लष्करी कारवाई:ब्रह्मदेश व पाकिस्तान
By Admin | Updated: June 12, 2015 23:42 IST2015-06-12T23:42:31+5:302015-06-12T23:42:31+5:30
भारताच्या जवळपास सगळ्याच सीमांवर सशस्त्र अतिरेकी कारवायांचा धुमाकूळ सातत्याने चालू असतो. पण भारतीय फौजा सशस्त्र अतिरेक्यांना नष्ट करण्यासाठी शेजारच्या

लष्करी कारवाई:ब्रह्मदेश व पाकिस्तान
प्रा.दिलीप फडके
(ज्येष्ठ विश्लेषक) -
भारताच्या जवळपास सगळ्याच सीमांवर सशस्त्र अतिरेकी कारवायांचा धुमाकूळ सातत्याने चालू असतो. पण भारतीय फौजा सशस्त्र अतिरेक्यांना नष्ट करण्यासाठी शेजारच्या राष्ट्राच्या हद्दीत घुसून कारवाई करताना फारशी कधी पाहायला मिळत नाही. म्हणूनच म्यानमारमधल्या लष्करी कारवाईचे विशेष महत्व आहे. जगात आजवर अशा प्रकारची कारवाई अमेरिका-रशिया यासारखे बलाढ्य देश सोडले तर इस्त्रायल सारख्या कायम युद्धमान असलेल्या देशाने यशस्वीपणाने केलेली आहे. भारतासारख्या देशाने अशी कारवाई केल्यामुळे देशाच्या राजकीय नेतृत्वात झालेल्या बदलामुळे भारताच्या धोरणांमध्ये झालेला बदल अधोरेखित झाला आहे हे नक्की. याची इतरत्र कोणती प्रतिक्रिया उमटली आहे हे पाहणे उद्बोधक ठरावे.
‘बीबीसी’ने या कारवाईबद्दलचे सुबीर भौमिक या आपल्या प्रतिनिधीचे वार्तापत्र देताना दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दलच्या भारताच्या धोरणात बदल झालेला दिसतो आहे, असे म्हणून या कृतीला असामान्य सहेतुक साहसाचे प्रदर्शन (अनयुज्युअल डिस्प्ले आॅफ अॅग्रेसिव्ह इन्टेन्ट) असे म्हटले आहे. आजवर कधीही न दाखवलेली आक्रमकता यावेळी भारताने दाखवेली आहे याची दखल घेत भौमिक पुढे लिहितात की, आजवर अनेकदा भारताने म्यानमारच्या भूमीवरून होत असलेल्या दहशतवादी कारवाया रोखण्याची विनंती तिथल्या राज्यकर्त्यांना केली होती. पण त्याचा फारसा उपयोग झाला नव्हता. मागच्या गुरुवारी मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ठोस कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. भूतान आणि बांगलादेशाने आपल्या हद्दीत चालविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या, पण म्यानमारचा आजवरचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. नागालँड, मणीपूर आणि अरुणाचलाच्या म्यानमारला लागून असलेल्या सीमांच्या जवळच्या कचीन, कोकांग आणि करेन या भागातल्या दहशतवादी अतिरेक्यांना मोडून काढण्यासाठी यावेळी अतिशय कडक धोरण आखण्यात आले.
बांगला देशाचेही म्यानमारशी अनेक विषयांवर मतभेद आहेत. एका बाजूने मोदींच्या बांगला देश दौऱ्याची आणि त्यात झालेले करार बांगला देशासाठी कितपत फायद्याचे आहेत यावर चर्चा करीत असतानाच भारत-म्यानमार सीमेवरच्या आणि बांगला देशासाठी महत्वाच्या ठरू शकणाऱ्या या लष्करी कारवाईची तिथल्या माध्यमांनी फारशी ठळक दखल घेतलेली दिसत नाही. तिथल्या ‘इंडिपेंडंट’ या इंग्रजी वृत्तपत्राने भारतीय वृत्तसंस्थांनी दिलेले वृत्त बऱ्याच आतल्या पानावर छापले आहे. भारताच्या शेजारच्या श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांनी देखील या बातमीकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही.
अपेक्षेप्रमाणे पाकिस्तानी माध्यमांमध्ये या विषयाची बरीच उलटसुलट चर्चा वाचायला मिळते. म्यानमारमधल्या भारताच्या कारवाईची दखल घेताना पाकिस्तानने त्या घटनेची सांगड मोदींच्या बांगलादेश भेटीशी आणि त्यातल्या वक्तव्यांशी घातली आहे. या दोन्ही घटना एकामागोमाग घडल्यामुळे पाकिस्तानी शासक आणि तिथली माध्यमे बरीच अस्वस्थ झाल्याचे जाणवते. भारताच्या साहसवादाचा (जिंगोईस्टीक ऱ्हेटॉरिक) निषेध या शीर्षकाखालील ‘डॉन’मधल्या पहिल्या पानावरच्या लेखात इफ्तिकारखान यांनी या विषयावर बरेच सविस्तर लिहिले आहे. १९७१ साली बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात भारताने केलेल्या कामगिरीचा मोदींनी आपल्या त्या देशातील दौऱ्यातल्या भाषणात उल्लेख केला होता. तो पाकला विलक्षण झोंबलेला दिसतोे. भारत शेजारच्या देशांना अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत असतो, असा निष्कर्ष काढून, पाकिस्तान म्हणजे म्यानमार नाही, आम्हाला हात लावाल तर याद राखा, हा पाकिस्तानी मंत्र्यांनी दिलेला इशाराही डॉनने सविस्तर छापला आहे. याच अंकात ‘म्युच्युअली डिस्ट्रक्टीव्ह ऱ्हेटॉरिक’ या शीर्षकाखाली आय.ए.रेहमान यांनी लिहिलेला लेख वाचण्यासारखा आहे. भारताच्या उक्ती आणि कृतीकडे पाकिस्तानच्या नेतृत्वाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे याची चर्चा त्यांनी केली आहे. या दोन्ही देशांमधला तणाव कुणाच्याच हिताचा नाही असे सांगताना पाकिस्तानी नेतृत्वाने १९७१ च्या चुका पुन्हा करू नयेत असा सल्लाही ते देत आहेत. भारताच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीने अस्वस्थ होऊन जाण्याचे कारण नाही, असे सांगतानाच पाकिस्तानला एकटे पाडण्याचे भारताचे उद्दिष्ट सफल होऊ देता कामा नये असेही ते बजावतात. पाकिस्तानमध्ये ‘रॉ’ सक्रीय असल्याचा उल्लेख करून ते लिहितात की, भारत आणि पाकिस्तान दोघेही एकमेकाच्या विरोधात कारवाया करीत असतात, हे नाकारता येणार नाही. बलुचिस्तानमधल्या हिंसाचाराचा उल्लेख करून त्यांनी जे लिहिले आहे ते महत्वाचे आहे. ते म्हणतात की, या हिंसाचाराची सगळी जबाबदारी ‘रॉ’वर टाकणे आणि खरा मुस्लीम कधीच दुसऱ्या मुस्लिमाच्या विरोधात हिंसाचार करणार नाही, असे मानणे म्हणजे स्वत:ची फसवणूक केल्यासारखे होईल. पाकिस्तानच्या नेतृत्वाने स्थानिक लोकांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या वा अपेक्षांकडे दुर्लक्ष करण्याची चूक पुन्हा करता कामा नये. डॉननेच ‘इंडियन बेलिगरन्स अगेन’ या अग्रलेखातून मोदींच्या धोरणांचा समाचार घेतला आहे.
अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘न्यूयॉर्क टाईम्स’ यासारख्या वृत्तपत्रांनी भारताच्या या कृतीची नोंद घेऊन संक्षिप्त बातम्या दिल्या असल्या तरी त्यावर फारसे भाष्य मात्र केल्याचे पाहायला मिळत नाही. याउलट पश्चिमेच्या माध्यमांमध्ये म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या आन संग सू की यांच्या सध्या सुरु असलेल्या चीन दौऱ्याची विशेषत्वाने दखल घेतलेली पाहायला मिळते. म्यानमारच्या संदर्भात चीनचे महत्व लक्षात घेतले तर हा दौरा निश्चितच महत्वाचा आहे. त्यामुळे त्याची चर्चा इतर माध्यमांमध्ये अधिक आहे, हे लक्षणीय होय.
दरम्यान आपल्या देशात भारतीय लष्करी कारवाई झालेलीच नाही असे म्यानमारच्या सरकारचे म्हणणे आहे व त्यालाही माध्यमांनी प्रसिद्धी दिली आहे. केवळ ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ मधल्या आपल्या वार्तापत्रात निहारिका मंधना यांनी म्यानमारचे राष्ट्रपती थेईन सेईन यांच्या कार्यालयातले संचालक झॉ हताय यांचा हवाला देत बुधवारी भारतीय सेना त्यांच्या देशात आली होती आणि त्यांनी म्यानमारच्या सहकार्य आणि समन्वय यांच्या सहाय्याने कारवाई केल्याचे मान्य केल्याचे म्हटले आहे. या कारवाईत म्यानमारच्या सैन्याने प्रत्यक्ष भाग घेतला नाही, असे सांगतच आपल्या देशाच्या भूमीवरून दुसऱ्या शेजारी देशांच्या विरोधातल्या दहशतवादी कारवाया म्यानमार कधीच खपवून घेणार नाही असे देखील सांगितल्याचे दिसते.