शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

...तोपर्यंत कोणीही वाचवू शकणार नाही; मुंबई नावाची हत्तीण आणि आंधळे राजकारणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 1:30 AM

मुंबई राजकारण्यांच्या हातून कधीच निसटली, आता तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले तरच ती वाचू शकेल!

सुलक्षणा महाजनमुंबई महानगरी अवाढव्य हत्तिणीसारखी आहे. साठ वर्षात अनेक राजकीय पक्ष, अनेक नेते सत्तेवर आले आणि गेले. सर्वांनी मुंबईच्या अंगाला हात लावून हत्तिणीचा अंदाज घ्यायचा, गोंजारण्याचा, तिला चालविण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाही तिचे रंगरूप, आकार, स्वभाव समजून घेता आला नाही. दोष हत्तिणीचा नव्हता तर आंधळ्या नेत्यांचा होता आणि आहे. साठ वर्ष झाली तरी राजकारण्यांना प्रगल्भ नागर दृष्टी कमावता आलेली नाही. मुंबईला मिळालेले नेतृत्व निष्प्रभ आहे आणि नेभळटही. त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस अधिकाधिक बिथरत आहे. माहुताच्या हाताबाहेर गेली आहे. गेले सात महिने मुंबई महानगरी कोरोनाच्या मगरमिठीत तडफडते आहे. कसाबसा जीव वाचवून जगते आहे. काल तर तिला जिवंत ठेवणाऱ्या वीज यंत्रणेनेच मोठा झटका दिला. गाडीतले लोक गाडीत, लिफ्टमधले लोक लिफ्टमध्ये अडकून पडले. वीज नाही म्हणजे पाणी नाही, उजेड नाही, पंखे नाहीत आणि थंडगार हवा देणारी यंत्रेही नाहीत. कोरोनाच्या दाढेमधून वाचलेली, हळूहळू पूर्वपदावर येणारी मुंबई पुन्हा कोलमडली.

Mumbai tops co-living index in India says report

मुंबईसारख्या प्रचंड हत्तिणीला काबूत ठेवणे किती अवघड आहे याची अंधुक जाणीव कालच्या प्रकाराने सत्ताधारी मंडळींना कदाचित झाली असेल. मुंबई राजकारण्यांच्या हातातून निसटली आहे. तिला कुशल, नागर विज्ञान जाणणाºया बहुविध तज्ज्ञांच्या ताब्यात दिली, देखरेखीखाली ठेवली तर कदाचित तिची देखभाल होऊन तिला वाचविता येईल. परंतु मुंबईची वाटचाल अमेरिकेतील डेटट्रॉइट शहराच्या मार्गाने आधीच सुरू झाली आहे. कोरोनामुळे तिच्या अधोगतीला वेग आला आहे आणि विजेच्या धक्क्याने तो वेग वाढण्याचीच शक्यता आहे.

मुंबई ही एक महानगरी असली तरी तिच्या अंतर्गत अनेक लहानमोठ्या व्यवस्था आहेत. त्या हळूहळू निर्माण होत होत मुंबईची जडण-घडण झाली. एका मुंबईमध्ये असंख्य नगरे सामावलेली आहेत. ती सर्व एकमेकांशी दृश्य-अदृश्य धाग्यांनी जोडलेली आहेत. त्या सर्वांच्या मधून असंख्य प्रवाह सतत वाहत असतात. पाण्याचे, विजेचे, वाहनांचे, माणसांचे आणि माहितीचेही. यापैकी एक प्रवाह खंडित झाला की इतर सर्व प्रवाह बाधित होतात. महानगरी ठप्प होते. ही महानगरी म्हणजे एक मोठी ईको सिस्टिम आहे. अनेक लहान लहान ईको सिस्टिम्स जोडल्या जाऊन बनलेली एक मोठी नागरी इकोसिस्टिम. मानवनिर्मित परिसंस्था. अशा परिसंस्था वास्तवात हत्तीसारख्या सशक्त असतात. यातील एखादी परिसंस्था झीज होऊन नष्ट झाली तर दुसरी परिसंस्था तिची जागा घेते आणि महानगरी कार्यरत राहते. दीर्घायुषी ठरते. मात्र मुंबईच्या अंतर्गत असलेली ऊर्जा आणि जगण्याची ऊर्मी तरी शाबूत आहे का अशी शंका येते. असेच चालू राहिले तर ही नागरी परिसंस्था फार काळ टिकेल असे वाटत नाही. परिसंस्था न टिकण्याची काही कारणे मला दिसतात. पहिले कारण म्हणजे मुंबईला झालेली इगोची- अहंकाराची बाधा. दुसरे कारण म्हणजे अर्थव्यवस्थेची वाताहत आणि तिसरे कारण म्हणजे मुंबईच्या घटक परिसंस्थांच्या स्वास्थ्याकडे सातत्याने झालेले अक्षम्य दुर्लक्ष.

मराठी माणसाचा अवास्तव अहंकार आज मुंबईच्या अस्तित्वावर उठला आहे. मुंबईमध्ये मराठी नागरिकांची बहुसंख्या नव्हती तरी दादागिरी वाढून सत्ताही मिळाली. पण सत्ता आली तरी शहाणपण आलेले नाही. हक्क मिळाला तरी मराठी माणसांनी मुंबईला कधीच समजून घेतले नाही. मुंबईला असलेले मोक्याचे स्थान निसर्गदत्त होते. सुरक्षित स्थानाचे भांडवल होते म्हणून मुंबईचे बंदर आणि व्यापार वाढला, उद्योग वाढले. अर्थव्यवस्था अनेक दिशांनी वाढली, विविधतापूर्ण झाली. म्हणूनच मुंबई लाखों लोकांना सामावून घेऊ शकली. अनेक देश, वेश, भाषा, आशा सर्वांना सामावून घेत मुंबई बहुसांस्कृतिक झाली. ती मुंबईची खरी शक्ती होती. मुंबईला दिशा देणारे नेतृत्व परकीय असले तरी त्यांनी मुंबईचे संगोपन द्रष्टेपणे केले होते. मुंबईसह स्वतंत्र राज्य मिळाले; पण आधुनिक नागर दृष्टी लुप्त झाली. द्रष्टेपणा हरवला. समाजांचे अहंकार आणि अस्मिता मुंबईपेक्षा मोठ्या झाल्या. हळूहळू मुंबईचे आर्थिक लचके तोडून तिला अशक्त केले गेले. अस्मितांनी आर्थिक व्यवहारांवर दबाव आणावेत आणि वाकवावे ह्या प्रकारांमुळे व्यापार, उद्योग आक्रसले. उद्योग हा मुंबईचा प्राणवायु. उद्योजक त्यांचे निर्माते. मुंबईचे पालक! सामान्य कुवतीच्या अस्मितेच्या राजकारणापुढे तेही हरले. मुंबईवरचा हक्क गमावून बसले.उद्योग आणि सामाजिक स्वास्थ्य हरवलेली मुंबई आज पर्यावरणाच्या संकटाने बेजार झाली आहे. मुंबईतील निसर्गाची, शहरी समाजाची, अर्थव्यवस्थेची इतकी मोठी लचकेतोड गेली साठ वर्ष राजकीय कारणांसाठी केली गेली आहे की आरे वसाहतीमधील वाचवलेल्या एका लहान तुकड्याने ती भरून येणारी नाही. जोपर्यंत मुंबईसारख्या शहरांच्या परिसंस्थांचे मूलभूत ज्ञान-विज्ञान आणि त्यांचे जतन करण्यासाठी लागणारी प्रगल्भ दृष्टी नसेल तोपर्यंत कोणीही मुंबईला वाचवू शकणार नाही!

(लेखिका ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Mumbaiमुंबई