नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमतछत्रपती संभाजीनगर
सिनेसृष्टीतील कलाकार सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत नाहीत, समाजापासून तुटलेले राहतात, अशी टीका अनेकदा होत असते. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात राहणारे कलाकार आपल्या प्रतिमेची काळजी घेतात, वादांपासून दूर राहतात, असेही म्हटले जाते. परंतु, पुट्टपर्थी येथील एका समारंभात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने व्यक्त केलेल्या भावना या टीकेला अपवाद ठरतात. तिच्या भाषणाची प्रसारमाध्यमांनी फारशी दखल घेतली नसली, तरी ते भाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथे सत्यसाई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, सचिन तेंडुलकर यांसारख्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी ऐश्वर्या रायने केलेल्या भाषणाने अनपेक्षितपणे सर्वांचे लक्ष वेधले. धर्म, जात आणि भाषा या आजच्या सर्वात नाजूक, संवेदनशील विषयांवर तिने अत्यंत सुयोग्य शब्दांत दिलेला संदेश मनाला थेट भिडणारा होता. ‘धर्म एकच-प्रेमाचा; भाषा एकच-हृदयाची आणि देव एकच-सर्वव्यापी!’ अशा साध्या, पण विलक्षण प्रभावी वाक्यांनी तिने सभागृहातील हजारोंच्या मनावर मोहिनी घातली. जागतिक सौंदर्यवतीचा मुकुट जिंकलेल्या ऐश्वर्याची ओळख एक अभिनेत्री आणि अमिताभ बच्चन यांची सून अशी. पण, ती धर्मशास्त्र विषयाची स्नातक असून, तिने शिकलेले धर्मशास्त्र समाजा-समाजात दुभंग पेरणारे नसून, मानवतेची शिकवण देणारे आहे, याचा परिचय यानिमित्ताने झाला.
भारतात धर्म, जात, भाषा आणि प्रांत या आधारांवर फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. राजकीय व सामाजिक पातळीवर विद्वेषाचे वातावरण निर्माण करणाऱ्यांची कमतरता नाही. अशावेळी समाजातील प्रत्येक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे ही काळाची गरज असते. म्हणूनच, सध्याच्या सामाजिक परिस्थितीत ऐश्वर्याने एकात्मता, सहअस्तित्व, परस्पर आदर आणि विविधतेतील सौंदर्य याबद्दल केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरते. धर्म किंवा भाषा वेगळ्या असू शकतात, परंतु मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे, ही साधी पण प्रभावी आठवण तिने करून दिली. तिच्या भाषणातील भावनिक सूर हे कोणत्याही राजकीय पक्षाकडे झुकणारे नव्हते, तर सामाजिक मूल्यांना जपण्याचा आग्रह धरणारे होते. सध्याच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात अशी परखड भूमिका मांडण्यासाठी धारिष्ट्य लागते. ऐश्वर्याने ते दाखवले, हे कौतुकास्पदच!
जाती, धर्म आणि भाषेवरून समाजात दुभंग निर्माण होतो, तेव्हा सिनेमा, कला आणि संस्कृती आदी क्षेत्रांतील प्रतिभावंतांनी सेतूची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा असते. समाजातील प्रभावशाली व्यक्ती जर संवेदनशील मुद्द्यांवर नि:संकोच बोलू लागल्या, तर फूट पाडणाऱ्यांचा आवाज आपोआपच दबला जातो. ऐश्वर्याचे भाषण यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले पाहिजे. इतिहासात अनेक लेखक-कलावंतांनी सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेतल्याचे दाखले आहेत. आणीबाणीच्या काळात लेखक, नाटककार, अभिनेते यांनी दडपशाहीला निर्भयपणे विरोध केला. विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, श्याम बेनेगल, डॉ. श्रीराम लागू यांनी राजकीय झुंडशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या प्रयत्नांविरोधात परखड भूमिका घेतली. सामाजिक प्रश्नांवर स्पष्ट आणि निर्भीड मतप्रदर्शन केले.
तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि प. बंगालमध्ये आजही अनेक कलाकार राजकीय प्रश्नांवर उघडपणे बोलतात, चळवळीत सहभागी होतात. तिथे कलावंतांच्या हस्तक्षेपाला ‘सामाजिक कर्तव्य’ समजले जाते. मात्र, राष्ट्रीय पातळीवर गेल्या काही वर्षांत इंग्रजीत ज्याला ‘डार्क सायलेन्स’ म्हणतात, अशी लक्षणीय शांतता जाणवते. कलाकार, लेखक-दिग्दर्शकांनी मौन धारण करणे पसंत केले आहे. या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या रायसारख्या अभिनेत्रीने धर्म-जाती-भाषा भेदांविरोधात इतक्या थेटपणे बोलणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. दुर्दैवाने तिच्या भाषणाचे काही भाग एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने विकृत करून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. सत्यापेक्षा अफवांचा वेग नेहमीच जास्त असतो; तरीही तिच्या मूळ भाषणात व्यक्त केलेली मानवतेची हाक काळाच्या प्रवाहात अधिक प्रभावी ठरते. ऐश्वर्याने व्यक्त होण्याचे धारिष्ट्य दाखवले, इतरांचे काय? कारण, कलावंत म्हणून नव्हे तर संवेदनशील नागरिक म्हणून जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे. nandu.patil@lokmat.com
Web Summary : Aishwarya Rai's speech on unity and humanity at an event went viral. She emphasized love, heart, and universal God, contrasting divisive forces. Her courage inspires other artists to speak up for social values and harmony amidst polarization, fulfilling their duty as citizens.
Web Summary : एक कार्यक्रम में ऐश्वर्या राय का एकता और मानवता पर भाषण वायरल हुआ। उन्होंने प्रेम, हृदय और सार्वभौमिक भगवान पर जोर दिया, जो विभाजनकारी ताकतों के विपरीत है। उनका साहस अन्य कलाकारों को सामाजिक मूल्यों और ध्रुवीकरण के बीच सद्भाव के लिए बोलने के लिए प्रेरित करता है, नागरिक के रूप में अपना कर्तव्य पूरा करता है।