हा का हद्दीचा प्रश्न
By Admin | Updated: November 8, 2015 23:29 IST2015-11-08T23:29:45+5:302015-11-08T23:29:45+5:30
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि देशनिष्ठा याबाबत कोणाच्याही मनात जरासाही किंतु नसल्याने आणि वारंवार उचलली जीभ

हा का हद्दीचा प्रश्न
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची सचोटी, प्रामाणिकपणा आणि देशनिष्ठा याबाबत कोणाच्याही मनात जरासाही किंतु नसल्याने आणि वारंवार उचलली जीभ हा त्यांचा पिंडदेखील नसल्याने, जेव्हा केव्हा त्यांना व्यक्त व्हावेसे वाटते तेव्हां त्यांचे ते व्यक्त होणे गांभीर्याने घेणे ही साऱ्यांची आणि विशेषत: देशातील विद्यमान सत्ताधीश आणि त्यांच्या निकटवर्तीयांची जबाबदारीच ठरते. स्वाभाविकच जेव्हा डॉ.सिंग असे विधान करतात की आज देशामध्ये विचारस्वातंत्र्याचा संकोच करण्याचे जे सत्र सुरु झाले आहे, ते देशाच्या आर्थिक प्रगतीलाही मारक ठरु शकते, तेव्हां त्यांचे मत गांभीर्याने घेणे सरकारचे कर्तव्यच ठरते. डॉ.सिंग यांनी आता जे विचार व्यक्त केला, तसाच विचार रिझर्व्ह बँकेचे विद्यामान गव्हर्नर डॉ.रघुराम राजन यांनीदेखील एकदा नव्हे दोनदा बोलून दाखविला आणि राष्ट्रपतींनी तर तीन वेळा त्यांच्या मनातील खंतावलेपणाचा उच्चार केला आहे. विचारवंतावर हल्ले म्हणजे मतांशी असहमती व्यक्त करण्याचाच प्रकार असल्याचे जे डॉ.सिंंग म्हणाले आहेत त्याची तंतोतंत प्रचिती भाजपाने लगेचच आणूनही दिली आहे. त्या पक्षाचे चिटणीस श्रीकांत शर्मा यांनी माजी पंतप्रधानांच्या वक्तव्याचे लगेचच खंडण केले आहे. लोकशाहीचे मर्म उलगडवून सांगणाऱ्या ज्या अनेक व्याख्या सांगितल्या जातात त्यातील एक व्याख्या असे म्हणते की, ‘तुझे आणि माझे अनेक विषयांवर कमालीचे मतभेद असले तरी मत व्यक्त करण्याचा तुझा अधिकार अबाधित राहावा यासाठी मी कोणत्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे’! श्रीकांत शर्मा वा त्यांचा पक्ष याला कदापि तयार होणार नाही हे सांप्रतच्या स्थितीवरुन कोणीही सांगू शकेल. पण त्यांनी आपल्या खुलाशात पुढे आणखी एक विचित्र प्रकार केला आहे. ते म्हणतात, विचारांवरील हिंसक हल्ल्यांच्या ज्या घटनांचा उल्लेख डॉ.सिंग करतात त्या घटना भाजपाशासित नव्हे तर काँग्रेसशासित राज्यांमध्ये घडल्या आहेत. पोलीस ठाण्यांमधील हद्दीचा वाद सारेच जाणून असतात पण हा काय हद्दीचा वाद आहे? आणि त्याही पलीकडे जाऊन विचार करायचा तर हल्ले भले काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले असतील पण असे हल्ले करणारे वा करवून घेणारे कोण आहेत? सरकार चालविणे म्हणजे केवळ राजपाट सांभाळणे नसते तर जे जे म्हणून अंगावर येईल ते झेलणे आणि पुढची पावले विचारपूर्वक टाकणे असेही असते. श्रीकांत शर्मा यांच्यासारख्या ब किंवा क श्रेणीच्या खेळाडूला समोर करुन सरकार आपला बचाव करु पाहात असेल तर लोक व्यक्त होणेच थांबवतील आणि त्यातूनच मग कदाचित लालकृष्ण अडवाणी यांच्या मनातील भीती उदयास येऊ शकेल.