हरीष गुप्तानॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्लीसंसदेच्या आवारात अगदी अल्पकाळ झालेली ती सहज बोलाचाली होती. पण तिला अर्थाचे अनेक पदर नंतर चिकटले. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी बोलत असताना राहुल गांधी एकदम म्हणाले, ‘माझ्या आईने मला खासगी विमानाने प्रवास टाळायला सांगितले आहे.’ हे बोलून राहुल थांबले. वरकरणी हे सहज बोलणे वाटले. पण प्रत्यक्षात एका आईला वाटणाऱ्या काळजीपेक्षाही मोठा अर्थ त्यातून प्रकट झाला, हे मात्र नक्की.
सोनिया गांधी यांनी दिलेला सल्ला हा पुत्रप्रेमापोटी होता. खासगी विमानांचे अपघात फारसे होत नसले तरी राजकारणात या अपघातांनी बरेच आघात केले आहेत. देशभरात गेल्या काही दशकांत अचानक झालेल्या विमान दुर्घटनांनी अनेक राजकीय नेत्यांना प्राण गमवावे लागले. देशाला ते मोठे धक्के होते. सोनिया गांधी यांना दीर्घ राजकीय अनुभव आहे. व्यक्तिगत आयुष्यात त्यांना खूप काही गमवावे लागले आहे; अशा पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मुलाला दिलेला सल्ला हा जीवन आणि राजकारण एकमेकांना कसे छेद देते याची खोल जाण दर्शविणारा आहे.
राहुल यांनी जाता जाता आईने दिलेला सल्ला बोलून दाखवला यातही पुष्कळ अर्थ होता. त्यातून त्यांच्यातला ‘माणूस’ दिसला. एरवी छोटे छोटे हिशेब करून लिहिल्या गेलेल्या संहिता राजकीय नेत्यांच्या बोलण्यातून सातत्याने डोकावत असतात. लोकभावनांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत हे राहुल यांनी यातून दाखवून दिले. सध्या तुमच्या मनात काय आहे याबरोबरच ‘काय दिसते?’ यालाही महत्त्व आले आहे. खासगी विमानप्रवास टाळल्याने तुम्ही मूठभर अभिजनांपासून वेगळे आहात, संयमी आहात हे दिसते. यात कुठलीही नैतिक भूमिका घेणे नाही, टेंभा मिरवणे नाही. आपली आई काय म्हणते तेवढे मुलाने समोर ठेवले.
नेते मोहिमा आखतात, मुद्द्यांचा खल करतात, त्यांची सतत धावपळ चालू असते; पण त्याचवेळी इतिहासात वेळोवेळी दिसून आलेले भय त्यांच्या मनात दडलेले असतेच. त्याबद्दल सहज बोलून जाण्यातून राहुल गांधी यांनी सार्वजनिक जीवनाच्या आत असलेला व्यक्तिगत भाग उघड केला. घरात बोलली गेलेली एखादी गोष्ट संसदेच्या आसमंतात कान देऊन कशी ऐकली जाते, याचा हा एक विलक्षण नमुना! शॉटगन, कीर्ती आणि नबीन
पश्चिम बंगालमधील राजकारणाला अनपेक्षितरीत्या बिहारी रंग चढू लागले असून, भाजप त्याचा आनंद घेताना दिसतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांचा व्यापक दौरा आखून आपली कारकीर्द सुरू करायचे ठरवले. पश्चिम बंगालपासून श्रीगणेशा होणार होता. केवळ बंगाल नव्हे तर त्याची पश्चिम बाजू, बिहार तसेच झारखंडच्या सीमेवरील बरद्वान आणि असनसोलची निवड त्यांनी केली. या टापूत हिंदी काही परकी भाषा नाही. त्यांनी भौगोलिकदृष्ट्या केलेली ही निवड हा योगायोग नव्हता. या जिल्ह्यांमध्ये बिहारी आणि बिगर बंगाली यांची संख्या लक्षणीय आहे. निवडणूक निकालांवर हा भाग आपोआपच निर्णायक परिणाम करीत असतो. शिवाय, या भागात राजकीयदृष्ट्या जागरूक असलेला कायस्थ समाज मोठ्या संख्येने असून, नितीन नबीन कायस्थच आहेत. भाजप कसे हिशेब करतो आहे हे लगेच दिसले. मात्र येथे थोडीशी अडचण लक्षात आली.
या भागात दोन मोठ्या नेताजींचा प्रभाव आहे. असनसोल हा बॉलिवूडमधले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा तथा शॉटगन यांचा, तर बरद्वान कीर्ती आझाद या माजी क्रिकेटपटूच्या प्रभावाखाली असलेला टापू. अजूनही कायस्थ मंडळी सिन्हांचे ऐकतात. त्यामुळे भाजपचा तेथे चंचूप्रवेश थोडा कठीण दिसतो. अर्थात पक्ष त्यामुळे डगमगलेला नाही. नबीन यांच्या माध्यमातून नव्या राजकीय निष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असून, कायस्थ आणि बिहारी मतदारांनी भगव्याच्या पलीकडे पाहू नये, असे सूचित केले जात आहे. ममता बॅनर्जी नबीन यांना ‘उपरा’ म्हणून उडवून लावू शकणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. बंगाली लोकसंख्येच्या एक चतुर्थांश हिंदीभाषक असून, भाजपला आकडे महत्त्वाचे आहेतच!
रामलीला मैदान ते रेडिओ सायलेन्स
मोदी सरकारने संयुक्त लोकशाही आघाडीची ‘मनरेगा’ बासनात गुंडाळून ‘जी रामजी’ योजना आणली तेव्हा काँग्रेसने पक्षाला शक्य होते ते सर्व केले, म्हणजेच बैठका घेतल्या. संसदेत जोरदार निदर्शने झाली. कार्यकारी समितीच्या बैठकीत चर्चा, रामलीला मैदानावर सभा आणि अर्थात ४५ दिवसांच्या मनरेगा बचाव मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी समिती असा कार्यक्रम आखण्यात आला. तीन आठवड्यांनंतर हे आंदोलन कुठे दिसत नाही. रस्त्यावर तर नाहीच नाही.
- याच्या उलट ममता बॅनर्जींचे असते. ईडीच्या नोटिसीवरील शाई वाळत नाही तोच त्या रस्त्यावर उतरलेल्या असतात. आंदोलन कधी करायचे आहे हे ठरवताना काँग्रेसची अवस्था अनेकदा साप गेल्यावर भुई बडवण्यासारखीच असते.
Web Summary : Sonia Gandhi advised Rahul to avoid private planes due to safety concerns. BJP eyes Bihar votes in Bengal via Nitin Nabin. Congress's protests lack Mamata Banerjee's immediacy.
Web Summary : सोनिया गांधी ने सुरक्षा कारणों से राहुल को निजी विमानों से बचने की सलाह दी। बीजेपी की नजरें बंगाल में बिहार के वोटों पर हैं। कांग्रेस के विरोध प्रदर्शनों में ममता बनर्जी की तत्परता की कमी है।