कलाकृतीचे मर्म
By Admin | Updated: October 22, 2016 04:18 IST2016-10-22T04:18:26+5:302016-10-22T04:18:26+5:30
एखाद्या कवितेच्या वरवरच्या शब्दात लपलेला सुप्त अर्थ वाचकांना जाणवतो तेव्हा कवीला आडवळणाने तेच सुचवायचे असते की अभ्यासकाचे ते अनुमान असते? या संदर्भात

कलाकृतीचे मर्म
- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे
एखाद्या कवितेच्या वरवरच्या शब्दात लपलेला सुप्त अर्थ वाचकांना जाणवतो तेव्हा कवीला आडवळणाने तेच सुचवायचे असते की अभ्यासकाचे ते अनुमान असते? या संदर्भात बी कवींची चाफा, गोविंदाग्रजांची ‘प्रेम आणि मरण’ आणि मर्ढेकरांच्या कितीतरी कविता आठवतात. अपर्णा चितळेंची ‘व्यक्त-अव्यक्त’ संग्रहातील ‘आॅर्किड’ ही केवळ १८ ओळींची कविता आत्मनिवेदनात्मक आहे. काही माणसे वडासारखी भक्कमपणे रुजणारी, दुसऱ्यांना आधार व सावली देणारी, तर काही विपरीत परिस्थितीच्या महापुरात, वादळात, झुकून नंतर पुन्हा ताठ होणाऱ्या लव्हाळ्यासारखी लवचिक असतात. बरड जमिनीत चिवटपणे जगताना काटेरी विषारीपण घेऊन आलेल्या निवडुंगासारखी काही माणसे असतात. दुसऱ्यांच्या स्पर्शानेच नव्हे तर चाहुलीने स्वत:ला मिटून घेणाऱ्या लाजाळूच्या रोपासारखी काही माणसे अबोल, मिटलेली असतात, असे कवितेच्या पहिल्या चार ओळी सांगतात.
यानंतर कवयित्री ठामपणे सांगते की, काही माणसे मात्र आॅर्किडसारखी असतात. स्वयंभू, कोणाचा फार आधार न घेता जगणारे, फुलणारे हे रोप कवयित्रीचे प्रतीक म्हणून जाणवते. आॅर्किड हे बांडगूळ (पॅरासाईट) नाही. ते पराजीवी नाही. आंबा, वड अशा मोठ्या झाडावर वाढणारे, केवळ दोन-तीन वीत उंचीचे हे लीलीसारखे रोप एपिफाईट प्लांट आहे असे कवयित्रीकडून आणि मैत्रिण प्रा. डॉ. प्रतिभा सहस्रबुद्धे यांचेकडून कळले.
भूमाता रुजू देत नाही म्हणून बापवृक्षांच्या फांद्यांआधारेच ते रुजते. डोक्यावर घनदाट वृक्ष असल्याने मोकळा सूर्यप्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. हवेतील आर्द्रता शोषून घेत ते जीवनरस मिळवते आणि योग्य काळ येताच चहूअंगाने विकसित होत जाते, बहरते. हा या कवितेच्या नंतरच्या सहा ओळींचा अर्थ. यात लपलेला अर्थ बघितला तर कवितेमागे लपलेले कवयित्रीचे घडणे लक्षात येते. अत्यंत लहान वयात शिक्षण पूर्ण करून बायॉलॉजीची उत्तम शिक्षिका आणि प्रभावी मुख्याध्यापिका ही पदे कवयित्रीने समर्थपणे सांभाळली. शालेय व महाविद्यालयीन जीवनात खो-खो ची चतुरस्त्र खेळाडू, २६ जानेवारीच्या दिल्लीच्या परेडसाठी एनसीसीत निवड झालेली आणि बेस्ट शूटर ठरलेली अपर्णा चितळे, एक स्वयंभू आॅर्किड!
लेखकाच्या साहित्यकृतीचे आणि जीवनाचे असे अभिन्न नाते असते. कवितेतून जीवन आणि जीवनातून कला कशी उलगडत जाते त्याचे हे बोलके उदाहरण आहे. रे.ना.वा. टिळकांच्या एका कवितेत ओसाड आडातले एक आत्ममग्न फूल पाण्यातल्या स्वत:च्याच प्रतिबिंबावर बेहद्द लुब्ध असते. टी.व्ही.वरील जाहिरातीत स्वकर्तृत्वावर फिदा घार किंचित स्मित करते, सुंदर सुतारपक्षी स्वत:च कोरलेल्या घरट्यावर फिदा होऊन हसतो, पाण्यातले कासवही ओठ विलग करून हसते तशी ही कवयित्री स्वत:च्या आर्किडच्या प्रतिमेवर बेहद्द खूश दिसते.