लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
By विजय दर्डा | Updated: November 3, 2025 05:53 IST2025-11-03T05:52:15+5:302025-11-03T05:53:03+5:30
सर्वात जास्त अणुबॉम्ब आपल्याकडे असावेत; म्हणजे आपल्या दादागिरीला जगभरातून कोणी आव्हान देऊ शकणार नाही, अशी अमेरिकेची इच्छा दिसते.

लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
डाॅ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
आपण आपला खरा चेहरा कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस तो समोर आल्याशिवाय राहत नाही, अशी एक जुनी म्हण आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतही असेच झाले. आतापर्यंत ते शांततेचा राग अशा प्रकारे आळवत होते की त्यांच्यापेक्षा कोणीही शांततेचा दुसरा मोठा दूत अजून जन्मालाच आलेला नाही. परंतु, रशियाने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राचे परीक्षण करताच ट्रम्प यांनी सरळसरळ अणुबॉम्ब परीक्षणाचे आदेश देऊन टाकले.
जगातील अशांतता आपण संपवू इच्छितो, असे ट्रम्प सातत्याने म्हणत आले आहेत. आपण अनेक युद्धे थांबवली, असा दावाही ते करतात; परंतु वास्तव काही वेगळेच आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबविण्याचा त्यांचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. काँगो आणि रवांडा यांच्यातील युद्ध संपलेले नाही. इजिप्त आणि इथिओपिया यांच्यात कुठले युद्ध सुरूच नव्हते. केवळ पाण्यावरून काही वाद होता. सर्बिया आणि कोसोवोमध्ये तणाव अजूनही आहे. कंबोडिया आणि थायलंडमध्ये सीमेच्या प्रश्नावरून शांतता असली तरी युद्ध थांबलेले नाही. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये शांततेचा करार झाला; परंतु इस्रायलने पुन्हा हल्ले केले. गेल्याच आठवड्यात गाझा पट्टीत १००पेक्षा जास्त लोक मारले गेले. असे असताना, ट्रम्प शांततेच्या कसल्या गप्पा करतात?
रशियाने आण्विक ऊर्जेवर चालणाऱ्या विशेष क्षेपणास्त्राचे परीक्षण केले. सुमारे १५ तास ते हवेत होते आणि या काळात अनेकदा त्याची दिशा बदलली गेली. या क्षेपणास्त्रावर अणुबॉम्ब लावता येऊ शकतो. हे क्षेपणास्त्र सर्व प्रकारच्या रडार्सना चुकवू शकते. तसे पाहता रशियाने अशा प्रकारच्या क्षेपणास्त्राची घोषणा २०१८ सालीच केली होती. २०२३ साली पुतीन यांनी त्याचे परीक्षण यशस्वी झाल्याचा दावाही केला होता. परंतु, पश्चिमेतील देशांनी रशियाचा हा केवळ देखावा आहे असे म्हटले होते. आता रशियाने पुन्हा एकदा परीक्षण केले तर अमेरिकेसहित अन्य पश्चिमी देशांच्या विशेषत: नाटो राष्ट्रांच्या पोटात गोळा उठला. शस्त्रास्त्र स्पर्धेत रशियाची आघाडी अमेरिकेला सहन कशी होईल?
डोनाल्ड ट्रम्प तत्काळ मैदानात उतरले आणि त्यांनी अमेरिकेच्या युद्ध खात्याला अण्वस्त्र परीक्षण सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जाता जाता असाही दावा केला की, अमेरिकेजवळ अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत जास्त अण्वस्त्रे आहेत. मग प्रश्न असा, अमेरिकेकडे आधीपासूनच जास्त अण्वस्त्रे असतील तर पुन्हा नव्या अण्वस्त्रांची गरजच काय? प्रत्यक्षात सर्वाधिक अण्वस्त्रे असल्याचा त्यांचा दावा खरा नाही. २२ साली ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट’ने असे सांगितले होते की, रशियाजवळ ५९७७ आणि अमेरिकेकडे ५४२८, चीनकडे ३५०, फ्रान्सकडे २९०, त्याचप्रमाणे ब्रिटनकडे २२५ अणुबॉम्ब आहेत. याशिवाय पाकिस्तानजवळ १६५, भारताकडे १६०, इस्रायलकडे ९० आणि उत्तर कोरियाजवळ २० अणुबॉम्ब आहेत. अण्वस्त्र स्पर्धेत आपण पुतीन यांच्या मागे आहोत, ही गोष्ट ट्रम्प यांना खटकत असली पाहिजे; एरवी त्यांनी पुन्हा एकदा अण्वस्त्र परीक्षणाचे आदेश दिले नसते.
अश्वमेधाचा जो घोडा घेऊन ट्रम्प निघाले आहेत, त्याचा लगाम पुतीन यांनी हाती घेतला आहे. आपण काही करू शकत नाही, हे स्वत: ट्रम्प ओळखून आहेत. इच्छा असूनसुद्धा ते युक्रेनला घातक अमेरिकन क्षेपणास्त्रे देऊ शकत नाहीत; कारण रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका पडली तर ते आम्ही रशियाविरुद्ध युद्ध मानू, अशी धमकी पुतीन यांनी दिली आहे.
पुतीन यांनी रशियाच्या अण्वस्त्र वापराचे धोरणही बदलले आहे. अमेरिकेने जर घातक क्षेपणास्त्रे युक्रेनला दिली आणि त्यातून रशियावर हल्ला झाला, तर रशिया असे मानेल की हल्ल्यात अमेरिकाही सामील आहे. रशियावर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई हल्ले होत असतील तर रशिया अण्वस्त्र वापरूनच उत्तर देईल, असे हे धोरण सांगते. धोरणबदल केल्यानंतर पुतीन यांनी असेही सांगून टाकले की, रशिया अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार आहे. प्रत्यक्षात सद्य:स्थितीत कोणताही देश अण्वस्त्र वापरण्याचा विचारही करू शकत नाही. कारण तसे झाल्यास जग नष्ट होईल. असे मानून चालू की, हा केवळ घाबरविण्याचा प्रयत्न आहे. परंतु, असे उद्योग करून ट्रम्प यांनी शांततेच्या गप्पांचे पितळ उघडे पाडले. शस्त्रास्त्रांचा सौदागर असलेला अमेरिकेचा एक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
ताजा कलम :
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ताजा अहवाल आश्चर्यकारक नसला तरी चिंता उत्पन्न करणारा नक्कीच आहे. भारतातील सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत; परंतु त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ५४ नद्या प्रदूषित असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
राज्यसभेतील माझ्या कार्यकाळात संसदच्या पर्यावरण समितीचा सदस्य म्हणून आम्ही नद्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी व्यापक दौरा केला होता आणि एक अहवालही सरकारला सादर केला होता की, नद्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत तसेच शहरांमधील नालेही धोक्यात आहेत. तेव्हापासून परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. नद्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष द्यायला हवे. एक नदी मरते तेव्हा तिच्या आसपासच्या जनजीवनावर आणि प्रदेशावर घातक परिणाम होतात. नद्या जपण्यासाठी आपण आपल्या पातळीवर काही करू शकतो का, हा प्रश्न गंभीर आहे.
vijaydarda@lokmat.com