शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

हम बने थे तबाह होने को, तेरा इश्क बस एक बहाना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 07:22 IST

अभिजात कलाकृती मागे ठेवून आत्मनाशाच्या मार्गाने अकाली निघून गेलेल्या गुरुदत्त या अवलिया कलावंताची जन्मशताब्दी आजपासून सुरू होत आहे..

लीना पांढरे, ख्यातनाम लेखिका, आस्वादक

व्यक्तिगत जीवनात आत्मविनाशाच्या वाटेवर चालत जाणारा, कीर्तीच्या शिखरावर  असतानाच अवघ्या एकोणचाळिसाव्या वर्षी मदिरेच्या कैफात, झोपेच्या गोळ्या घेऊन  स्वतःचा आत्मघात करून घेणारा गुरुदत्त ! याच्या जगण्यात आणि चित्रपटात पराभवाच्या कृष्णसावल्या रेंगाळत असल्या, तरीही अस्सल रोमँटिसिझम काठोकाठ भरलेला आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, नृत्यदिग्दर्शक आणि लेखक अशा अनेक भूमिका बजावणारा हा सव्यसाची कलाकार त्याच्या चित्रपटातील कलात्मकता, प्रकाशयोजना, शोकांतिकेला महाकाव्यानजीक नेण्याचं  सामर्थ्य, सामाजिक भाष्य आणि स्वर्गीय  संगीत यामुळे ओळखला जातो.

गुरुदत्त यांचं खरं नाव वसंत कुमार पदुकोण. कर्नाटकातील मंगळुरूमध्ये जन्म. मातृभाषा कोकणी. पण, बंगाली संस्कृतीच्या प्रेमात असल्याने त्याने नाव घेतलं गुरुदत्त ! आधी कलकत्ता, नंतर मुंबई असा गुरुदत्त यांचा सिनेसृष्टीतील प्रवास झाला.  गुरुदत्तच्या  आयुष्यात  आणि चित्रपटात रोमँटिसिझम  असला आणि स्वतःच्या आयुष्यातील  आत्मविनाशाच्या वाटेवरील वेदनांना मुखर करणारे नायक त्याने रंगवले असले, तरी सामाजिक वास्तवाचं करूण भीषण स्वरूप त्याच्या चित्रपटातून व्यक्त होतं. व्यक्तिगत-सामाजिक जीवनातील अन्याय आणि संघर्ष याला गांजून वर्डस्वर्थ, शेलीप्रमाणे निसर्गाकडे परत जाण्याचा मार्ग गुरुदत्तचे नायक स्वीकारत नाहीत गुरुदत्त आपल्या नायक, नायिकांना निसर्गरम्य स्थळीही पाठवत नाही. ‘सून सून सून जालिमा’ व ‘जाने कहा मेरा जिगर गया जी’ ही गाणी गॅरेज आणि ऑफिसमध्ये चित्रीत झालेली आहेत. गुरुदत्तने बंबईया हिंदीचा वापर संवादात केला आहे. साध्या सामान्य माणसांचं जगणं, त्यांचे प्रेमभंग, त्यांचं प्रेम बहरण्याच्या जागाही साध्याच. म्हणजे, ऑफिस, गॅरेज, साधीसुधी घरं  चित्रीत करताना गुरुदत्तमधील करुणामयी मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रत्यय सतत येतो.

विमल मित्रा यांच्या कादंबरीवर आधारित ‘साहिब बीबी और गुलाम’ या चित्रपटात गुरुदत्तने एकोणिसाव्या शतकातील बंगाल उभा केलेला आहे. जमीनदारी, सरंजामशाही, जमीनदारांच्या घरात सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिवान होऊन पडलेल्या अभागी स्त्रिया, ब्रिटिशांविरुद्ध विद्रोह करणारे स्वातंत्र प्रेमी भारतीय लोक या साऱ्याचे नेमके चित्रण या चित्रपटाला एक भव्य  समाजशास्त्रीय आयाम  प्राप्त करून देते. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक अस्थैर्याचे अत्यंत अस्वस्थ चित्रण या चित्रपटात आहे. 

‘कागज के फूल’ ही बॉक्स ऑफिसवर सडकून आपटलेली,  पण कलात्मक पातळीवर जागतिक चित्रपटांच्या क्रमवारीत अव्वल असणारी अभिजात कलाकृती आहे. कुठलाही व्यावसायिक मसाला नसणारा हा अद्वितीय शुद्ध  अभिजात चित्रपट निर्माण करण्याचा जुगार कलंदर गुरुदत्तच खेळू जाणे ! या चित्रपटाचे कथानक ही स्वतः गुरुदत्तचीच जीवन कहाणी.  गुरुदत्तचीच कहाणी पुन्हा सांगणारा, पण बॉक्स ऑफिसवर हिट झालेला ‘प्यासा’ आजही लाखो सिनेप्रेमींच्या मर्मबंधातील ठेव आहे.  असाधारण प्रतिभेचा हा कलावंत  व्यक्तिगत जीवनात, मात्र या मातृभूमीवर चुकून आलेला एकाकी शापित गंधर्व होता. ‘बाजी’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगदरम्यान गीता आणि गुरुदत्त यांची पहिली भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलले आणि १९५३ मध्ये त्या दोघांनी लग्न केले. 

त्या दोघांचे सहजीवन विलक्षण वादळी ठरले, त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वहिदा रहमान, असे सातत्याने म्हटले गेले.  वैवाहिक जीवनातील  अडचणी आणि एकूणच वैफल्यामुळे मदिरेच्या पाशात गुरफटलेल्या गुरुदत्तला मानसिक अस्थैर्याने घेरले. १९६४ मध्ये त्याचा करुण अंत झाला. त्यानंतर ९ वर्षांनी गीता दत्त यांनीही जगाचा निरोप घेतला होता.  वहिदाने  गुरुदत्त संदर्भातील प्रश्नांनाही कायम संयतपणे पण  प्रामाणिक उत्तरं दिली खरी, पण तरीही गुरुदत्त, गीता दत्त आणि वहिदा रहमान हा प्रेमाचा त्रिकोण आणि त्यांच्यातली विफलतेची दंतकथा आजही चर्चिली जाते. हुरहूर लावते.  गुरुदत्त स्वत: आणि त्याने रंगवलेल्या नायक-नायिका  आत्मनाशाच्या अटळ कडेलोटाकडे स्वतःहून चालत गेल्या. या शापित गंधर्वाबद्दल इतकंच म्हणावंसं वाटतं की, हम बने थे तबाह होने को... तेरा इश्क तो एक बहाना था...