Around the world : Hot water filled 'Hand of God'! | जगभर : गरम पाणी भरलेला ‘हॅण्ड ऑफ गॉड’!

जगभर : गरम पाणी भरलेला ‘हॅण्ड ऑफ गॉड’!

कोरोनाने अख्ख्या जगाला त्राही भगवान करून सोडलं आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही, तोच आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे आणि ती पहिल्यापेक्षा भयानक आहे. जगभरात लाखो नवीन रुग्ण सापडत आहेत अन‌् अनेक मृ्त्युमुखीही पडत आहेत. कोरोनाची लस येऊनही जगभर काेरोनाचा प्रसार होतोच आहे. 
सर्वसामान्य माणसं तर त्यामुळे अतिशय हवालदिल झाली आहेत. कोरोनामुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचा निरोप द्यावा लागला, अनेकांना आयसोलेशनमध्ये एकाकी ठेवावं लागलं. हे एकाकीपणाचं जिणंच अनेकांना असह्य झालं. एक वेळ कोरोेना परवडला, मरणही परवडलं, पण आपल्या प्रियजनांपासून दूर लोटणारा तो असह्य एकाकीपणा मात्र नको, असं अनेक रुग्ण बोलून दाखवतात. कोरोनानं रुग्णांच्या केवळ शरीरावरच नाही, तर मनावरही परिणाम केला. त्यांच्यातला सामाजिक दुरावा वाढवला. जगभरात तर अशा लाखो लोकांची संख्या वाढली, ज्यांना कोरोना झालेला नाही, पण मानसिकदृष्ट्या ते सैरभैर झाले आहेत. अर्थातच, कोरोनाच्या काळात डॉक्टर्स, नर्स आणि फ्रंट वर्कर्सनी आपल्या प्राणांची बाजी लावली, रुग्णांना कोरोनातून वाचविण्याचा प्रयत्न करताना, काही वेळा ते स्वत:च त्याच्या कचाट्यात सापडले आणि त्यांना आपला जीवही गमवावा लागला, पण तरीही अनेकांनी आपली हिंमत आणि कर्तव्य सोडलेलं नाही. ते स्वत: हेलावले असले, तरी रुग्णांसाठी आपल्याला जे-जे करता येणं शक्य आहे, ते ते करत आहेत. स्पर्शाला पारखे झालेल्या या रुग्णांना मानवी स्पर्शाची अनुभूती देण्यासाठी झगडत आहेत, नवनव्या युक्त्या काढत आहेत.
ब्राझीलमधल्या एका नर्सने आपल्या  रुग्णाला आपलेपणाचा स्पर्श मिळावा, आपण आपल्याच माणसांत आहोत, असं किमान वाटावं, यासाठी एक अनोखा प्रयोग केला. दोन ग्लव्हजमध्ये गरम पाणी भरून या कृत्रिम, उबदार हातांत त्या रुग्णाचा हात ठेवला, जेणेकरून त्याचा एकटेपणा दूर व्हावा, आपल्याला प्रिय असणारी व्यक्ती आपल्याजवळ आहे, या अनुभूतीनं रुग्णाला दिलासा मिळावा... अल्पावधीतच हा फोटो व्हायरल झाला आणि जगभर लाखो लोकांनी पाहिला. त्याला हजारो लाइक्स, कमेन्ट‌्स मिळाल्या, त्या नर्सच्या आपुलकीच्या या कृत्याचं जगभरात मोठं कौतुकही झालं.  
गल्फ न्यूजचे एक पत्रकार सादिक समीर भट्ट यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘हँड ऑफ गॉड’! - देवाचा हात! कोणीही माणूस जवळ नसताना, खरंच त्या रुग्णासाठी हा हात म्हणजे देवाचाच हात होता, ज्यामुळे त्याला दिलासा मिळाला. हॉस्पिटलच्या एका नर्सनं ही युक्ती शोधून काढली. तिच्यासारख्या फ्रंट वर्कर्सना माझा मनापासून सलाम असंही त्यानं लिहिलं. 
कोण आहे ही नर्स आणि कुठला आहे हा फोटो?
हा फोटो आहे साओ पाऊलो येथील एका रुग्णालयातील इमर्जन्सी केअर युनिटमधला. कोरोना रुग्णाची पीडा, वेदना कमी व्हावी, त्याला आपलेपणाची जाणीव व्हावी, यासाठी या हॉस्पिटलची एक टेक्निशिअन नर्स सेमेइ अरुजो हिनं हे ‘हँड‌्स ऑफ गॉड’ बनविले.
आपली माणसं आपल्यापासून दूर गेलेली असताना, मरणाच्या दारात असताना कोणीतरी आपल्याजवळ असावं, आपल्या माणसाचा हात आपल्या हातात असावा, तो आपल्या शेजारी असावा, असं प्रत्येक रुग्णाला वाटतं. त्या प्रिय व्यक्तीच्या सहवासानं त्याचा आजार बरा होत नाही, पण त्याच्या जगण्याला उभारी मिळते, मानसिक धीर येतो, बळ मिळतं. आपल्याजवळ, आपल्यासाठी कोणीतरी आहे, या जाणिवेनं बरं वाटतं. अनेक रुग्ण त्यातूनच भरारी घेतात, त्यांची जगण्याची जिद्द वाढते. हातात घेतलेल्या त्या हातांचं महत्त्व म्हणूनच खूप मोठं. ज्यांना असे आपुलकीचे हात मिळत नाहीत, ते त्या असह्य एकाकीपणानं आधी मनानं आणि नंतर शरीरानंही कोलमडतात. इच्छा असूनही कोरोनाच्या काळात आपल्या माणसांच्या जवळ जाता येत नाही आणि त्यांच्या दु:खात सहभागी होता येत नाही, याचाही मोठा खेद प्रियजनांना असतोच. त्यासाठीच संक्रमणाचा धोका कमी करणारा हा उपाय मी करून पाहिला, असं नर्स सेमेई अरुजो म्हणते.

मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’! 
खरे तर ‘हँड ऑफ गॉड’ ही उपाधी अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू मॅरोडोना याची. त्याची कहाणीही तशीच रंजक आहे. १९८६च्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको येथे २२ जून, १९८६ रोजी अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात सामना सुरू होता. आपल्याजवळ आलेला फुटबॉल हेडरनं गोलपोस्टमध्ये टाकण्यासाठी मॅराडोनानं उडी मारली, पण डोक्याऐवजी तो बॉल हाताला लागून गोलजाळ्यात गेला आणि अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळाली. पंचांच्या हे लक्षात आलं नाही. त्यावेळी आधुनिक टक्नॉलॉजीही नव्हती, ज्यानं पंचांचा निर्णय फिरवता यावा. या गोलमुळे अर्जेंटिनानं केवळ सामनाच नाही, तर नंतर वर्ल्ड कपही जिंकला. ‘देवाच्या’ कृपेनं झालेल्या या गोलमुळे हा जगप्रसिद्ध ‘हँड ऑफ गॉड’!

Web Title: Around the world : Hot water filled 'Hand of God'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.