यात राहतात. मुंग्या, वाळवी आणि इतर कीटक हा त्यांचा प्रमुख आहार आहे. आपल्या लांब चिकट जिभेच्या साहाय्याने हे प्राणी वारुळांमधून मुंग्या, वाळवी तसेच बिळांमधून कीटक बाहेर काढून खातात. त्यांना दात नसतात, त्यामुळे त्यांची खाण्याची पद्धत अनोखी असते.
लांब जिभेला चिकट लाळेच्या साहाय्याने चिकटलेले कीटक जिभेच्याच साहाय्याने गिळतात. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांतील जंगलांमध्ये खवले मांजर आपले अस्तित्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत टिकवून आहे. कोकण परिसरासह पुणे आणि इतर काही जिल्ह्यांतही खवले मांजर आढळल्याच्या नोंदी आहेत. कोकणाची घनदाट जंगलं, भरपूर कीटक आणि ओलसर हवामान हे या प्राण्याच्या निवासासाठी अनुकूल मानले जाते.
कोकणातील स्थानिक आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी याच्या संवर्धनासाठी पावले उचलली आहेत. जनजागृती, संशोधन आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळेही या प्राण्याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण होऊ लागली आहे. अलीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक नागरिक या प्राण्याबाबत अधिक जागरूक झाल्याचे आढळते.