भयग्रस्त रांग

By Admin | Updated: November 15, 2016 01:34 IST2016-11-15T01:34:33+5:302016-11-15T01:34:33+5:30

नागपुरातील भाजपा कार्यकर्त्यांचा सेवाभाव जाणवण्याइतपत मोठा असतो. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही ते धावून जातात.

Anxious queue | भयग्रस्त रांग

भयग्रस्त रांग

नागपुरातील भाजपा कार्यकर्त्यांचा सेवाभाव जाणवण्याइतपत मोठा असतो. नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठीही ते धावून जातात. कत्तलखान्याकडे जात असलेल्या गाई पकडण्यापासून तर गंगाजल वाटण्याच्या कामात स्वत:ला झोकून देतात. धार्मिक उत्सव आले, आपत्ती आली की हे कार्यकर्ते, स्वयंसेवक धावून येणारच! ही गोष्ट आता साऱ्यांनाच अंगवळणी पडली आहे.
आठवडाभरापासून आपल्या हक्काच्या कमाईचे पैेसे मिळविण्यासाठी बँक, एटीएम समोर रांगेत दिवसभर ताटकळत, त्रस्त झालेल्या माणसांच्या नजरा या कनवाळू, श्रद्धाळू सेवाभावी कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना सध्या सतत शोधत आहेत. ही राष्ट्राभिमानी मंडळी हातात पाण्याची बाटली, नाश्ता, फळे घेऊन येतील, रांगेतील आईच्या कडेवर असलेल्या बाळाला घेऊन त्याचे रडणे थांबवतील, भोवळ आलेल्या वृद्धाला उचलून पाणी पाजतील, डॉक्टरकडे घेऊन जातील ही त्यांची आशा भाबडी ठरली आहे. एरवी हे कार्यकर्ते मोदी सरकारच्या निर्णयांचे मार्केटिंग करण्यासाठी, लोकांच्या गळी उतरविण्यासाठी जीवाचे रान करीत असतात. स्वच्छ भारत अभियानावेळी ते झाडू घेऊन रस्त्यावर उतरतात, जनधन योजनेत गरिबांचे हात धरून बँकेत घेऊन जातात. सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करुन फटाकेही फोडतात. हे सर्व उत्सवी भक्त आता कुठे गायब झालेत, असाच प्रश्न पाचशे-हजार रुपयांच्या नोटांमुळे हवालदिल झालेले नागरिक एकमेकांना विचारीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे, हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला त्या रात्री सारा देश आनंदित झाला. आता काळा पैसा बाहेर येईल, देशात रामराज्य अवतरेल असा धुंद माहौल एका क्षणात नमोभक्तांनी निर्माण केला. पण, हा आनंद क्षणिक ठरला. रोजच्या जगण्याशी संघर्ष करणाऱ्या, महिनाभराच्या निश्चित मिळकतीत कुटुंबाचा भार वाहणाऱ्या मध्यमवर्गीयांना दुसऱ्या दिवशी चटके बसू लागले. हेच मोदी पूर्वी ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, असे सांगून रान उठवायचे त्यापैकी कुणीही धनाढ्य उद्योगपती-व्यापारी, राजकारणी, शासकीय अधिकारी पाचशे, हजारच्या नोटा बदलविण्यासाठी रांगेत दिसत नसल्याचे पाहून हा सामान्य माणूस खाडकन भानावर आला. परिश्रमाने कमवलेल्या आणि काटकसर करुन साठवलेल्या आपल्याच पैशावर झडप मारण्याचा हा डाव तर नाही ना, अशी शंका अशा वेळी त्याच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर ती चुकीची कशी ठरवता येईल? हा सामान्य माणूस आयुष्यभर रांगेतच असतो. ती रांग कधी मुलाच्या शाळा प्रवेशाची असते, कधी केरोसीनसाठी तर कधी मतदानासाठी... या रांगेत उभा असताना तो व्यवस्थेला दोष देत आपले कर्तव्य निमूटपणे बजावतही असतो. पण, आठवडाभरापासून अजूनही रस्त्यावर असलेली ही रांग भयग्रस्त व संतप्त आहे. आपल्याच हक्काचे पैसे मिळवण्यासाठी भांडावे लागते व सरकार आपल्याला चोरासारखे वागवते ही त्यांच्या मनातील वेदना आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी प्रामाणिकपणे कमवलेला पैसा मोदींच्या व्याख्येत काळा ठरला आहे. काळ्या पैशाच्या बळावर जे गर्भश्रीमंत झालेत ते मात्र मोकाट, मजेत आहेत. ज्या हेतूने मोदींनी ही ‘नोटबाजी’ केली तो हेतू खरोखरंच साध्य झाला का? श्रीमंतांच्या बंगल्यातील काळा पैसा बाहेर आला का? जुने लुटारु कंगाल होऊन नवे लुटारु आता जन्मास येतील आणि या नव्या दोन हजारी मनसबदारीमुळे ते गब्बर तर होणार नाहीत ना? असे अनेक प्रश्न या सामान्य माणसाला त्रस्त करीत आहेत. मोदींच्या या उपद्व्यापामुळे प्रामाणिक मार्गाने, परिश्रमाने पैसा कमावण्याची प्रेरणाच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्या समाजात अशा पे्ररणा जिवंत असतात तिथे नवे रोजगार, उद्योग निर्माण होत असतात. जिथे त्या मृतप्राय होतात त्या समाजात नवे अदानी-अंबानी जन्मास येतात. हे सरकार गरिबांचे नाही, अच्छे दिनचे वचन देणारा ५६ इंच छातीचा हा माणूस उद्योपतींच्या पाठीवर हात ठेवतो मात्र शेतकऱ्याला कधी कवटाळून घेत नाही, कष्टकरी मजुरासोबत तो ‘सेल्फी’ही घेत नाही... या रांगेला भंडावून सोडणाऱ्या अनंत प्रश्नांचे हे अस्वस्थ वर्तमान आहे. ते जसजसे वाढत जातील तशी ती रांग पसरट होत जाईल, थेट पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत...
- गजानन जानभोर

Web Title: Anxious queue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.