शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दृष्टिकोन: बीज अंकुरे अंकुरे...ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने वृक्षारोपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 04:18 IST

डॉ. दीपक शिकारपूर पृथ्वीवरचे हवामान वेगाने बदलते आहे आणि यामागील सर्वात ठळक कारण म्हणजे मानवाकडून होत असणारी पर्यावरणाची हानी ...

डॉ. दीपक शिकारपूरपृथ्वीवरचे हवामान वेगाने बदलते आहे आणि यामागील सर्वात ठळक कारण म्हणजे मानवाकडून होत असणारी पर्यावरणाची हानी हेच आहे. वाढते शहरीकरण म्हणजेच कॉँक्रिटीकरण, वाहनांची वाढती संख्या, चंगळवादी जीवनशैली असे इतरही घटक या ऱ्हासाला कारणीभूत आहेत. तरीदेखील या कारणांना पुरून उरणारा एक उपाय अजूनही आपल्या हातात आहे तो म्हणजे झाडांची संख्या वाढवणे म्हणजे अधिक वृक्षारोपण!

विविध संस्था आणि व्यक्तींद्वारे झाडे लावण्याची मोहीमदेखील जगभर चालवली जात असतेच. गेल्या दोन-तीन दशकांत मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या संगणकीय नवतंत्रज्ञानाचा स्पर्श वृक्षारोपणालाही झाला आहे. परिणामी झाडे लावणे आणि मुख्य म्हणजे ती जगतील हे पाहणे तसेच वृक्षांना हानिकारक असलेल्या कीड, वणवे यांसारख्या बाबींवरही नजर ठेवणे आता एका आधुनिक शोधामुळे अधिक सोपे होत आहे.

यशस्वी वृक्षारोपणाशी फक्त जमिनीत खड्डा करण्यापलीकडच्या बऱ्याच बाबींचा संबंध असतो. जमिनीचा दर्जा, स्थानिक हवामान, पेरलेल्या बीला किंवा नंतर तयार झालेल्या कोवळ्या रोपट्याला कीड लागण्याची शक्यता. यांसारखे ठळक आणि इतर काही छोटे परंतु महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन योग्यप्रकारे रोपण करण्याचे काम ड्रोनमधील संगणक विलक्षण कार्यक्षमतेने करतो. त्याच्या मदतीला डीप लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि सॅटेलाइट इमेजिंग यादेखील सोयी असल्याने बी अंकुरण्याची आणि रोप जगण्याची शक्यता खूपच वाढते. शिवाय भलत्या जागी वा बीला प्रतिकूल असलेल्या स्थितीमध्ये ती अंकुरण्याची शक्यता तशीही कमीच असते.

या नवतंत्रज्ञानामुळे बियांची नासाडी खूपच कमी होते आणि वनीकरण निव्वळ टीव्हीवर दिसण्यापुरते मर्यादित राहत नाही. हे तंत्र इतके पुढे गेले आहे की एखाद्या ठिकाणी जुन्या मेलेल्या (किंवा कोणीतरी मारलेल्या) झाडाचे थोडेसे खोड किंवा मुळे शिल्लक असतील तर ड्रोन तो ‘स्पॉट’ हेरून ही नवी बी त्याजवळ लावते कारण त्यामुळे नव्या कोंबाला सावली, दमटपणा आणि जुन्या मुळांचा आधारही मिळतो.यासाठीची ड्रोन विशेष पद्धतीने बनवून घेतलेली असतात. बी असलेल्या अनेक कुप्या (सीड कॅप्सूल्स) त्यांच्या ‘लगेज कंपार्टमेंट’मध्ये भरलेल्या असतात. योग्य वेळी, योग्य उंचीवरून, योग्य त्या ठिकाणीच एका वेळी एक कुपी ‘फायर’ केली जाते. तिचा बाह्य आकार आणि ती ड्रोनमधून फायर उर्फ इजेक्ट होण्याचा वेग योग्यप्रकारे निश्चित होत असल्याने ती जमिनीत काही इंच खोल घुसते. एका वेळी एकच कुपी बाहेर पडत असली तरी पुढची कुपी कोठे टाकायची हे ड्रोनला अगोदरच माहीत असल्याने रोपणाचा एकंदर वेग खूपच राहतो. ही कुपी जैवविघटनयोग्य (बायोडीग्रेडेबल) मटेरिअलची असल्याने ते लगेचच विरघळून बीचा मातीशी संपर्क होतो (आपण औषधाची कॅप्सूल घेतो त्याप्रमाणेच). कुपीमध्येच खतही भरलेले असल्याने बी रुजण्यास आणि तिला योग्य पोषण मिळण्यास मदत होते.

अशी ड्रोन्सची फौज दिवसाला १ लाख बिया लावू शकते! संयुक्त राष्ट्रसंघ (यूनो) तसेच इतरही काही उद्योग व सेवाभावी संस्थांनी ड्रोनद्वारे बीजारोपणाची ही संकल्पना उचलून धरली असल्याने आता तिला जगभर प्रायोजकही मिळू लागले आहेत. ऑस्ट्रेलियामधील विरळ वृक्षराजीच्या प्रदेशांपासून अगदी म्यानमारमधील घनदाट विषुववृत्तीय जंगलांपर्यंत (कारण तिथलीही हिरवी चादर वृक्षतोडीमुळे फाटू लागली आहे) सर्वत्र हा उपक्रम राबवला जाऊ लागला आहे. यूकेमधील बायोकार्बन इंजिनीअरिंग, अमेरिकेतील ड्रोनसीड यांसारख्या कंपन्या सतत परीक्षण, निरीक्षण आणि संशोधन करून ड्रोनच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवीत आहेत. इतरही बºयाच संस्था कमीअधिक प्रमाणात यात आहेत. आपल्या देशातही हा प्रयोग करायला बराच वाव आहे.

जगभरात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. ज्या वेगाने झाडे तोडली जातात त्याच वेगाने झाडे लावली जातात का, हा प्रश्न फारच गंभीर आहे. या प्रश्नाच्या उत्तरातच पृथ्वीचे भवितव्य दडले आहे. ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जीवघेणी आहे. त्यावर उपाय काय आणि ते प्रत्यक्षात कितपत उतरतील याबाबतही साशंकताच आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाची साथ घेत अतिशय योजनाबद्ध रीतीने वृक्षलागवड करता आली तर कुठे तरी मार्ग सापडू शकेल. भौगोलिकदृष्ट्या अतिशय बिकट आणि दुर्गम जागी वृक्षलागवड करण्यासाठी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतली तर दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे.

(लेखक संगणक साक्षरता प्रसारक आहेत) 

टॅग्स :environmentवातावरण